बीबीसी मराठीचे पत्रकार अल्पेश करकरे यांचा 'इंडियन लँग्वेज रिपोर्टर ऑफ द इयर' पुरस्काराने गौरव

वाचन वेळ: 3 मिनिटे

दिल्लीमध्ये 10 व्या इमका (IIMCAA) पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.

दिल्लीतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे देशभरातील गुणवंत पत्रकारांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं.

आयआयएमसी ही पत्रकारिता आणि जनसंवाद क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था आहे. त्यामुळे या पुरस्करांची दरवर्षी मोठी चर्चा होत असते.

दिल्लीत पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सौम्या पिल्लई यांना 'जर्नालिस्ट ऑफ द इयर' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

तर भारतीय भाषांमध्ये उत्तम वार्तांकन केल्याबाबत बीबीसी मराठीचे पत्रकार अल्पेश करकरे यांना 'इंडियन लँग्वेज रिपोर्टर ऑफ द इयर' (ब्रॉडकास्ट) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार समितीच्या पत्रकानुसार, महाराष्ट्रातील प्रभावी ग्राउंड रिपोर्टिंगसाठी अल्पेश अरविंद करकरे यांची 'इंडियन लँग्वेज रिपोर्टर ऑफ द इयर – ब्रॉडकास्ट' म्हणून निवड करण्यात आली आहे.

मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना भेडसावणाऱ्या प्रवासाच्या अडचणी, जेएनपीटी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावांच्या दीर्घकाळ प्रलंबित पुनर्वसनाच्या समस्या आणि अलीबागमधील पर्यावरणीय गैरव्यवस्थापन यांसारख्या मुद्द्यांना त्यांनी त्यांच्या बातम्यांमधून अधोरेखित केलं.

त्यांच्या बातम्यांमुळे या समस्यांवर एका नवीन चर्चेला तर चालना मिळालीच पण या समस्या निवारणासाठी सुद्धा नंतर प्रयत्न करण्यात आले.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

यासोबतच कृषी विषयांच्या उत्तम वार्तांकनासाठी लक्ष्मी देवी आयरे, प्रिंट रिपोर्टिंगसाठी सफिना वाणी, ब्रॉडकास्ट रिपोर्टिंगसाठी मेधा यादव, उत्तम निर्माता (प्रोड्युसर) म्हणून मोहम्मद असद, प्रिंट रिपोर्टिंगसाठी सौरव कुमार बोरा, स्वतंत्र रिपोर्टर डिजिटल व्हिडिओसाठी तंजील आसिफ यांनाही विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.

ज्युरी स्पेशल मेन्शन पुरस्कार गरिमा सिंग, नंथा किशोर आणि गार्गी सत्पथी यांना देण्यात आले. या विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे आणि 10 हजार ते 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंतची रोख बक्षिसं देण्यात आली.

याप्रसंगी, 50 वर्षांपूर्वी आयआयएमसीमधून उत्तीर्ण झालेले एमसी जोशी आणि 25 वर्षांपूर्वी उत्तीर्ण झालेले 74 माजी विद्यार्थी यांना सुवर्ण आणि रौप्य महोत्सवी पुरस्कार देण्यात आले.

सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या बातम्यांचा सन्मान

अल्पेश यांनी एका बातमीच्या माध्यमातून मुंबईतील अपंग नागरिकांसाठी असणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेची स्थिती तपासली.

मुंबई हे आर्थिक आणि आधुनिक शहर असलं तरी व्हीलचेअरवर असलेल्यांसाठी लोकल ट्रेन, बस, टॅक्सी, फुटपाथ आणि सार्वजनिक सोयीसुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत हे त्यांच्या रिपोर्टमध्ये समोर आलं.

सार्वजनिक इमारतींमध्ये असणाऱ्या पायऱ्या, अडथळे आणि अयोग्य पद्धतीने बांधलेल्या रॅम्पमुळे अपंगांसाठी दैनंदिन आयुष्य किती अवघड होऊन बसलं आहे हे अल्पेश यांनी त्यांच्या बातमीतून मांडलं.

दुसऱ्या रिपोर्टमध्ये अल्पेश यांनी अलिबागच्या गणेशपट्टीतली एक महत्त्वाची गोष्ट सांगितली.

या गावातल्या गेल्या दोन पिढ्यांनी जे गाव पाहिलं ते आता नवी पिढी पाहू शकत नाही. कारण कांदळवनाने आक्रमण केल्याने गावाचं अस्तित्व धोक्यात आलंय.

हातची सुपीक जमीन गेली आणि राहती घरं गेली अशा स्थितीतले 22 गावांमधले जवळपास 15 हजार रहिवासी क्लायमेट रेफ्युजी आहेत.

या लोकांकडे कागदोपत्री जमीन आहे पण ती कसता येत नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. पर्यावरणीय बदल आणि त्यामुळे निर्माण झालेल्या जगण्याच्या संकटाची गोष्ट या बातमीच्या माध्यमातून अल्पेश यांनी सांगितली.

फोटो कॅप्शन, गणेशपट्टी

तिसऱ्या रिपोर्टमध्ये अल्पेश यांनी 40 वर्षापूर्वी जेएनपीए बंदराच्या उभारणीवेळी पुनर्वसित झालेल्या उरणच्या हनुमान कोळीवाड्याचं वास्तव दाखवलं.

या लोकांचं तात्पुरतं पुनर्वसन उरणच्याच बोरी पाखाडीत करण्यात आलं होतं. पण अजूनपर्यंत कायद्याप्रमाणे त्यांचं ना कायमस्वरूपी पुनर्वसन झालं. ना त्यांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)