पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील संघर्षामध्ये मध्यस्थी करण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील तालिबान यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीत इराणनंतर आता अमेरिकेनेही हस्तक्षेप करण्यासंदर्भात भाष्य केलेलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की, "मी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील युद्धात हस्तक्षेप करू शकतो, पण माझी पाकिस्तानशी चांगली मैत्री आहे."
त्याआधी इराणनेही उभय देशांमध्ये मध्यस्थी करणअयाची तयारी दर्शवलेली होती.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराग़ची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटलंय की, "इराण दोन्ही पक्षांमधील चर्चेत मध्यस्थाची भूमिका बजावण्यासाठी तयार आहे. त्यांनी असेही सांगितले की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांनी चांगले शेजारी म्हणून संवादाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवायला हवा."
सध्या सुरू असलेल्या संघर्षाबाबत अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्हीही देशांनी वेगवेगळे दावे केलेले आहेत.
एकीकडे, पाकिस्तानी चौक्यांवर केलेल्या हल्ल्यात 55 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा तालिबान सरकारने दावा केला आहे.
तर दुसरीकडे, अफगाणिस्तानवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात अनेक तालिबानी सैनिक ठार झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
अफगाणिस्तानमधील 37 ठिकाणांवर हवाई हल्ले; पाकिस्तानचा दावा
अफगाणिस्तानातील '37 ठिकाणांवर' हवाई हल्ले, 331 अफगाण तालिबानी सैनिक ठार आणि 104 चेक पोस्ट उद्ध्वस्त झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी दावा केला आहे की, आतापर्यंत ऑपरेशन 'गदबुल्लाह हक्क' अंतर्गत करण्यात आलेल्या कारवायांमध्ये अफगाण तालिबानचे मोठं नुकसान झालेलं आहे.
त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, 28 फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत:
- 331 जवान ठार
- 500 हून अधिक जखमी
- 104 चेकपोस्ट नष्ट
- 22 चेकपोस्ट ताब्यात
- 163 टँक आणि आर्मर्ड व्हेईकल्स नष्ट
- हवाई हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानमधील 37 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं.
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, 'मी युद्धात हस्तक्षेप करू शकतो, पण...'
"मी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील युद्धात हस्तक्षेप करू शकतो, पण माझी पाकिस्तानशी चांगली मैत्री आहे," असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकारांनी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, "अमेरिका अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धात हस्तक्षेप करू शकते, परंतु, माझी पाकिस्तानशी खूप चांगली मैत्री आहे."

फोटो स्रोत, Getty Images
एका पत्रकारानं ट्रम्प यांना विचारलं की, "पाकिस्ताननं अफगाणिस्तानविरुद्ध युद्ध सुरू केलेलं आहे. त्यांनी तुम्हाला हस्तक्षेप करण्यास सांगितलं आहे का?"
ट्रम्प यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटलं की ते युद्धात हस्तक्षेप करू शकतात. पण ते पुढे म्हणाले की, "तुम्हाला माहिती आहे, माझी पाकिस्तानशी खूप चांगली मैत्री आहे. त्यांच्याकडे उत्तम पंतप्रधान आहेत, उत्तम जनरल आहेत, हे नेते महान आहेत. हे दोघेही असे लोक आहेत ज्यांचा मी खरोखर आदर करतो."
त्यांनी पुढे असंही म्हटलं की, पाकिस्तान चांगली कामगिरी करत आहे.
इराणने व्यक्त केली मध्यस्थीची इच्छा
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील तालिबान यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीत इराणने मध्यस्थी करण्याची इच्छा दर्शवली आहे.
दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराग़ची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले आहे की, इराण दोन्ही पक्षांमधील चर्चेत मध्यस्थाची भूमिका बजावण्यासाठी तयार आहे. त्यांनी असेही सांगितले की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांनी चांगले शेजारी म्हणून संवादाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवायला हवा.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचवेळी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस आणि मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थिती आणि चकमकींवर प्रतिक्रिया दिली आहे.
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी "दोन्ही देशांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे, विशेषत: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यातील त्यांच्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पाळण्याचे" आवाहन केले आहे.
दुसरीकडे, मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी सीमा संघर्ष आणि प्राणघातक हवाई हल्ल्यांनंतर समस्या सोडवण्यासाठी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांनी परस्पर संवाद साधावा, असं आवाहन केलं आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तानचे एकमेकांवर हल्ले
22 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून गुरुवारी रात्री (25 फेब्रुवारी) अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील लष्करी तळांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे.
पूर्वेकडील नुरिस्तान, कुनार, नांगरहार आणि आग्नेय प्रांतातील पक्तिया आणि पक्तिका येथील 'डुरंड रेषे'वर जोरदार हल्ले झाल्याचं वृत्त आहे.
त्यासोबतच, अफगाणिस्तानमधील काबूलमध्येही स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आलेले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
एकीकडे, तालिबान सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने 55 पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा दावा आहे की, त्यांनी केलेल्या कारवाईमध्ये 72 तालिबानी सैनिक मारले गेले आहेत.
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी 'आमचा संयम संपला आहे, आता उघड युद्ध होईल,' असं वक्तव्य केलं आहे.
तालिबानने काय म्हटलं?
तालिबान सरकारच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे हल्ले पाकिस्तानी सैन्याच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यासाठी केलेले आहेत.
22 फेब्रुवारी रोजी नांगरहारमध्ये अनेक अफगाण नागरिकांच्या पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्याचा बदला म्हणून हे हल्ले करण्यात आलेले आहेत.
तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी दावा केला आहे की, त्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत तसेच जखमी झाले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
डुरंड रेषेवरील पाकिस्तानी चौक्यांवर केलेल्या हल्ल्यात 55 सैनिक मारल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे.
सोबतच, तालिबानी सैन्याने सीमावर्ती भागातील अनेक पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेण्यात आल्या.
त्यांच्या फेसबूक पेजवरील अनेक पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, त्यांनी नांगरहार, कुनार आणि खोस्त प्रांतांमध्ये पाकिस्तानी सैन्याचं मोठं नुकसान केलेलं आहे आणि अनेक पाकिस्तानी सैनिकांना जिवंत पकडलं आहे.
पाकिस्तानचा प्रतिहल्ल्याचा दावा
अफगाणिस्तानने केलेल्या या हल्ल्याचा प्रतिकार म्हणून सीमेवर प्रतिहल्ला करून प्रत्युत्तर देण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
बीबीसी उर्दूने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने म्हटलंय की, त्यांनी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तालिबान सरकारने केलेल्या लष्करी कारवाईला 'तत्काळ आणि प्रभावी पद्धतीने' उत्तर देण्यात आलेलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तर दुसऱ्या बाजूला, तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी असा दावा केला की, "आमचं सैन्य पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या तळांवर कारवाईसाठी 'व्यापक' अभियान चालवत आहे."
गुरुवारी (25 फेब्रुवारी) पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एका वक्तव्यात म्हटलंय की, "तालिबानने खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर अनेक ठिकाणी 'गोळीबार' केला. यावर पाकिस्तानी सैन्यदलाने योग्य प्रत्युत्तर दिलं."
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे प्रवक्ते मुशर्रफ झैदी यांनी सांगितलंय की, प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात 72 तालिबानी सरकारी सैनिक मारले गेले आहेत आणि 120 जण जखमी झाले आहेत.
पुढे मुशर्रफ झैदी यांनी सांगितलं की, "सीमेवर तालिबान सरकारशी झालेल्या चकमकींमध्ये कोणत्याही पाकिस्तानी चौकीचं नुकसान झालेलं नाही किंवा कोणतीही चौकी ताब्यात घेण्यात आलेली नाही."
याउलट त्यांनी असा दावा केला की, सीमेपलीकडून झालेल्या 'आक्रमणाला' प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने अफगाण तालिबानचे 'मोठे नुकसान' केलेलं आहे.
काबूलमध्ये ऐकू आले स्फोटांचे आवाज
बीबीसीला दोन्ही बाजूंनी होणाऱ्या या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी करता आलेली नाही. पण, काबूलमधून जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत.
तालिबान सरकारने ड्युरंड रेषेवरील पाकिस्तानच्या लष्करी चौक्यांवर हल्ला केला असल्याचं सांगितल्यानंतर काही तासांतच 'असोसिएटेड प्रेस'चे पत्रकार आणि अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील रहिवाशांनी सांगितलंय की, शहरात जोरदार स्फोट झाले आहेत.
एएफपीच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे की, पहाटे 1 वाजता झालेल्या स्फोटांनंतर युद्ध विमानांचे आवाजही ऐकू आले.
काबूलमधील एका रहिवाशाने नाव न सांगण्याच्या अटीवर एएफपीला सांगितलंय की, त्याने आठ स्फोट ऐकले.
"पहिले दोन स्फोट आमच्यापासून खूप दूर होते, परंतु शेवटचा आमच्या इतका जवळ होता की त्यामुळे घर हादरले. प्रत्येक स्फोटानंतर आम्हाला युद्ध विमानांचे आवाज ऐकू येत होते."
या वृत्तात असंही म्हटलं आहे की स्फोटांनंतर, पहाटे अडीच वाजेपर्यंत गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते.

फोटो स्रोत, Getty Images
"घाबरट पाकिस्तानी सैन्याने काबूल, कंधार आणि पक्तियामधील काही ठिकाणी बॉम्बहल्ला केला आहे. परंतु, आम्ही देवाचे आभार मानतो, कारण कोणालाही इजा झाली नाही," असं वक्तव्य तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद केलेलं आहे.
पुढे त्यांनी म्हटलं की, काबूल, कंधार आणि इतर प्रांतांमध्ये पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर, कंधार आणि हेलमंडजवळ पुन्हा एकदा व्यापक प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू करण्यात आले आहेत.
'संयम संपला, आता उघड युद्ध'
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला उद्देशून लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आमचा संयम संपला आहे" आणि आता "खुल्या पद्धतीने युद्ध" होईल.
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये त्यांनी तालिबान सरकारवर 'जगभरातील दहशतवादी अफगाणिस्तानात गोळा करत असल्याचा' आरोप केला आणि काबूलमधील सत्ताधारी 'दहशतवाद निर्यात करत आहेत,' असाही आरोप केला.

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या बाजूला, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांनी पाकिस्तानने कंदहार आणि पक्तिया प्रांतांमध्ये तसेच राजधानी काबूलमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांचा निषेध केला आहे.
"अफगाणिस्तान सर्व प्रकारच्या परिस्थितीत पूर्ण एकतेने त्यांच्या प्रिय देशाचं रक्षण करेल आणि बळाला धैर्याने प्रत्युत्तर देईल," असं त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)












