कामगार हक्क कार्यकर्ते शिवकुमार यांच्या वैद्यकीय तपासणीत गंभीर स्वरूपाच्या जखमांचे व्रण

शिवकुमार

फोटो स्रोत, MAS

    • Author, अरविंद छाबडा
    • Role, बीबीसी पंजाबी
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

मजदूर अधिकारी संघाचे अध्यक्ष शिवकुमार, ज्यांना मागच्या महिन्यात पोलिसांनी अटक केली होती, त्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या रिपोर्टमध्ये अनेक गंभीर तसंच साध्या जखमांचा उल्लेख केलेला आहे.

या अहवालात त्यांच्या हाता-पायांना फ्रॅक्चर, तुटलेली नखं आणि पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर (एखाद्या गंभीर घटनेनंतर मनाला बसणारा धक्का) या गोष्टींची नोंद आहे.

त्यांचे वकील अर्शदीप चीमा यांच्यानुसार, "पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात सादर केलेल्या त्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालात या गंभीर जखमांचा मुद्दा समोर आला आहे."

चीमा यांनी म्हटलं की कोर्टाने हरियाणा पोलिसांकडे जुना अहवालही मागितला आहे ज्यात असा दावा केला होता ती त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम नाही.

मजदूर अधिकारी संघाचे अध्यक्ष असणाऱ्या शिवकुमार यांना मागच्या महिन्यात पोलिसांनी अटक केली होती.

बीबीसीच्या हाती या अहवालाची एक प्रत आली आहे ज्यात शिवकुमार यांना झालेल्या दुखापतीची माहिती दिली गेली आहे. त्यानुसार शिवकुमार यांच्या उजव्या आणि डाव्या पायाला दुखापत, लंगडत चालणं, उजव्या पायावर सूज, डाव्या पायाचा अंगठा काळा पडणं, डाव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी काळी पडणं, मनगटावर सूज आणि डाव्या जांघेत काळेपणा अशा गोष्टींचा उल्लेख आहे.

या अहवालानुसार या दुखापती दोन आठवडे जुन्या आहे आणि कोणत्यातरी तीक्ष्ण हत्याराने या दुखापती झाल्या असाव्यात अशी शक्यता आहे.

या दुखापतींच्या खुणा एका महिन्यानंतरही शिवकुमार यांच्या शरीरावर आहेत ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे असं वकिलांचं म्हणणं आहे. हायकोर्टाने छत्तीसगडच्या डॉक्टरांना वैद्यकीय तपासणी करायला सांगितलं होतं. सोनीपतच्या (हरियाणा) तुरूंग अधिकाऱ्यांनी सांगितलं की शिवकुमार यांना 2 फेब्रुवारीला जेलमध्ये आणलं गेलं होतं.

त्यांच्यावर कलम 148, 149, 323, 384 आणि 506 या कलमांअतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. ही कलम दंगल पेटवणे आणि धमकी देण्याशी संबंधित आहेत.

या व्यतिरिक्त 12 जानेवारीला त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, दंगली आणि गोष्टींसाठी गुन्हा दाखल केला गेला. तिसरा गुन्हाही त्याच दिवशी कुंडली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला गेला.

शिव कुमार

फोटो स्रोत, FACEBOOK/MAS

शिवकुमार यांनी डॉक्टरांना सांगितलं की 12 जानेवारीला दुपारी सोनीपतमध्ये मजदूर संघाच्या धरणे आंदोलनावरून पोलिसांशी वाद झाला होता. त्यांचं म्हणणं आहे की यावेळी ते तिथे उपस्थित नव्हते. शिवकुमार यांनी म्हटलं की, "कुंडली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी येऊन काही लोकांना अटक केली आणि एसएचओनी मित्राला मारहाणही केली."

पोलिसांचं म्हणणं आहे की शिवकुमार 12 तारखेची घटना घडली तेव्हा तिथेच होते. यावेळी फॅक्टरीच्या गेटवर निदर्शनं करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. या घटनेनंतर त्यांच्यावर खंडणीखोरी आणि खुनाचा प्रयत्न अशी कलम लावली गेली आहेत.

कुटुंबाचं म्हणणं काय?

त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की, शिवकुमार आणि संघटनेच्या अन्य सदस्यांवर यासाठी कारवाई केली गेली कारण कुंडली इंस्ट्रियल एरियामध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या हक्कांसाठी आवाज उठवतात. संघटनेच्या इतर सदस्यांनी बीबीसीला सांगितलं की 12 तारखेच्या घटनेच्या दिवशीही संघटनेचे लोक, ज्यांच्यात जास्तकरून मजूरच सहभागी आहेत, कोण्या मजुराचं थकित वेतन मिळवण्यासाठी फॅक्टरीच्या बाहेर निदर्शनं करत होते. इथे पोलिसांनी येऊन लाठीचार्ज केला.

शिव कुमार

फोटो स्रोत, Mas

त्यांचं म्हणणं आहे की, शिवकुमार आपल्या डोळ्यांच्या समस्येमुळे मजुरांची थकबाकी मिळवून देण्यासाठी इतर लोकांसोबत फारसे जायचे नाहीत. ते मुख्यत्वेकरून सिंघु बॉर्डरवर चाललेल्या शेतकरी आंदोलनातल्या आपल्या तंबूत बसलेले असायचे. इथे अनेक मजूर येऊन आपली थकबाकी मिळवून देण्यासाठी संघटनेकडून मदत मागायचे. त्यांचं म्हणणं आहे की 12 तारखेलाही शिवकुमार तिथेच बसलेले होते.

शिवकुमार यांच्या मते 16 जानेवारीला जेव्हा ते शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते तेव्हा पोलिसांना कथितरित्या त्यांची उचलबांगडी केली. पोलिसांनी कथितरित्या त्यांचे दोन्ही पाय बांधले, त्यांना जमिनीवर झोपवलं आणि त्यांच्या तळव्यांवर मारलं. त्यांनी कथितरित्या सपाट लाकडाने मारलं आणि त्यांचे हात बांधले होते. त्यांना तीन दिवस झोपण्याची परवानगी दिली नव्हती. वैद्यकीय अहवालात मानसिक आणि शारीरिक यातनांच गंभीर वर्णन आहे.

पोलिसांनी मारहाणीचे आरोप फेटाळले

दुसरीकडे पोलिसांनी मात्र हे सगळे आरोप खोडून काढले आहेत. त्यांनी म्हटलं की, शिवकुमार यांना 16 नाही तर 23 जानेवारीला अटक केली ज्यानंतर लगेचच त्यांच्या कुटुंबाला कळवण्यात आलं.

शिव कुमार

फोटो स्रोत, MaS

काही दिवसांपुर्वी बीबीसीशी बोलताना सोनीपतच्या कुंडली ठाण्याचे एसएचओ रवि कुमार यांनी म्हटलं की, शिवकुमार यांचं वैद्यकीय तपासणी केली होती आणि त्यांच्याकडे पुरावे आहेत की शिवकुमार यांना कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नाही.

नौदीपही या प्रकरणी अटकेत

24-वर्षीय मजूर हक्क कार्यकर्ता त्या प्रकरणी अटकेत आहेत ज्या प्रकरणी नौदीप कौर यांना अटक झालेली आहे. शिवकुमार हरियाणाच्या कुंडली इंस्ट्रियल एरियात स्थलांतरित मजुरांची थकबाकी मिळवून देणाचं काम करणाऱ्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. नौदीप याच संघटनेच्या सदस्य आहेत.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त