इराणचे नवीन सर्वोच्च नेते कधी आणि कसे निवडले जाणार? परराष्ट्रमंत्र्यांनी काय सांगितलं?

नवीन सर्वोच्च नेता निवडण्याबाबत इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी माहिती दिली.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, नवीन सर्वोच्च नेता निवडण्याबाबत इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी माहिती दिली.
वाचन वेळ: 6 मिनिटे

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी इराणमधील सरकारी वाहिनीनं केला आहे. त्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतचा दावा केला होता.

शनिवारी (28 फेब्रुवारी) अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर हल्ला केला आहे.

रविवारी (1 मार्च) सकाळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 'ट्रुथ सोशल'वर खामेनी यांच्या मृत्यूचा दावा केला.

त्यावेळी इराणची वृत्तसंस्था असलेल्या 'फार्स'नं म्हटलं होतं की, अली खामेनी यांच्या मृत्यूची बातमी खोटी आहे आणि तो अमेरिकेच्या 'सायकॉलॉजिकल वॉर'चा भाग आहे, असं जाणकार सूत्रांनी सांगितलेलं आहे.

रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या फार्स न्यूज एजन्सीने तत्काळ या वृत्ताचं खंडन केलं होतं.

मात्र काही वेळानं इराणच्या सरकारी वाहिनीनं या वृत्ताला दुजोरा दिला. तसंच खामेनी यांच्या मृत्यूनंतर 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर केला.

या सर्व घडामोडींनंतर आता खामेनींच्या उत्तराधिकाऱ्याबाबतच्या चर्चांना जोर आलेला आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी दावा केला आहे की एक-दोन दिवसांत सर्वोच्च नेत्यांची निवड होऊ शकते.

अयातुल्ला अली खामेनी

फोटो स्रोत, EPA/Shutterstock

फोटो कॅप्शन, अयातुल्ला अली खामेनी

अल जझीरा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इराणचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, "अयातुल्ला अली यांच्या निधनानंतर, नवीन सर्वोच्च नेते एक-दोन दिवसांत निवडले जाऊ शकतात."

मात्र, खामेनी यांच्या निधनानंतर इराणमध्ये अंतरिम नेतृत्वाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. अरागची यांच्या मते, नवीन नेत्याची निवड होईपर्यंत कारभार अंतरिम नेतृत्वाच्या हातीच राहील.

अब्बास अरागची यांनी असंही म्हटलं की, "इराणचे हल्ले हे 'स्वसंरक्षणासाठी' आणि 'अमेरिकेकडून झालेल्या हल्ल्याला दिलेले प्रत्युत्तर' आहेत."

दरम्यान, इराणमध्ये अयातुल्ला अली रजा अराफी यांची गार्डियन कौन्सिलच्या ज्युरिस्ट पदावर निवड करण्यात आली आहे. ही निवड अंतरिम नेतृत्व परिषदेच्या संदर्भात करण्यात आली आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"इतिहासातील सर्वात वाईट लोकांपैकी एक असलेले खामेनी आता मरण पावलेले आहेत," असं ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिलं.

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सशी संलग्न असलेल्या फार्स न्यूज एजन्सीनं वृत्त दिलं आहे की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची मुलगी, जावई आणि नातू या हल्ल्यात ठार झाले आहेत.

या सगळ्या घडामोडींवर चीननं चिंता व्यक्त केली आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत चीनचे राजदूत फू काँग म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे त्यांचा देश खूप चिंतेत आहे.

दुसऱ्या बाजूला, वॉशिंग्टनमधील नॅशनल सॉलिडॅरिटी ग्रुप ऑफ इराण मृतांच्या स्मरणार्थ वॉशिंग्टनमध्ये रॅलीचे आयोजन बऱ्याच काळापासून करत होता.

मात्र, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर रॅलीचे वातावरण उत्सवमय झालेलं आहे.

रॅलीतील बरेच लोक आनंदाने नाचत होते. काही जण मिठाई वाटत होते, काही जण फुले देत होते आणि बरेच जण एकमेकांना मिठी मारत होते.

रॅलीतील सहभागींनी "अमेरिका!" असे जयघोष करून सरकारचे आभार मानले.

खामेनींचा उत्तराधिकारी कसा निवडला जाऊ शकतो?

इराणने अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर सत्ता संक्रमण कालावधीचं निरीक्षण करण्यासाठी त्यांचे राष्ट्राध्यक्ष, न्यायपालिकेचे प्रमुख आणि एक शक्तिशाली संस्था असलेल्या गार्डियन कौन्सिलचे एक कायदेतज्ज्ञ यांचं एक मंडळ जाहीर केलेलं आहे.

यासंदर्भात बीबीसी पर्शियनचे प्रतिनिधी बेहरंग ताजदिन यांनी विश्लेषण केलेलं आहे. ते पुढीलप्रमाणे -

इराणच्या संविधानानुसार, खामेनी यांची निवड ज्या धर्मगुरुंच्या मंडळानं केली त्याच मंडळानं त्यांचा उत्तराधिकारी निवडला पाहिजे, असं अपेक्षित आहे.

हे मंडळ म्हणजे थोडक्यात 'लीडरशीप एक्स्पर्ट'चं मंडळ होय.

'लीडरशीप एक्स्पर्ट' हे 88 धर्मगुरूंचं एक मंडळ आहे. ते कागदोपत्री दर आठ वर्षांनी एकदा लोकांकडून निवडलं जातं. परंतु, प्रत्यक्षात फक्त इस्लामिक रिपब्लिकशी सर्वात निष्ठावान असणाऱ्या धर्मगुरूंनाच या निवडणुकीसाठी उभं राहण्याची परवानगी आहे. म्हणूनच सध्याच्या असेंब्ली सदस्यांपैकी बहुतांश सदस्य हे अयातुल्ला खामेनी यांच्यासारखेच कट्टर धर्मगुरू आहेत.

इराणच्या संविधानात म्हटलं आहे की, या धर्मगुरूंनी शक्य तितक्या लवकर नवीन सर्वोच्च नेत्याची निवड करावी. परंतु, सध्या इराणवर अमेरिका आणि इस्रायलचा हल्ला सुरू असताना, सर्वांना लवकरात लवकर एकत्र करणं सुरक्षेच्या कारणास्तव कठीण ठरू शकतं.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष, न्यायपालिकेचे प्रमुख आणि 'पॉवरफुल गार्डीयन कौन्सिल'चे धर्मगुरू सदस्यचं नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारतील, असं दिसतंय.

'इराण अनेक वर्षांपासून तयारी करत होता, तो असामान्य क्षण'

मुख्य आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी लिझ डकेट यांनी केलेलं विश्लेषण.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या दृष्टीनं हा एक निर्णायक क्षण आहे.

शनिवारी सकाळी इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या निवासस्थानावरील हल्ल्यानंतर विविध बातम्या येऊ लागल्या. सॅटेलाईट इमेजेसमध्ये त्यांच्या घराचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं.

इराणनं सुरुवातीला 86 वर्षीय खामेनी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं सांगितलं. नंतर ते टीव्हीवरून संबोधित करणार असं वृत्त आलं. पण तसं काहीच झालं नाही.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सायंकाळी टीव्हीवर खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे संकेत मिळाल्याचं सांगितलं होतं. पण इराणी अधिकाऱ्यांकडून ते नाकारलं जात होतं.

पण काही तासांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केली आणि नंतर इराणच्या सरकारी वाहिनीनंही खामेनींच्या मृत्यूला दुजोरा दिला.

इराणच्या आजवरच्या अस्थिर इतिहासातील हे अत्यंत महत्त्वाचे क्षण आहेत. पण देशातील प्रभावी धर्मगुरू आणि लष्करी अधिकारी त्यासाठी तयारी करत होते.

इराण खामेनी

फोटो स्रोत, Getty Images

गेल्यावर्षी जून महिन्यात 12 दिवसांच्या युद्धात परिस्थिती खूप तणावाची होती. पहिल्याच रात्री इस्रायलनं नऊ अणुशास्त्रज्ञ आणि अनेक सुरक्षा प्रमुखांची हत्या केली. नंतर काही दिवसांत आणखी शास्त्रज्ञ आणि किमान 30 कमांडरचा मृत्यू झाला.

त्यामुळं आयातुल्ला हेही लक्ष्य असू शकतात हे स्पष्ट होतं.

खामेनी युद्धकाळात खास बंकरमध्ये राहायचे. त्यांनी कठिण क्षणी पोकळी निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची यादीही तयार केली होती, असं समोर आलंय.

गेल्या वर्षीच्या संघर्षापूर्वीच खामेनी यांनी सर्वोच्च नेत्याची निवड करण्याची जबाबदारी असलेल्या 88 धर्मगुरूंच्या असेंब्ली ऑफ एक्स्पर्ट्सला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहावं असं सांगितलं होतं. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार त्यांनी हत्या झाल्यास संभाव्य उत्तराधिकारी म्हणून तीन वरिष्ठ धर्मगुरूंची निवडही केली होती.

त्यांच्या जागी कोण येऊ शकतो, याबाबत अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती. त्यात त्यांचा मुलगा मोज्तबा याचेही नाव घेतले जात होते.

पण हल्ल्याच्या पहिल्या दिवशी फक्त सर्वोच्च नेत्यांचाच मृत्यू झालेला नाही. त्यामुळं पदांवर असलेले किंवा नवी जबाबदारी असणारे नेते नेते सत्ता अजूनही त्यांच्या हाती असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करतील.

अयातुल्लांच्या कारकीर्दीचा शेवट त्यांच्या समर्थकांसाठी मोठा धक्का आहे. विशेषतः इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्समधील सहकाऱ्यांसाठी. कारण त्यांच्यावर खामेनी आणि इस्लामिक क्रांतीचे संरक्षण करण्याची जबाबदारी होती.

खामेनी मृत्यू

फोटो स्रोत, Mamlekate / X

बीबीसीनं तपासलेल्या व्हीडिओंमध्ये तेहरान आणि कराजच्या रस्त्यांवर काही लोक खामेनींच्या मृत्यूच्या बातम्यांवर आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

पाश्चिमात्य देशांविषयी, विशेषतः अमेरिकेविषयी संशयाची आणि इस्रायलविरोधी भूमिका घेत खामेनी यांनी कठोर नियंत्रण ठेवत कारभार केला. अनेक आवाज आणि वारंवार उसळलेली आंदोलनं त्यांनी दडपली.

इस्रायल आणि अमेरिकेसोबतच्या थेट लष्करी संघर्षाच्या या काही वर्षांत आणि देशांतर्गत बदलांच्या वाढत्या मागण्यांमुळे त्यांच्यासमोर मोठी आव्हानं उभी राहिली.

या महिन्याच्या सुरुवातीला आम्ही तेहरानमध्ये होतो तेव्हा इराणचं रुप पालटलेलं दिसत होतं. हजारो इराणी ठार झाल्याचं सांगितलं जातं त्या सुरक्षादलांच्या कारवाईबाबत निर्माण झालेला संताप अजूनही जाणवत होता.

आता खामेनींच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याकडं लक्ष लागेल. नेतृत्वातील बदलामुळे 47 वर्षे जुन्या इस्लामिक रिपब्लिकच्या धोरणात बदल होईल का, यावर चर्चा होईल.

कोण पुढे येईल, हे महत्त्वाचं असलं तरी त्यांचा धर्मगुरू आणि प्रभावशाली सुरक्षा दलांची सत्ता टिकवून ठेवणाऱ्या व्यवस्थेचे अस्तित्व कायम ठेवण्याचा उद्देश कायम राहील.

त्यामुळं अजून न संपलेले युद्ध अनिश्चित आणि धोकादायक दिशेने पुढे सरकत आहे.

इराणमध्ये आनंद साजरा?

दरम्यान, इराणच्या काही नागरिकांनी कारजमधील रस्त्यांवर उतरत सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूचं वृत्त आल्यानंतर आनंद व्यक्त केल्याचे काही व्हीडिओ सोशल मीडियावर समोर येत आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेला आणि बीबीसी पर्शियननं सत्यापित केलेल्या एका व्हीडिओमध्ये कारजमधील काही इराणी लोक सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूच्या वृत्ताचा आनंद साजरा करत असल्याचे दिसत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा करण्यापूर्वीच हा आनंद साजरा केल्याचं समोर आलं.

ट्रम्प काय म्हणाले?

खामेनी यांच्या मृत्यूची घोषणा करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, "इतिहासातील सर्वात वाईट व्यक्तींपैकी एक असलेले खामेनी यांचा मृत्यू झाला आहे.

फक्त इराणसाठीच नव्हे तर खामेनी आणि त्यांच्या क्रूप मारेकरी टोळीनं हत्या केलेल्या किंवा जखमी केलेल्या महान अमेरिकन आणि जगभरातील इतर लोकांसाठीही हा न्याय आहे."

"ते आमच्या गुप्तचर यंत्रणा आणि अत्याधुनिक ट्रॅकिंग सिस्टीमपासून वाचू शकले नाही. इस्रायलच्या साथीनं केलेल्या या कारवाईत त्यांना किंवा त्याच्यासोबत मारल्या गेलेल्या इतर नेत्यांनाही काहीही करता आलं नाही."

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प

"इराणच्या नागरिकांसाठी ही त्यांचा देश परत मिळवण्याची आतापर्यंतची सर्वात मोठी संधी आहे. त्यांचे अनेक IRGC, लष्करी अधिकारी आणि इतर सुरक्षा तसंच पोलीस दलही आता लढण्यास इच्छुक नसल्याचं आमच्या कानावर येत आहे. ते आमच्याकडे संरक्षण (इम्युनिटी) मागत आहेत. मी काल रात्री म्हटल्याप्रमाणं, 'त्यांना आता संरक्षण मिळू शकतं, परंतु नंतर त्यांना फक्त मृत्यूच मिळेल."

"आयआरजीसी आणि पोलीस इराणच्या देशभक्तांबरोबर एकत्र येतील आणि एकसंघपणे देशाला पात्र असलेल्या महानतेकडं नेतील, अशी आम्हाला आशा आहे.

ही प्रक्रिया लवकरच सुरू झाली पाहिजे, कारण केवळ खामेनी मरण पावले नसून, देश एका दिवसात मोठ्या प्रमाणात नष्ट झाला आहे, किंबहुना जवळजवळ पूर्णच नष्ट होत आला आहे."

"तरीही, मध्य पूर्व आणि जगात शांतता राखण्यासाठीचं ध्येय साध्य करण्यासाठी आणखी आठवडाभर किंवा गरजेनुसार जोरदार आणि अचूक बॉम्बहल्ले सुरूच राहतील."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)