हिंदी महासागरात पाणबुडीने इराणची युद्धनौका बुडवल्याचा अमेरिकेने केला दावा

पीट हेगसेथ

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पीट हेगसेथ यांनी इराणी युद्धनौका बुडवल्याची घोषणा केली
वाचन वेळ: 4 मिनिटे

अमेरिकेने हिंद महासागरात एक इराणी युद्धनौका बुडवली असल्याचा दावा अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी केला आहे.

अशा प्रकारे जहाज उध्वस्त करण्यासाठी पाडबुडीद्वारे टॉर्पिडोचा हल्ला करण्यात येतो. मात्र, हेगसेथ यांनी बुडालेल्या इराणी जहाजाचं नाव सांगितलं नाही.

याआधी, श्रीलंकेच्या नौदलाने 'आयआरआयएस डेना'(IRIS Dena) नावाची युद्धनौका हिंद महासागरात बुडाल्याचं म्हटलं होतं.

जहाजातून प्रवास करणारे 140 प्रवासी बेपत्ता असल्याचंही सांगण्यात आलं होतं.

अमेरिकन संरक्षण सचिव म्हणाले, "इराणच्या युद्धनौकेला आंतरराष्ट्रीय समुद्रात सुरक्षित असतील, असं वाटत होतं पण अमेरिकेने हिंद महासागरात ते जहाज बुडवलं आहे."

ते म्हणाले, "ते जहाज टॉर्पेडो (पाणबुडीतून हल्ला करण्यासाठी वापरण्यात येणारं क्षेपणास्त्र)ने बुडवण्यात आलं आहे."

दरम्यान, हे जहाज विशाखापट्टणममधील एका कार्यक्रमानंतर परत निघालं होतं, तेव्हा रस्त्यात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

जहाज बुडाल्याबाबत श्रीलंकेनं काय म्हटलं?

बुधवारी (4 मार्च) सकाळी इराणच्या नौदलाच्या 'आयआरआयएस डेना' जहाजावरून संकटाची माहिती मिळाल्यानंतर श्रीलंकेच्या नौदलानं 32 जणांना वाचवल्याची पुष्टी केली होती.

श्रीलंकेच्या नौदलाचे प्रवक्ते बुद्धिका संपत यांनी बीबीसी प्रतिनिधी योगिता लिमये यांच्याशी बोलताना म्हटलं की, "ही घटना आमच्या सागरी सीमेच्या बाहेरची होती. पण आमच्या शोध आणि बचाव क्षेत्राच्या सीमेत होती. त्यामुळं आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांनुसार आम्हाला पावलं उचलावी लागली."

ते म्हणाले, "आम्हाला पाण्यात तरंगणारे लोक आढळले, त्यांना वाचवण्यात आलं. नंतर हे लोक इराणी जहाजातील असल्याचं तपासात आढळून आलं."

प्रवक्त्याच्या मते, कागदपत्रांवरून जहाजावर सुमारे 180 लोक होते अशी माहिती मिळाली. पण बेपत्ता लोकांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.

बचावकार्य सुरू करण्यात आलं तेव्हा नौदलाला जहाज दिसलं नाही, परंतु समुद्रात तेलाचे डाग आणि तरंगणारे लाईफ राफ्ट आढळल्याचंही त्यांनी सांगितलं.

इराणी नौदलातील देना जहाजाचा 2023 मधला फोटो

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, इराणी नौदलातील देना जहाजाचा 2023 मधला फोटो

बीबीसीबरोबर बोलताना जहाजाला पाणबुडीनं लक्ष्य केल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. जहाज बुडण्याचं कारण अद्याप अज्ञात असल्याचं ते म्हणाले.

तत्पूर्वी, श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिव एअर व्हाइस मार्शल संपत थुईयाकोंथा यांनी बीबीसी सिंहलाशी बोलताना सुमारे 140 लोक बेपत्ता असल्याची माहिती असल्याचं सांगितलं.

श्रीलंकेच्या लष्कराला अद्याप जहाज बुडण्याचे कारण काय याबाबत माहिती देता आलेली नाही.

दरम्यान, नौदलाने जहाजाच्या मदतीच्या विनंतीला प्रतिसाद देत स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 वाजता बचाव कार्य सुरू केलं होतं, असं श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत सांगितलं.

श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ संसदेत म्हणाले की, "आयआरआयएस डेना" नावाच्या जहाजातून पहाटे आपत्कालीन संकटाबाबत सिग्नल मिळाला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात नेण्यात आलेल्यांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

श्रीलंकेच्या एका विरोधी खासदाराने इराणविरुद्ध अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांचा भाग म्हणून जहाजावर बॉम्बस्फोट झाला का? असा प्रश्न उपस्थित केला होता.

विशाखापट्टणमहून परत जात होते जहाज?

दरम्यान, आयआरआयएस डेना नावचं इराणचं हे जहाज काही दिवसांपूर्वी म्हणजे 20 फ्रेब्रुवारीदरम्यान विशाखापट्टणममध्ये होतं.

इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू 2026 साठी हे जहाज विशाखापट्टणमला आलेलं होतं. यादरम्यान इराणच्या नौदलाचे प्रमुख शाहरम इराणी हेही भारताच्या दौऱ्यावर या कार्यक्रमासाठी आले होते.

त्यामुळं हे जहाज विशाखापट्टणमहून परत जात असताना ही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे.

इराणने अमेरिकेच्या तळांवर हल्ले वाढवले

दरम्यान, कतारच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं की, इराणनं कतारवर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे.

त्यापैकी एक क्षेपणास्त्र कतारच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं पाडलं, तर दुसरं क्षेपणास्त्र या प्रदेशातील सर्वात मोठ्या अमेरिकन लष्करी तळ असलेल्या अल उदेद येथील अमेरिकन हवाई दलाच्या तळावर आदळले.

या हल्ल्यात कोणीही ठार झाले नसल्याचं कतारचं म्हणणं आहे.

दरम्यान, इस्रायलने तेहरानमधील डझनभर लष्करी तळांवर हल्ला केल्याचं, इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) च्या अरबी भाषेतील प्रवक्ते अविचाय अदरई यांनी म्हटलं.

इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड्सशी संलग्न असलेल्या बसीज या निमलष्करी दलाच्या मुख्यालयाला लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले. याशिवाय, क्षेपणास्त्र लाँच पॅड आणि संरक्षण प्रणालींनाही लक्ष्य करण्यात आलं.

युएईमध्ये इराणचे  हल्ले

फोटो स्रोत, Fadel SENNA / AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, इराण युएईसह अनेक आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करत आहे.

आयडीएफ इराणी राजवटीच्या पायाभूत सुविधांवर हल्ले तीव्र करत राहणार असल्याचं, ते म्हणाले.

शनिवारी अमेरिका-इस्रायलचे हल्ले सुरू झाल्यापासून, इराणनं या प्रदेशातील अमेरिकन तळांवर आणि त्यांच्या सहयोगी देशांवर अनेक हल्ले केले आहेत.

मंगळवारी सायंकाळी ड्रोन हल्ल्यानंतर दुबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या इमारतीला आग लागल्याचे व्हीडिओ फुटेज बीबीसी व्हेरिफायनं सत्यापित केले आहे.

वाणिज्य दूतावासापासून काही मीटर अंतरावर एका चौकातून चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये एक ड्रोन इमारतीवर आदळताना दिसत आहे.

मंगळवारी रात्री पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी वाणिज्य दूतावासाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीजवळील पार्किंग लॉटमध्ये एक ड्रोन उतरल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

"आम्ही खूप भाग्यवान आहोत, परंतु आमचे दूतावास आणि राजनैतिक सुविधांवर दहशतवादी राजवटीकडून थेट हल्ला होत आहे," असं रुबियो म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.