दिशा रवी: TRP साठी मला प्रसारमाध्यमांनी गुन्हेगार ठरवलं

दिशा रवी

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 3 मिनिटे

बंगळुरूमधील 22 वर्षीय पर्यावरणविषयक कार्यकर्ती दिशा रवी हिला गेल्या महिन्यात जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच तिनं तिचं म्हणणं सगळ्यांसमोर मांडलं आहे.

दिशानं तिच्या ट्विटर हँडलवरून चार पानांचं पत्र ट्वीट केलंय. या पत्रातून दिशानं प्रसारमाध्यमांवर टीका केलीय आणि पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानलेत.

दिशा रवी 'फ्रायडे फॉर फ्यूचर' या अभियानाची संस्थापक सदस्य आहे. तिला दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने बंगळुरूमध्ये अटक केलं होतं. गेल्या महिन्यातच दिशाला जामीन मिळाला. त्यानंतर ती पहिल्यांदाच व्यक्त झालीय.

"जे सर्वकाही सत्य वाटतं, ते सर्व सत्यापासून खूप दूर असल्यासारखं वाटतं. दिल्लीतलं धुकं, पटियाला कोर्ट आणि तिहार जेल," असं दिशानं पत्रात म्हटलंय.

जर दिशाला कुणी विचारलं असतं की, पाच वर्षांनंतर तू कुठे असशील? तर ती म्हणते, माझं उत्तर 'तुरुंग' हे तर नक्कीच नसतं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"तिथं असताना मला कसं वाटत होतं, हे मी स्वत:लाच विचारत होते. मात्र, माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मला वाटत होतं की एकच मार्ग आहे, ज्यातून याला मी तोंड देऊ शकत होते. तो मार्ग म्हणजे, हे सगळं फक्त माझ्याबाबतीत घडत नाहीये. म्हणजे, 13 फेब्रुवारी 2021 रोजी पोलीस माझ्या दारापाशी आले नव्हते, माझा फोन घेतला नव्हता, मला अटक केली नव्हती, मला पटियाला हाऊस कोर्टात घेऊन गेले नव्हते, माध्यमं त्या खोलीत त्यांच्यासाठी जागा शोधत नव्हते," असं दिशा रवीनं पत्रात म्हटलंय.

दिशा रवी

फोटो स्रोत, DISHA RAVI

दिशानं पुढे लिहिलंय की कोर्टात काय बोलायचं हेही माहित नव्हतं आणि जोपर्यंत हे समजून घ्यायचं, तोवर पाच दिवसांच्या कोठडीत पाठवण्यातही आलं होतं.

"यात काहीच आश्चर्याची बाब नाही की, त्यानंतर माझ्या हक्कांची पायमल्ली झाली, माझे फोटो माध्यमांमध्ये पसरले, मला गुन्हेगार ठरवलं गेलं आणि तेही कोर्टाद्वारे नाही, तर टीआरपी हवं असलेल्या टीव्ही स्क्रीनवरून. त्यांच्या विचारांनी काल्पनिक गोष्टी रचल्या गेल्या," असं दिशा म्हणते.

मानवतेची तुलना पर्यावरणाशी करत दिशा म्हणते की, कधीही न संपणाऱ्या या आमिष आणि उपभोगाविरोधात जर वेळीच आपण पावलं उचलली नाही, तर आपण विनाशाच्या जवळ जात आहोत.

दिशा रवी यांनी यावेळी तिच्यासोबत राहिलेल्या लोकांचे आभार मानले. "मी नशीबवान होती, कारण प्रो-बोनो (जनहित) कायदेशीर मदत मिळाली. मात्र, त्यांचं काय, ज्यांना मिळतही नाही? त्या लोकांचं काय, ज्यांच्या व्यथांचं कधी मार्केटिंग होऊ शकत नाही? त्या मागासलेल्या लोकांचं काय, ज्यांना टीव्ही टाइमच्या योग्यतेचे मानले जात नाहीत?"

"विचार कधीच मरत नाहीत, आणि सत्य बाहेर येण्यास कितीही वेळ लागो, पण बाहेर येतंच," असं दिशा लिहिते.

नेमकं काय झालं होतं?

ग्रेटा थनबर्गने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर दाखल झालेल्या तक्रारीसंदर्भातील दिशाच्या रुपानं पहिली अटक होती.

बेंगळुरूमधील एक प्रसिद्ध कार्यकर्त्या तारा कृष्णास्वामी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं की, "पर्यावरण-संरक्षणाशी संबंधित अनेक अभियानांसंदर्भात आम्ही एकमेकांशी चर्चा केलेली आहे. पण मी तिला व्यक्तीशः ओळखत नाही. पण ती कधीही कायद्याचं उल्लंघन करत नाही, एकदाही तिने तसं केलेलं नाही, हे मात्र मी प्रत्येक वेळी पाहिलेलं आहे."

दिशा रवी

फोटो स्रोत, AFP VIA GETTY IMAGES

दिल्ली पोलिसांनी दिशा रवीला न्यायालयात नेल्यावर असं सांगितलं होतं की, "दिशा रवीने गुगल डॉक्यूमेन्टद्वारे टूलकिट संपादित केलं असून, या डॉक्टुमेन्टच्या निर्मितीमध्ये आणि प्रसारामध्ये तिची मुख्य भूमिका आहे."

"या प्रकरणात तिने खलिस्तानसमर्थक 'पोएटिक जस्टिस फाउंडेशन'शी हातमिळवणी करून भारतीय राज्यसंस्थेबद्दल वैमनस्य निर्माण करणारी कृती केली असून तिनेच हे टूलकिट ग्रेटा थनबर्गला पाठवलं," असं पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं होतं.

दिशा रवीची सचोटी आणि निष्ठा याबद्दल तिच्या सोबत काम करणारे लोक सातत्याने बोलतात.

तारा कृष्णास्वामी सांगतात, "एवढंच नव्हे, तर सगळ्याच संघटना कायद्याच्या चौकटीत काम करतात. तीदेखील यात पूर्ण सहकार्य करते आणि कायम शांततेच्या मार्गाने काम करते."

काय आहेत आरोप?

दिशावर भारतीय दंडविधानाअंतर्गत देशद्रोह, समाजातील समुदायांतर्गत द्वेष निर्माण करणं आणि गुन्हेगार कारस्थान करणं असे आरोप लावण्यात आले आहेत.

ग्रेटा थनबर्गने 2018 साली पर्यावरण संरक्षण अभियानाद्वारे जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं, तेव्हा दिशाने 'फ्रायडे फॉर फ्यूचर'ची सुरुवात केली होती.

ओढे साफ करणं आणि वृक्षतोड थांबवणं, या संदर्भातील निदर्शनांमध्ये ती सहभागी होत असे.

दिशा रवी

फोटो स्रोत, DISHA RAVI

पर्यावरणविषयक कार्यकर्ते मुकुंद गौडा बीबीसीशी बोलताना म्हणाले, "अजून ती विद्यार्थिनीच आहे. एका वर्कशॉपमध्ये तिच्या प्रेझेन्टेशनने सगळी सिनिअर मंडळी चकित झाली होती. इतक्या कमी वयातल्या मुलीला पृथ्वीच्या सुरक्षिततेसंबंधी इतक्या सहजतेने युक्तिवाद करता येत असल्याबद्दल त्यांना आश्चर्य वाटलं."

आणखी एका कार्यकर्त्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं, "ती इतर विद्यार्थी-विद्यार्थिनींशी आणि लोकांशी दर शुक्रवारी बोलते, त्यांना पर्यावरणाबद्दल जागरूक करते. तिच्यात प्रचंड भूतदया आहे. तिच्यात बरेच गुण आहेत, लोक त्याबद्दल बोलूही शकतात, पण तिला अटक झाल्यामुळे सगळे धास्तावलेत."

तरुण-तरुणींच्या मनात भीती निर्माण झाली आहे, यावर कृष्णास्वामीदेखील दुजोरा देतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)