अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये नेमकं काय चाललंय? दोन्ही देशांमध्ये संघर्ष का वाढतोय?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, योगिता लिमये
    • Role, दक्षिण आशिया आणि अफगाणिस्तान प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

काबूल येथील डिस्ट्रिक्ट 6 मधील रहिवाशांना गुरुवारी (26 फेब्रुवारी) रात्री अचानक एका स्फोटामुळे जाग आली. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी घराबाहेर धाव घेतली, तेव्हा त्यांना आकाशातून जेट विमान उडत असल्याचा आवाज ऐकू आला.

त्या रात्री दोन्ही शेजारी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार वाढला होता. पाकिस्तानने अफगाणिस्तानावर हवाई हल्ले केले. त्यात राजधानी काबूलसह पक्तिया आणि कंदहार प्रांतांमध्येही हल्ले झाले. कंदहार तालिबान चळवळीचे जन्मस्थान आणि गड मानले जाते.

अनेक महिन्यांपासून दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष सुरू आहे, तणावाचे वातावरण आहे. परंतु, हल्ला कोणी सुरू केला याचं उत्तर तुम्ही हा प्रश्न कोणाला विचारता यावर अवलंबून आहे.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

आदल्या रात्री, अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने सांगितलं की, त्यांनी सीमेजवळील पाकिस्तानी सैन्याच्या ठिकाणांवर एक मोठं ग्राऊंड ऑपरेशन सुरू केलं.

त्यांनी काही चौक्या काबीज केल्याचा दावा केला. तसेच काही पाकिस्तानी सैनिकांना पकडल्याचे आणि ठार केल्याचेही ते म्हणाले.

हे हल्ले 'प्रत्युत्तराची कारवाई' म्हणून केल्याचे तालिबान सरकारने म्हटले.

"कारण पाकिस्तानच्या सैन्याने अफगाणिस्तानमध्ये घुसखोरी केली, अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन केलं आणि अनेक सामान्य नागरिक, महिला आणि मुलांचा यात मृत्यू झाला," असा दावा त्यांनी केला.

ते मागील आठवड्यात पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांकडे लक्ष वेधतात.

21 फेब्रुवारीच्या रात्री, पूर्वीच्या नांगरहार आणि पक्तिका प्रांतांवर हल्ले झाले होते. या हल्ल्यांमध्ये 13 अफगाण नागरिक ठार झाल्याचे विश्वसनीय वृत्त असल्याचे संयुक्त राष्ट्र संघानं सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तान-अफगाणिस्तानचे एकमेकांवर आरोप

पाकिस्तानचं मत मात्र वेगळं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, त्यांनी नागरिकांना लक्ष्य केलेलं नाही, तर अफगाणिस्तानमधील 'दहशतवादी' छावण्यांना लक्ष्य केलं होतं.

विशेषतः तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) किंवा पाकिस्तानी तालिबानच्या ठिकाणांवर, ज्याला पाकिस्तान सरकार 'फित्ना अल खावारिज' असं म्हणतं.

पाकिस्तानचं म्हणणं आहे की, त्यांच्याकडे टीटीपीचा देशातील अनेक हल्ल्यांमागे हात असल्याचे 'ठोस पुरावे' आहेत. यामध्ये इस्लामाबादमधील शिया मशिदीवरील आत्मघाती बॉम्बस्फोटाचाही समावेश आहे, ज्यात 30 हून अधिक लोक मारले गेले होते.

आयएसने हा हल्ला केल्याचा दावा केला, पण पाकिस्तान म्हणतो की, हा हल्ला टीटीपीनेच केल्याचे त्यांच्याकडे ठोस पुरावे' आहेत.

फोटो स्रोत, Reuters

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पाकिस्तानने दावा केला आहे की, हे हल्ले टीटीपीच्या अफगाणिस्तानमध्ये असलेल्या नेत्यांच्या आणि त्यांच्या हँडलर्सच्या आदेशाने होत आहेत आणि त्यांना तालिबान सरकारचा पाठिंबा मिळत आहे.

तालिबान सरकार नेहमी सांगत आलं आहे की, त्यांचा भूभाग कोणत्याही देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्यासाठी वापरला जात नाही. पाकिस्तानच्या अफगाणिस्तानमधील कारवाया 'अकारण' आहेत.

शेजारील दोन देशांमध्ये शेवटचा मोठा संघर्ष ऑक्टोबर 2025 मध्ये झाला होता. तेव्हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानने काही दिवस सीमेवर एकमेकांवर हल्ले केले होते. पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्लेही केले होते.

कतार आणि तुर्कीये यांनी दोन्ही बाजूंच्या संघर्षात मध्यस्थी केली. दोघांमध्ये दोहा आणि इस्तंबूल येथे चर्चा झाल्या. काही काळ युद्धविराम झाला, परंतु दोन्ही बाजूंमधील शत्रुत्व थांबवण्यात वाटाघाटी अयशस्वी झाल्या.

कूटनीतीत गंभीरपणे सहभागी न झाल्याचा आरोप दोन्ही देशांनी एकमेकांवर केला.

लष्करीदृष्ट्या, पाकिस्तान खूप मजबूत आहे. त्यांच्याकडे शेकडो टँक्स आणि विमानं आहेत आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञानही आहे.

अफगाणिस्तान अपारंपारिक युद्धात तरबेज

अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारकडे पूर्वीच्या अफगाण आणि परदेशी सैन्यांनी सोडलेली लष्करी सामग्री आहे. निर्बंध असूनही, अहवालानुसार त्यांनी काळ्या बाजारातून काही लष्करी उपकरणं खरेदी केली आहेत.

तालिबानकडे विमानं आहेत किंवा पाकिस्तानमध्ये खोलवर हवाई हल्ले करण्याची त्यांची क्षमता आहे, असे कोणतेही पुरावे नाहीत.

परंतु, तालिबानने गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ अमेरिका आणि त्यांच्या नाटो सहकाऱ्यांविरोधात युद्ध केलं आहे. त्यामुळे त्यांना गनिमी आणि अपारंपारिक युद्ध करण्याचा चांगला अनुभव आहे.

अलीकडील संघर्षात, तालिबान सरकारने पाकिस्तानमधील ठिकाणांवर हल्ल्यांसाठी ड्रोन वापरले आहेत. ड्रोन हे स्वस्त, छोटे आणि वापरण्यास सोपे असल्यामुळे हे युद्धाचे स्वरूप बदलतील. ड्रोननं जगभरातील युद्धांमध्ये बदल घडवून आणले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

हा नवीन संघर्ष किती वाढेल हे समजून घेणं कठीण आहे, कारण दोन्ही बाजूंकडून खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही.

तालिबान सरकार परदेशी पत्रकारांना सहज प्रवेश देत नाही. विशेषत: सीमावर्ती भागांतील माहितीची पडताळणी करणं खूपच आव्हानात्मक आहे.

पाकिस्तानमध्येही, सीमावर्ती भागांमधून स्वतंत्रपणे खात्रीशीर माहिती मिळवणं सोपं नाही.

ऑक्टोबर 2025 पासून दोन्ही देशांमधील व्यापार बंद आहे. यामुळे अफगाणिस्तानमध्ये औषधासारख्या आवश्यक वस्तू मिळवणंही कठीण झालं आहे.

भूक, गरिबी आणि तालिबान सरकारच्या कडक निर्बंधाखाली सामान्य अफगाणी लोक जगत आहेत. त्यांच्यासाठी 2021 पासून एक चांगली गोष्ट होती की, 4 दशकाच्या युद्धानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला बॉम्ब पडण्याची भीती नव्हती.

परंतु, गेल्या 6 महिन्यांतील हिंसाचारामुळे लोकांची ही सुरक्षित वाटण्याची भावना आता संपुष्टात आली आहे.

(उस्मान जाहिद आणि महफूज झुबेदे यांचं अतिरिक्त वार्तांकन)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)