अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेवर हल्ल्याबाबत इराणनं काय सांगितलं? संघर्षात आतापर्यंत काय काय घडलं?

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरिअर अब्राहम लिंकनवर हल्ला झाल्याचे इराणने म्हटले होते, हा दावा अमेरिकेनी फेटाळून लावला आहे.
युएस सेंट्रल कमांडने म्हटले आहे की एअरक्राफ्ट कॅरिअर अब्राहम लिंकन लक्ष्य झालं नाही. फायर करण्यात आलेलं मिसाइल जहाजाजवळ देखील पोहोचलं नाही.
सेंट्रल कमांडने म्हटले अजूनही या कॅरिअरवरुन विमाने उडवली जात आहे ज्यातून सेंट्रल कमांडच्या ऑपरेशनमुळे ऊर्जा मिळेल. अमेरिकन लोकांची रक्षण होईल आणि इराणी शासनाकडून येणाऱ्या संभाव्य धोक्यांना संपवलं जाईल.
याआधी, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोरने दावा केला होता की अमेरिकी नौसेनेचं एअरक्राफ्ट कॅरिअर अब्राहम लिंकनवर चार बॅलेस्टिक मिसाइलने हल्ला करण्यात आला होता.
'अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेवर 4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला'; इराणने नेमका काय दावा केला?
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) अमेरिकन नौदलाची विमानवाहू युद्धनौका 'अब्राहम लिंकन'वर हल्ला केल्याचा दावा केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसी पर्शियनच्या वृत्तानुसार, IRGC च्या जनसंपर्क विभागाने एका निवेदनात म्हटले होते की, "अमेरिकेच्या नौदलाचे विमानवाहू युद्धनौका 'अब्राहम लिंकन'वर 4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. शत्रूवरील हल्ला आता एका नवीन टप्प्यावर पोहोचला आहे."
अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका 'अब्राहम लिंकन' सध्या पर्शियन आखात आणि अरबी समुद्राजवळ तैनात आहे, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
या युद्धनौकेवर हल्ला केल्याचा इराणचा दावा अमेरिकेकडून फेटाळण्यात आला.
दुबई विमानतळावर इराणच्या हल्ल्यानं किती नुकसान झालं?
इराणच्या हल्ल्यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका दालनात 4 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इराणनं पश्चिम आशियात अमेरिकेचे तळ असलेल्या देशांमध्ये हल्ले केले.
अनेक क्षेपणास्त्रं हवेतच नष्ट करण्यात आल्याचं या देशांनी सांगितलंय, पण खाली पडणाऱ्या क्षेपणास्त्राच्या अवशेषांनीही काही ठिकाणी नुकसान केलं.
अबू धाबीमध्येही झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून आणखी 7 जण जखमी झाले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
पश्चिम आशियात हा संघर्ष सुरू झाल्यापासून गेल्या 2 दिवसांत हजारो विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत. जगभरातल्या हवाई वाहतुकीसाठी हा कोव्हिडच्या साथीनंतरचा सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. कारण यूएईमधलं दुबई आणि अबूधाबी तसंच कतारमधील दोहा इथले विमानतळ जगाच्या हवाई वाहतुकीत अतिशय महत्त्वाचे आहेत.
इथे मोठे हब्ज आहेत, म्हणजे असे विमानतळ जिथून दुसरं विमान पकडून जगात दुसऱ्या कुठल्याही देशांमध्ये जाता येईल. दुबईतला विमानतळ जगातला सर्वात व्यस्त विमानतळ आहे.
दुबईत एमिरेट्स, अबूधाबीमध्ये एतिहाद आणि दोहामध्ये कतार एयरलाईन्स या तीन मोठ्या विमानसेवा जगातल्या हवाई वाहतुकीत मोठा वाटा उचलतात. दिवसाला लाखो प्रवासी इथून ये-जा करतात. साहजिकच हे विमानतळ बंद झाल्याचा परिणाम भारतासह इतर देशांतल्या हवाई वाहतुकीवरही झाला आहे. भारतातून पश्चिम आशियाई देशांत होणारी अनेक उड्डाणं रद्द झाली आहेत.
खामेनींच्या मृत्यूवर चीन आणि रशियाने काय प्रतिक्रिया दिली
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूवर आणि अमेरिका-इस्रायलने चीनवर केलेल्या हल्ल्यांवर चीनने निवेदन प्रसिद्ध केले आहे. ही मोहीम चीनने संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या उद्दिष्टांविरोधात असल्याचे म्हटले आहे.
चीनच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की इराणचे सर्वोच्च नेत्यावरील हल्ला आणि त्यांची हत्या, इराणच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेच्या मूल्यांचे गंभीर उल्लंघन आहे. हे पाऊल संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरची उद्दिष्टे आणि मूल्यांविरोधात आहे, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मूलभूत नियमांविरोधात आहे. चीन या हल्ल्याचा तीव्र विरोध आणि निषेध करत आहे.
चीनने शांतता प्रस्थापित करण्याची अपील केली आहे. चीनने म्हटले आहे की तत्काळ लष्करी कारवाई रोखण्यात यावी. तणावपूर्ण स्थितीला आणखी चिघळू न देण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. त्याचवेळी पश्चिम आशिया आणि पूर्ण जगात शांतता आणि स्थैर्य राहावे यासाठी आम्ही आवाहन करत आहोत.
याआधी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी खामेनी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांनी खामेनी आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांचा मृत्यू म्हणजे मानवी नैतिकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांविरोधात एक हत्या असल्याचे म्हटले.

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायल-अमेरिका हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनींशिवाय आणखी कोण मारले गेले?
अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेले आहेत. त्यांच्याशिवाय इराणचे लष्करप्रमुख अब्दुल रहीम मौसावी आणि संरक्षण मंत्री मेजर जनरल अझीझ नासिरजादेह यांचाही हवाई हल्ल्यात मृत्यू झाला.
इराणमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, देशाच्या सशस्त्र दलाचे प्रमुख अब्दुलरहीम मौसावी हे हवाई हल्ल्यांत मारले गेले. तसेच, संरक्षणमंत्री मेजर जनरल अजीज नासिरजादेह, सुप्रीम डिफेन्स कौन्सिलचे अध्यक्ष अली शमखानी यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला.
इराणने या हल्ल्यात रिव्होल्यूशनरी गार्ड्स कमांडर जनरल मोहम्मद पाकपो यांचासह इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली.
शनिवारी (28 फेब्रुवारी) अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर हल्ला केला. त्यानंतर रविवारी (1 मार्च) सकाळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 'ट्रुथ सोशल'वर खामेनी यांच्या मृत्यूचा दावा केला.
यानंतर, इराणच्या सरकारी माध्यमांनी खामेनी यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला.
या हल्ल्यात खामेनी यांची मुलगी, जावई आणि नातवाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिले.
एका गुप्तचर सुत्राने आणि एका लष्करी सुत्राने सीबीएस न्यूजला दिलेल्या माहितीनुसा या हल्ल्यांत इराणच्या सुमारे 40 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इराणच्या समर्थनार्थ कराचीतील अमेरिकन दुतावासाबाहेर निदर्शनं, 9 जणांचा मृत्यू
इराणवर इस्रायल आणि अमेरिकेनी हल्ला सुरू केल्यानंतर इराणच्या समर्थनार्थ पाकिस्तानमध्ये अमेरिकन दुतावासाबाहेर निदर्शनं सुरू आहेत. या निदर्शनांना हिंसक वळण लागले. पोलीस आणि निदर्शकांमध्ये झालेल्या संघर्षात कराची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 9 मृतदेह आणि 32 जखमींना आणले गेल्याची माहिती एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने बीबीसी न्यूजला दिली.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानातील प्रमुख शहरं, कराची, लाहोर आणि इस्लामाबादमध्ये इराणच्या समर्थनार्थ शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत.

इधी फाउंडेशन या खासगी बचाव सेवेनतील अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की 9 मृतदेह आणि अनेक जखमींना रुग्णालयात आणले गेले.
गिलगिटमधील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालय पेटवून देण्यात आल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हे कार्यालय गिलगिट-बाल्टिस्तानच्या पाकिस्तान प्रशासित भागात आहे.
विविध शिया संघटनांनी विविध शहरांमध्ये ज्यात इस्लामाबादचाही समावेश आहे त्या ठिकाणी निदर्शनांचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे.
खामेनी यांचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मृत्यूचा दावा केला होता. त्यानंतर इराणच्या सरकारी वाहिनीनंही याला दुजोरा दिला आहे.
शनिवारी (28 फेब्रुवारी) अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर हल्ला केला आहे. त्यानंतर रविवारी (1 मार्च) सकाळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 'ट्रुथ सोशल'वर खामेनी यांच्या मृत्यूचा दावा केला होता.
खामेनी हे इतिहासातील सर्वात वाईट व्यक्ती होते, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मृत्यूनंतर म्हटलं आहे.
इराणमध्ये खामेनी यांच्या मृत्यूनंतर काही ठिकाणी लोकांनी रसत्यांवर आनंद साजरा केल्याचंही पाहायला मिळालं.
इरामध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे 200 लोक मारले गेल्याचं वृत्त आहे.
बीबीसीच्या सहयोगी सीबीएसला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इराणच्या 40 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
इराणच्या शेवटच्या शाह (राजा) यांचे निर्वासित सुपुत्र रझा पहलवी यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूच्या दाव्याचं स्वागत केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"हजारो इराणी लोकांना मारणारे खामेनी आता इतिहासाचा एक भाग बनलेले आहेत," असं त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे.
1979 च्या क्रांतीनंतर रझा पहलवी आपल्या कुटुंबासह देश सोडून अमेरिकेत स्थायिक झाले होते आणि तेव्हापासून ते तिथेच राहत आहेत.
इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सशी संलग्न असलेल्या फार्स न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची मुलगी, जावई आणि नातू या हल्ल्यात ठार झाले आहेत.
फार्सनं असंही वृत्त दिलं आहे की, "या हल्ल्यांमध्ये खामेनी यांच्या एका सुनेचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे."
शनिवारी (28 फेब्रुवारी) अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर हल्ला केला आहे. रविवारी (1 मार्च) सकाळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 'ट्रुथ सोशल'वर खामेनी यांच्या मृत्यूचा दावा केला.
इराणी जेट बॉम्बचा पश्चिम आशियातील अमेरिकन तळावर हल्ला - इराणी सरकारी माध्यमांची माहिती
पश्चिम आशियातील अमेरिकन तळांवर आणि इराकमधील कुर्दिस्तान भागातील अमेरिकन तळांवर इराणच्या जेट बॉम्बने हल्ला करण्यात आल्याची माहिती इराणचे सरकारी माध्यमसंस्था IRNA ने दिली.
इराणच्या लष्कराने माहिती दिली आहे की इराणच्या वैमानिकांनी यशस्वीरीत्या या तळांवर हल्ले केले. वायू सेनेच्या लढाऊ विमानांच्या सहाय्याने शत्रूंच्या लष्करी तळांवर हल्ला केल्याचे देखील त्यांनी सांगितले.
भारताने परदेशी लोकांसाठी प्रसिद्ध केली ऍडव्हायजरी
मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने परदेशी लोकांसाठी काही सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
मध्य पूर्वेतील बिघडत्या सुरक्षा परिस्थितीमुळे आणि उड्डाणे रद्द झाल्यामुळे, भारत सरकारने रविवारी (1 मार्च) देशात असलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसाची मुदत वाढवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सांगितलं आहे.

फोटो स्रोत, ANI
उड्डाण रद्द झालेल्या किंवा इतर समस्यांना तोंड देणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक ऍडव्हाजयरी प्रसिद्ध केली आहे.
मंत्रालयानं म्हटलं आहे की, जर कोणत्याही परदेशी नागरिकाला त्याचा व्हिसा वाढवण्यासाठी किंवा त्याचा मुक्काम नियमित करण्यासाठी मदत हवी असेल तर त्याने त्याच्या जवळच्या 'Foreigners Regional Registration Office' शी संपर्क साधावा.
कराचीत अमेरिकन दूतावासात केला प्रवेश; गोळीबारात सहा जणांचा मृत्यू
खामेनी यांच्या हत्येनंतर संतप्त लोकांनी पाकिस्तानमधील कराचीतील अमेरिकन वाणिज्य दूतावासात प्रवेश केला. जिथे त्यांनी तोडफोड केली, त्यादरम्यान गोळीबारात किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
कराचीमधील बंदराजवळ अमेरिकन वाणिज्य दूतावास आहे.
सोशल मीडियावरील व्हीडिओंमध्ये काही लोक गेट तोडून आत शिरल्याचे दिसून येतं. त्यानंतर रिसेप्शन आणि सुरक्षा कक्षाच्या खिडक्या तुटल्या असल्याचं दिसत आहे.
मजलिस-ए-वहदत मुस्लिमीनच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामान्य लोकांनी एका धार्मिक व्यक्तीच्या हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी अमेरिकन वाणिज्य दूतावासात निदर्शने केली होती. त्यांच्यावर आतून गोळीबार करण्यात आला होता.
पोलीस सर्जन डॉ. सामिया सय्यद यांनी सहा जणांचा मृत्यू आणि आठ जण जखमी झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला.
अमेरिकेचे 27 तळ आणि इस्रायलच्या लष्करी मुख्यालयाला लक्ष्य केल्याचा इराणचा दावा
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने एक नवीन निवेदन जारी केलं आहे.
बीबीसी पर्शियनच्या वृत्तानुसार , आयआरजीसीने दिलेल्या या निवेदनात त्यांनी अमेरिकेचे 27 तळ तसंच तेल अवीवमधील लष्करी तळ, इस्रायलच्या लष्कराचं जनरल कमांड मुख्यालय आणि तेल अवीवमधील मोठ्या संरक्षण औद्योगिक संकुलाला लक्ष्य केल्याचं म्हटलं आहे.
सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली तेव्हा इराणने हे पाऊल उचलले आहे.
इराणचं सैन्य त्यांच्या ताब्यातील भागात आणि अमेरिकेच्या तळांवर वाजणारे धोक्याचे सायरनला बंद होऊ देणार नाही, असा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.
इराणमध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी
इराणच्या राज्य वृत्तसंस्था असलेल्या IRNA वृत्त दिलं आहे की, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे कमांडर-इन-चीफ मोहम्मद पाकपौर आणि इराणच्या संरक्षण परिषदेचे सचिव अली शामखानी यांचा मृत्यू झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
वॉशिंग्टनमधील इराणी मानवाधिकार गट असलेल्या 'ह्यूमन राईट्स अॅक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सी'च्या मते, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये किमान 133 इराणी नागरिक मारले गेले आहेत आणि 200 जण जखमी झालेले आहेत.
या मानवाधिकार गटानं म्हटलं आहे की, ही माहिती प्राथमिक अहवालांवर आधारित आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की 18 प्रांतांमध्ये किमान 58 हल्ले नोंदवले गेले आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक घटना तेहरानमध्ये घडल्या आहेत.
खामेनी यांच्या मृत्यूनंतर भारतात या जागी झालं आंदोलन
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर श्रीनगरच्या सैदा कदल भागात लोक निषेध आंदोलन करत आहेत.

फोटो स्रोत, ANI
'एएनआय' या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या लाल चौकामध्येही काश्मिरी शिया मुसलमानांनी निषेध आंदोलन केलं.
खामेनी यांचा मृत्यू कधी आणि कुठे झाला? आतापर्यंत काय समजलं?
सध्या तरी इराणने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल आणि अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या चार आखाती अरब देशांवर म्हणजेच बहरीन, कुवेत, कतार आणि संयुक्त अरब अमिराती यांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागलेले आहेत.
इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं म्हटले आहे की, अयातुल्ला अली खामेनी यांचं शनिवारी पहाटे त्यांच्या कार्यालयात "कामात व्यस्त असताना" निधन झालं आहे, असं सरकारी टीव्ही चॅनेलवरील वृत्तनिवेदकांनी वाचलेल्या विधानांमधून दिसून आलं.
दरम्यान, 'बीबीसी व्हेरिफाय'ने सॅटेलाइट प्रतिमांचा वापर करून त्यांच्या मृत्यूबाबत पुष्टी करण्याचा प्रयत्न केला.
बीबीसी व्हेरिफायला आढळलं की, तेहरानमधील खामेनी यांच्या कार्यालयाच्या म्हणजेच लीडरशिप हाऊस कंपाऊंडच्या अनेक भागांना गंभीर नुकसान झालेलं आहे.

फोटो स्रोत, Airbus DS 2026
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सशी (IRGC) संलग्न असलेल्या 'तस्निम न्यूज एजन्सी'नं म्हटलं आहे की, खामेनी यांचा त्यांच्या कार्यालयात मृत्यू हा त्यांच्या 'शत्रूंनी चालवलेले सायकॉलॉजिकल वॉर' असल्याचा पुरावा आहे.
'बीबीसी व्हेरिफाय'च्या फुटेजमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचं निवासी परिसर तसेच तेहरानमधील लीडरशिप हाऊसपासून एक किलोमीटर अंतरावर स्फोट झाल्याचं दिसून आलं.
बीबीसीने मिळवलेल्या सॅटेलाईट इमेजेसमध्येही इमारतींचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामध्ये काळवंडलेल्या इमारती, नासधूस आणि धुराचे लोट दिसून येतात.
मात्र, या हल्ल्याच्या वेळी खामेनी तिथे होते की नाही हे तातडीनं स्पष्ट झालेलं नव्हतं.
ट्रम्प काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, "इतिहासातील सर्वात वाईट व्यक्तींपैकी एक असलेले खामेनी यांचा मृत्यू झाला आहे.
फक्त इराणसाठीच नव्हे तर खामेनी आणि त्यांच्या क्रूप मारेकरी टोळीनं हत्या केलेल्या किंवा जखमी केलेल्या महान अमेरिकन आणि जगभरातील इतर लोकांसाठीही हा न्याय आहे."
"ते आमच्या गुप्तचर यंत्रणा आणि अत्याधुनिक ट्रॅकिंग सिस्टीमपासून वाचू शकले नाही. इस्रायलच्या साथीनं केलेल्या या कारवाईत त्यांना किंवा त्याच्यासोबत मारल्या गेलेल्या इतर नेत्यांनाही काहीही करता आलं नाही."

फोटो स्रोत, Reuters
"इराणच्या नागरिकांसाठी ही त्यांचा देश परत मिळवण्याची आतापर्यंतची सर्वात मोठी संधी आहे. त्यांचे अनेक IRGC, लष्करी अधिकारी आणि इतर सुरक्षा तसंच पोलीस दलही आता लढण्यास इच्छुक नसल्याचं आमच्या कानावर येत आहे. ते आमच्याकडे संरक्षण (इम्युनिटी) मागत आहेत. मी काल रात्री म्हटल्याप्रमाणं, 'त्यांना आता संरक्षण मिळू शकतं, परंतु नंतर त्यांना फक्त मृत्यूच मिळेल."
"आयआरजीसी आणि पोलीस इराणच्या देशभक्तांबरोबर एकत्र येतील आणि एकसंघपणे देशाला पात्र असलेल्या महानतेकडं नेतील, अशी आम्हाला आशा आहे.
ही प्रक्रिया लवकरच सुरू झाली पाहिजे, कारण केवळ खामेनी मरण पावले नसून, देश एका दिवसात मोठ्या प्रमाणात नष्ट झाला आहे, किंबहुना जवळजवळ पूर्णच नष्ट होत आला आहे."
"तरीही, मध्य पूर्व आणि जगात शांतता राखण्यासाठीचं ध्येय साध्य करण्यासाठी आणखी आठवडाभर किंवा गरजेनुसार जोरदार आणि अचूक बॉम्बहल्ले सुरूच राहतील."
इराणमध्ये आनंद साजरा?
दरम्यान, इराणच्या काही नागरिकांनी कारजमधील रस्त्यांवर उतरत सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूचं वृत्त आल्यानंतर आनंद व्यक्त केल्याचे काही व्हीडिओ सोशल मीडियावर समोर येत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेला आणि बीबीसी पर्शियननं सत्यापित केलेल्या एका व्हीडिओमध्ये कारजमधील काही इराणी लोक सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूच्या वृत्ताचा आनंद साजरा करत असल्याचे दिसत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा करण्यापूर्वीच हा आनंद साजरा केल्याचं समोर आलं.
'लवकरच महान राष्ट्रीय उत्सव'
इराणचे शेवटचे शाह (राजा) यांचे निर्वासित पुत्र रझा पहलवी यांनी अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाचं स्वागत केलं आहे.
"आपल्या काळातील रक्तपिपासू झहक (इराणी पौराणिक कथांमधील एक दुष्ट राजा) असलेले अली खामेनी हे इराणच्या हजारो धाडसी मुला-मुलींचे मारेकरी होते. इतिहासाच्या पानांमधून त्यांचं अस्तित्व पुसून टाकण्यात आलं आहे," असं पहलवी यांनी सोशल मीडियावर लिहिलं.
"त्यांच्या मृत्यूनं इस्लामिक रिपब्लिक संपुष्टात आलं आहे आणि लवकरच ते इतिहासाच्या कचऱ्यात टाकले जाईल."

फोटो स्रोत, EPA
पहलवी यांनी इराणी अधिकाऱ्यांना उत्तराधिकारी नियुक्त न करण्याचा इशारा दिला आहे. सैन्य, सुरक्षा आणि पोलिस दलांनी लोकांच्या साथीनं एकत्र येण्याची ही अखेरची संधी असल्याचं ते म्हणाले.
"ही आपल्या महान राष्ट्रीय उत्सवाची सुरुवात आहे, पण हा शेवट नाही," असंही ते म्हणाले.
1979 च्या क्रांतीनंतर पहलवी त्यांच्या पालकांसोबत आणि भावंडांसोबत निर्वासित झाले आणि तेव्हापासून ते अमेरिकेतच राहत आहेच.
खामेनी 'जिवंत' असल्याचा इराणने केला होता दावा
इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात वरिष्ठ इराणी अधिकारी आणि लष्करप्रमुख मारले गेल्याचा दावा करणारे वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी फेटाळून लावलं होतं.
याशिवाय इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची यांनी एनबीसी न्यूजला सांगितलं होतं की, त्यांच्या माहितीनुसार इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनी 'जिवंत' आहेत.
इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणने "कदाचित एक किंवा दोन कमांडर गमावले" असू शकतात, असंही त्यांनी नमूद केलं होतं.
अरागची यांच्या मते, अमेरिका आणि इस्रायलने आपले हल्ले थांबवले तर इराण तणाव कमी करण्यास आणि चर्चा करण्यास तयार आहे.
"सध्या" कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे सांगताना अरागची म्हणाले होते की, "अमेरिकेला आमच्याशी बोलायचे असेल, तर माझ्याशी कसा संपर्क साधायचा हे त्यांना माहीत आहे."
इराण या प्रदेशातील अमेरिकन तळांवर हल्ले करत असल्याचंही अरागची यांनी सांगितलं होतं. तसेच त्यांनी याला हे "स्वसंरक्षणासाठी" असल्याचं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचे कार्यकारी उपप्रतिनिधी मोहम्मद जाफर केम्पनियाह यांनी एक्सवरील पोस्टमध्ये त्यांचे राष्ट्राध्यक्ष सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं.
इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे पुत्र युसुफ पेझेश्कियान यांनी टेलिग्रामवर लिहिलं होतं की, "त्यांचे प्रयत्न यावेळीही अयशस्वी ठरले."
इराणी लष्कराने आपले कमांडर मेजर जनरल अमीर हातामी यांच्या मृत्यूच्या वृत्ताचेही खंडन केलं होतं. तसेच, फार्स न्यूज एजन्सीने म्हटलं होतं की, संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषद (SNSC) प्रमुख अली लारिजानी यांना कोणतीही इजा झालेली नाही.
इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (IDF) म्हटलं होतं की, इराणमधील त्यांच्या हल्ल्यांमध्ये मोठे नेते आणि सुरक्षा अधिकारी ज्या ठिकाणी जमले होते, त्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. मात्र, त्यांच्या नेत्यांना हानी पोहोचलेली नाही, ते सुरक्षित आहेत.
इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मुलींच्या शाळेचा फोटो शेअर करत काय म्हटलं?
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एक्सवर एका इमारतीचा फोटो शेअर केला होता, ज्यामधून धूर निघताना दिसत आहे.
अराघची यांनी लिहिलं होतं की, ही इमारत इराणच्या दक्षिणेकडील मुलींची एक प्राथमिक शाळा होती, जी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.
त्यांनी पुढे होतं लिहिलं, "येथे (शाळेवर) भरदिवसा बॉम्बस्फोट करण्यात आला. त्यावेळी येथे लहान मुले उपस्थित होती. या ठिकाणीच डझनभर निष्पाप मुले मारली गेली आहेत. इराणी जनतेविरुद्ध झालेल्या या गुन्ह्यांना योग्य उत्तर दिलं जाईल."

फोटो स्रोत, X/@araghchi
इराणच्या सरकारी इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सी (IRNA)च्या वृत्तानुसार, 28 फेब्रुवारी रोजी इराणच्या दक्षिणेकडील होर्मोज्गान प्रांतातील मिनाब काउंटीमधील मुलींच्या एका प्राथमिक शाळेवर इस्रायली हल्ला झाला.
शिक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने एजन्सीने सांगितलं होतं की, या हल्ल्यात 53 जणांचा मृत्यू झाला असून 63 जण जखमी झाले आहेत.
प्रवक्त्याने सांगितलं होतं की, इतर संभाव्य पीडितांचा शोध घेण्यासाठी शाळेतील ढिगारा हटविण्याचं काम सुरू आहे.
'मुलींच्या शाळेवरील हल्ल्यातील मृतांचा आकडा 53 वर'
इराणच्या सरकारी इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सी (IRNA)च्या वृत्तानुसार, मुलींच्या एका शाळेवरील हल्ल्यात मृतांची संख्या वाढून 53 वर पोहोचली.
या वृत्तसंस्थेने देशाच्या शिक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने ही माहिती दिली होती.
हा हल्ला इराणच्या दक्षिणेकडील होर्मोज्गान प्रांतातील मिनाब काउंटीमधील मुलींच्या प्राथमिक शाळेवर झाल्याची माहिती एजन्सीने दिली होती.

फोटो स्रोत, Reuters
शिक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एजन्सीला सांगितलं होतं की, शनिवारी शाळेवर "तीन क्षेपणास्त्र हल्ले" करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये 63 जण जखमी झाल्याचंही त्यांनी माहिती देताना सांगितंल.
इतर संभाव्य पीडितांचा शोध घेण्यासाठी शाळेतील ढिगारा हटवला जात असल्याचंही ते म्हणाले होते.
बीबीसी स्वतंत्रपणे याची पडताळणी करू शकलं नाही. कारण, आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांना अनेकदा इराणमध्ये व्हिसा नाकारला जातो. त्यामुळे देशातील सध्याच्या घडामोडींबाबत माहिती मिळवण्याला मर्यादा येतात.
इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आखाती देशांना काय म्हटलं?
इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटलं होतं की, इराण स्वत:चे रक्षण करण्यासाठी आपल्या अधिकारात असलेल्या सर्व लष्करी मार्गांचा वापर करेल.
एका निवेदनानुसार, अरागची यांनी सौदी अरेबिया, यूएई, कतर, कुवेत, बहरीन आणि इराक या देशांतील आपल्या समकक्षांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आहे.

फोटो स्रोत, EPA
या निवेदनानुसार या देशांना सांगण्यात आलं होतं की, इराण आपल्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी "स्वसंरक्षणाच्या कायदेशीर अधिकाराअंतर्गत आपल्या सर्व संरक्षणात्मक आणि लष्करी क्षमतांचा" वापर करेल.
निवेदनानुसार, अरागची यांनी या देशांना आठवण करून दिली की, इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांसाठी "त्यांच्या सुविधा आणि प्रदेशांचा गैरवापर रोखणे, ही त्यांची जबाबदारी आहे."
एअर इंडियाकडून मार्गदर्शक सूचना जारी
इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने प्रवासासंदर्भात मार्गदर्शक सूचना (अॅडव्हायजरी) जारी करण्यात आल्या.
एअर इंडियाने म्हटलं होतं, "मध्य पूर्वेतील काही भागांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, त्या भागांतील सर्व ठिकाणांसाठी एअर इंडियाच्या सर्व उड्डाणांना स्थगिती देण्यात आली आहे."
"आम्ही आमच्या प्रवाशांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च सुरक्षा मानके राखण्यास कटिबद्ध आहोत."
एअर इंडियाने म्हटलं होतं की, त्यांचे पथक प्रवाशांना आवश्यक ती सर्व मदत करतील.
"ताज्या अपडेट्ससाठी कृपया आपल्या उड्डाणाचा स्टेटस/ फ्लाइट्सची स्थिती https://airindia.com/in/en/manage/flight-status.html येथे तपासा. अधिक माहितीसाठी आमच्या 24X7 कॉल सेंटरशी +91 1169329333, +91 1169329999 या क्रमांकांवर संपर्क साधा."

फोटो स्रोत, ANI
सुरुवात कशी झाली?
इस्रायलने इराणवर 'प्री-एम्प्टीव्ह अटॅक' अर्थात 'प्रतिबंधात्मक हल्ला' केला आहे, अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली होती.
'प्री-एम्प्टीव्ह अटॅक' म्हणजे असा हल्ला ज्यामध्ये हल्ला करणाऱ्या देशाला असं वाटतं की, दुसरा देश त्याच्यावर हल्ला करणार आहे.
त्यासाठी आधीच समोरच्या देशावर हल्ला केला जातो.
इस्रायलने इराणविरुद्ध असाच 'प्री-एम्प्टीव्ह अटॅक' सुरू केला.
आज सकाळी एका निवेदनात, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी संपूर्ण इस्रायलमध्ये "विशेष आणि कायमस्वरूपी आणीबाणीची परिस्थिती" जाहीर केली.
तर दुसरीकडे, या हल्ल्यासाठी आपण इस्रायलला सहकार्य केलं असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं.
नुकतंच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच ट्रुथ सोशलवर आठ मिनिटांचा व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी इराणवरील हल्ल्यात अमेरिका सहभागी असल्याचं स्पष्ट केलं.
इस्रायली लष्कराने देशभरातील अनेक भागात हवाई हल्ल्याचे सायरन वाजवले आहेत, जेणेकरून लोक इराणकडून प्रतिहल्ला म्हणून होणाऱ्या कारवाईसाठी तयार राहतील.
भारतीय राजदूतांनी जारी केल्या गाईडलाईन्स
इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि इस्रायल अशा दोन्ही देशातील दूतावासांनी भारतीय नागरिकांसाठी सुरक्षेसाठीच्या गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या.

फोटो स्रोत, X/India in Iran & India in Israel
त्यांनी सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि नेहमीच सतर्क राहण्याचा सल्ला दिला.
तसेच, मदतीसाठी हेल्पलाईन नंबर्सही प्रसिद्ध केले.
इस्रायलवरील हल्ल्यात अमेरिकाही सहभागी
'ट्रुथ सोशल'वर पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, अमेरिकेने इराणमध्ये 'मोठ्या लष्करी कारवाया' सुरू केल्या आहेत.
इराणवर हल्ला करायचा की नाही याबद्दल अमेरिकेनं अद्याप 'अंतिम निर्णय' घेतलेला नाही, असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितलं होतं. परंतु, आण्विक चर्चेदरम्यान त्यांच्या वाटाघाटींच्या भूमिकेवर ते 'खूश नाहीत' असंही त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
"आम्ही डील करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. आम्ही बरेच प्रयत्न केले."
पुढे ते म्हणाले की, "आम्ही त्यांचे मिसाईल्स नष्ट करणार आहोत आणि त्यांची मिसाईल इंडस्ट्री जमिनीवर कोसळणार आहे. ती पूर्णपणे नष्ट केली जाईल."
ट्रम्प म्हणाले की, इराण 'आपल्याकडे जे आहे ते देण्यास तयार नाही.'
इराण 'अण्वस्त्रे बाळगू शकत नाही' असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, IRNA/ANI Photo
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डच्या सदस्यांना, सशस्त्र दलांना आणि सर्व पोलिसांना, मी आज रात्री सांगू इच्छितो की, तुम्ही तुमची शस्त्रं खाली ठेवावीत आणि पूर्ण प्रतिकारशक्ती एकवटावी. अन्यथा, तुम्हाला निश्चितपणे मृत्यूला सामोरं जावं लागेल. म्हणून, तुमची शस्त्रं खाली ठेवा. तुमच्याशी पूर्ण प्रतिकारशक्तीने योग्य वागणूक केली जाईल, अन्यथा तुम्हाला निश्चितपणे मृत्यूला सामोरं जावं लागेल."
"शेवटी, इराणच्या महान, अभिमानी लोकांना, मी आज या रात्री सांगू इच्छितो की, तुमच्या स्वातंत्र्याची वेळ जवळ आली आहे. आश्रय घ्या. तुमचे घर सोडू नका. बाहेर खूप धोकादायक परिस्थिती आहे. सर्वत्र बॉम्ब पडतील. जेव्हा आपण हे संपवू तेव्हा तुमचे सरकार ताब्यात घ्या. ते तुम्हाला घ्यायचे असेल. कदाचित, कित्येक पिढ्यांपासूनची ही तुमची एकमेव संधी असेल."
"अनेक वर्षांपासून, तुम्ही अमेरिकेची मदत मागत आहात, परंतु तुम्हाला ती कधीच मिळाली नाही. मी आज रात्री जे करण्यास तयार आहे ते करण्यास कोणताही राष्ट्राध्यक्ष तयार नव्हता. आता तुमच्याकडे एक राष्ट्राध्यक्ष आहे जो तुम्हाला जे हवं आहे ते देत आहे. तर तुम्ही कसा प्रतिसाद देता ते पाहूया. अमेरिका तुम्हाला प्रचंड ताकदीने आणि विस्मयकारी शक्तीने पाठिंबा देत आहे..."
तेहरानमध्ये तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले - इराणी मीडिया
इराणच्या मीडियानुसार, तेहरानच्या मध्यभागी तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले.
फार्स न्यूज एजन्सीने वृत्त दिलं आहे की, तेहरानच्या मध्यभागी अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले.
एजन्सीने तेहरानच्या मध्यभागी झालेल्या तीन स्फोटांचे फोटोही प्रसिद्ध केले.

फार्स न्यूज एजन्सीने म्हटलं की, इराणच्या राजधानीतील रिपब्लिक क्षेत्रात अनेक क्षेपणास्त्रे पडल्याचं वृत्त त्यांना मिळालं आहे.
तेहरानच्या उत्तर आणि पूर्वेला स्फोट झाला असल्याचं इराणी माध्यमांनी सांगितलं.
'आयडीएफ'ने केली महत्त्वाची घोषणा
इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) नुकतंच केलेल्या एका एक्स पोस्टमध्ये म्हटलं की, देशात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टींवर बंदी घातली जाईल.
"परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, आज (शनिवार) सकाळी 8 वाजल्यापासून होम फ्रंट कमांडच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये तात्काळ बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे," असंही निवेदनात म्हटलेलं होतं.

फोटो स्रोत, Fars
"या बदलांअंतर्गत, देशातील सर्व भागात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता शिक्षण, लोकांच्या एकत्र जमण्यावर आणि व्यावसायिक ठिकाणांवर जाऊन काम करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे."
त्यात पुढे म्हटलंय की, "सर्वसामान्य लोकांनी अधिकृत होम फ्रंट कमांड चॅनेलवर जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलं पाहिजे. संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे राष्ट्रीय आपत्कालीन पोर्टल आणि होम फ्रंट कमांड अॅपवर अपडेट केली जातील."
बीबीसीचे जेरूसलेममधील प्रतिनिधी ह्युगो बाचेगा यांचे विश्लेषण
स्थानिक वेळेनुसार, सकाळी 08.15 वाजता (06:15 GMT) इस्रायलमध्ये सायरन वाजले. त्याद्वारे लोकांना संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्याच्या धोक्याची सूचना देण्यात आली.
इराणच्या अणुकार्यक्रमाला आळा घालण्यासाठी आणि युद्ध टाळण्यासाठी अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत. तसंच पुढील आठवड्यात वाटाघाटी सुरू राहण्याची अपेक्षा असताना इस्रायलचे हे हल्ले झाले आहेत.
इराणने चर्चेत काही सवलतीही दिल्या होत्या. पण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे, त्याबद्दल फार उत्साही नसल्याचं म्हटलं होतं. याच ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करून त्यांच्या नेत्यांवर करार स्वीकारण्यासाठी दबाव आणण्याची धमकी दिली होती.

फोटो स्रोत, Fars/BBC Persian
2003 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील इराकवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी मध्य पूर्व भागात मोठ्या प्रमाणात अमेरिकेचं लष्करी तैनात करण्याचे आदेश दिले. पण या लष्करी कारवाईची गरज का आहे, ते त्यांनी स्पष्ट केलं नाही. दरम्यान, इराणनं हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी देशावरील धोके दूर करण्यासाठी हा पूर्व प्रतिबंधात्मक हल्ला असल्याचं म्हटलं आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये, इस्रायलने इराणवर हल्ला केला होता. तेव्हा 12 दिवस युद्ध चाललं. अखेर अमेरिका इस्रायलबरोबर या संघर्षात सहभागी झाली आणि इराणच्या आण्विक तळांना लक्ष्य केलं होतं.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नुकताच इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांमुळं त्यांच्या देशाला निर्माण झालेल्या धोक्याबद्दल इशारा दिला होता. तसंच फक्त इराणच्या अणुकार्यक्रमावर केंद्रित कराराला विरोधही केला होता.
इराणनं त्यांच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर मर्यादा घालण्याबाबत तसेच गाझामधील हमास, लेबनॉनमधील हिजबुल्लाह, इराकमधील मिलिशिया आणि येमेनमधील हुतींसह या प्रदेशातील गटांना पाठिंबा देणे बंद करण्याबाबत चर्चा करण्यास नकार दिला होता. हा प्रकार त्यांच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं इराणनं म्हटलं होतं.
याआधीही झालेला संघर्ष
7 ऑक्टोबर 2023 ला झालेल्या हल्ल्यांचा प्रतिकार म्हणून इस्रायलनं गाझामध्ये हमासविरोधात कारवाई सुरू केली आणि गाझामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बवर्षाव केला होता.
त्यानंतर येमेनमध्ये हूथी बंडखोरांनी इस्रायलविरोधात पावलं उचलली आणि तांबड्या समुद्रातून जाणाऱ्या इस्रायलशी निगडीत जहाजांवर कारवाई सुरू केली.
या हुथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा असल्याचं वारंवार दिसून आलं आहे.
त्याशिवाय इस्रायलला विरोध करणाऱ्या हिज्बुल्ला या लेबननमल्या संघटनेचंही इराणशी घनिष्ठ नातं आहे.
याची परिणती म्हणून डिसेंबर 2023 मध्ये इस्रायल आणि इराणमध्येही तणाव वाढला आणि आरोप प्रत्यारोप होत राहिले.
23 डिसेंबरला इस्रायलशी संबंधित एका केमीकल टँकरवर भारताच्या वेरावळजवळ हल्ला झाला, ते मिसाईल इराणकडून डागण्यात आल्याचा दावा इस्रायलनं केला.
जहाजावर भारतीय खलाशी होते, पण कुठली जीवितहानी झाली नाही.
दोनच दिवसांनी इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्ससचे म्हणजे IRGCचे एक मोठे अधिकारी सय्यद राझी मुसावी यांचा इस्रायली हवाई हल्ल्यात मृत्यू झाला
तर 29 डिसेंबरला इराणनं इस्रायलच्या मोसादसाठी गुप्तहेरी केल्याच्या आरोपाप्रकरणी चौघांन मृत्यूदंड ठोठावला.

इराण-इस्रायलचे परस्परांवर आरोप-प्रत्यारोप
20 जानेवारी 2024 ला IRGCच्या पाच अधिकाऱ्यांवर सीरियाची राजधानी दमासस्कसमध्ये हल्ला झाला, तेव्हा इराणनं इस्रायलकडे बोट दाखवलं होतं.
त्यानंतर 14 फेब्रुवारी 2024 ला इराणच्या एका गॅस पाईपलाईनमध्ये स्फोट झाला, तेव्हा एका अधिकाऱ्यानं इस्रायलला दोष दिला होता.
1 एप्रिल 2024 रोजी सीरियाच्या दमास्कस शहरात इराणच्या दूतावासावर हवाई हल्ला झाला, तेव्हा त्यामागे इस्रायल इसल्याचा दावा इराणनं केला.
या हल्ल्यात इराणच्या कड्स फोर्सचे कमांडर ब्रिगेडियर जनररल मोहम्मद रझा झाहेदीही होते, ज्यांचा लेबननच्या हिज्बुल्ला संघटनेवरही प्रभाव असल्याचं सांगितलं जातं.

फोटो स्रोत, Reuters
इस्रायलनं या दाव्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की त्यांना इथे एकाचवेळी दोन गोष्टी साधायच्या आहेत - इराणकडून हिज्बुल्लाला होणारा शस्त्रपुरवठा थांबवणं आणि सीरियात इराणचं प्राबल्य कमी करणं.
एक एप्रिलच्या त्याच हल्ल्याचं प्रत्युत्तर देऊ असा इशारा इराणनं दिला होता. त्यानंतर शनिवारी 13 एप्रिलला 'इस्रायलशी निगडीत' एक मालवाहू व्यापारी जहाज होरमुझ सामुद्रधुनीतून जात असताना इराणनं ताब्यात घेतलं.
यादरम्यानच इराण इस्रायलवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याया चर्चेला वेग आला. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडननी त्याविरोधात इराणला इशाराही दिला.
मग 14 एप्रिलला इराणनं इस्रायलवर तीनशे क्षेपणास्त्रं आणि ड्रोन डागली, ज्यातली बहुतांश अस्त्रं पाडण्यात आल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे.
या पूर्ण घटनाक्रमात केवळ इराण आणि इस्रायलच नाही तर इतर देशही गुंतले आहेत. 14 एप्रिलच्या हल्ल्यादरम्यान दागली गेलेली काही क्षेपणास्त्र इराक, सीरिया, येमेनमधल्या इराणसमर्थकांनीही दागली होती. ती पाडण्यात इस्रायलला अमेरिका, युके, फ्रान्सनं मदत केली तर जॉर्डननंही त्यांच्या हवाई हद्दीत आलेली काही प्रोजेक्टाईल्स पाडल्याचं म्हटलं आहे.
दोन्ही देशांतील संघर्षाचा इतिहास
काहींना आश्चर्यही वाटेल, पण एकेकाळी हे दोन देश एकमेकांचे सहयोगी होते. मात्र तीन दशकांपासूनन इराण आणि इस्रायलमध्ये वर्चस्वाची चढाओढ किंवा छुपी लढाई सुरू आहे.
पश्चिम आशियातल्या या दोन स्थानिक महासत्तांच्या इतिहासात डोकावून पाहिलं, तर लक्षणीय गोष्टी दिसतात.
1948 साली इस्रायलच्या निर्मितीच्या वेळी या दोन्ही देशांमधले संबंध तुलनेनं बरे होते. याचं कारण म्हणजे दोघांच्या आसपास अरब देश आहेत.
इराणला आपली पर्शियन शिया बहुल देश म्हणून ओळख जपायची आहे आणि इस्रायलला त्यांची ज्यूईश ओळख टिकवायची होती आणि दोघांना अरब वर्चस्व मान्य नाही, असं हे चित्र होतं.
त्याशिवाय इराणचे तेव्हाचे राज्यकर्ते शाह मोहम्मद रझा पहलवींचे पाश्चिमात्य देशांशी चांगले संबंध होते, आणि या देशांचा इस्रायलला पाठिंबा होता.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळेच तुर्कीनंतर इस्रायलला मान्यता देणारा इराण हा दुसरा मुस्लीम देश बनला. पण इराणच्या राज्यकर्त्यांचा इस्रायलला पाठिंबा असला, तरी तेव्हा देशात मोठ्या प्रमाणात इस्रायलचे विरोधकही होते. त्यांनी इस्रायलच्या स्थापनेला विरोध दर्शवत निदर्शनंही केली होती.
1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली, त्यानंतर मात्र चित्र बदललं. इराणनं इस्रायलविरोधाची भूमिका घेतली. तिथून दोन्ही देशांमधले संबंध बिघडत गेले.
इराणला आता इस्रायलचं अस्तित्वच मान्य नाही. इराणचे राष्ट्रप्रमुख आयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलची कॅन्सरशी तुलना केली होती आणि इस्रायलचं समूळ उच्चाटन व्हायला हवं, असं विधानही केलं होतं.
तरीही 1980 च्या दशकात इराण-इराक युद्धात आणि नंतरही सद्दामविरोधात इस्रायलनं इराणला सामरिक मदतही पुरवली होती असा दावा माजी ब्रिटिश परराष्ट्र सचिव जॅक स्ट्रॉ यांनी केला होता.
त्याशिवाय या दरम्यान इराणकडून इस्रायलला तेलपुरवठाही सुरू होता.
पण हळूहळू दोघांमधली स्पर्धा आणि मतभेद विकोपाला गेले. गेल्या तीस वर्षांत वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये इस्रायल आणि इराणनं एकमेकांविरोधात भूमिका घेतली आहे. दोन्ही देशांत अशा काही घटना घडल्या ज्यांत त्यांनी एकमेकांकडे बोट दाखवलं.
दोघांमध्ये कधीही थेट युद्ध झालेलं नाही. पण छुप्या लढाया सुरू राहिल्या आणि अलीकडे त्या वाढल्या आहेत.गेल्यावर्षी दोन्ही देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता आणि त्यानंतर शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली होती.
ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











