नवाब मलिक : शिवेंद्रराजेच नाही तर राष्ट्रवादी सोडलेले इतर नेतेही पक्षात परत येणार #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. शिवेंद्रराजेच नाही तर राष्ट्रवादी सोडलेले इतर नेतेही पक्षात परत येणार' : नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पक्षांतर केलेल्या नेत्यांची घरवापसी होणार असल्याचा दावा केला आहे. टीव्ही 9 ने हे वृत्त दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटीबाबत नवाब मलिक यांना विचारले असता त्यांनी हा दावा केला. केवळ शिवेंद्रराजेच नव्हे तर पक्ष सोडून गेलेले इतर नेतेही पक्षात पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं.

रविवारी (24 जानेवारी) बारामती येथे अजित पवार आणि शिवेंद्रराजे यांच्यात भेट झाली. गेल्या काही दिवसांमध्ये झालेली ही दोन्ही नेत्यांची तिसरी भेट आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

2. ठाकरे सरकारविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा- राज ठाकरेचा कार्यकर्त्यांना आदेश

'वीज बिलाबाबत घुमजाव करणाऱ्या राज्य सरकार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हे दाखल करा' अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकऱ्यांना दिल्या आहेत. झी 24 तासने हे वृत्त दिले आहे.

राज ठाकरे यांच्या आदेशानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी सरकार आणि ऊर्जामंत्र्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मोठ्या संख्येने ग्राहकांनी वाढीव वीज बिल येत असल्याची तक्रार केली होती. मनसेने जास्तीचे बिल मागे घेण्यासाठी आंदोलन करत सरकारला निवेदनही दिले होते.

यासंदर्भात चौकशी होऊन अतिरिक्तचे बिल ग्राहकांना भरावे लागणार नाही असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. पण आता महावितरणने वीज बिलाची थकबाकी तात्काळ वसुल करण्याचे आदेश दिले आहेत.

3. अर्णब गोस्वामी यांच्याकडून 12 हजार डॉलर्स मिळाल्याचा पार्थो दासगुप्ता यांचा दावा

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याकडून 12 हजार डॉलर्स मिळाले होते अशी माहिती बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यातील आरोपी पार्थो दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना आपल्या लेखी जाबाबात दिली आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिले आहे.

रिपब्लिक टीव्हीच्या बाजूने टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी तीन वर्षांमध्ये पार्थो दासगुप्ता यांना एकूण 40 लाख रुपये मिळाल्याचा दावाही त्यांनी आपल्या जबाबात केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

3,600 पानांचे आरोपपत्र मुंबई पोलिसांकडून 11 जानेवारी रोजी दाखल करण्यात आले. या आरोपपत्रात बार्क फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट आणि वॉट्सअप चॅटचाही उल्लेख केलेला आहे.

आरोपपत्रात एकूण 59 जणांची विधानं आहेत. यात बार्कच्या कर्मचाऱ्यांसही काही केबल ऑपरेटर्सचाही समावेश आहे.

4. न्यूज चॅनेल्ससाठी नियामक असण्यासंदर्भात केंद्र सरकारचे मत काय? - सर्वोच्च न्यायालय

न्यूज चॅनेल्सविरोधातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ असण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आता केंद्र सरकारचे मत मागितले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात केंद्र सरकार, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन, न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड ऑथोरिटी यांना नोटीस पाठवली आहे.

न्यूज आणि टीव्ही चॅनेल्सवर दाखवली जाणारी माहिती किंवा कव्हरेज याबाबत लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ असावे अशा मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

5. कोव्हिड-19 लशींबद्दल अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याची केंद्र सरकारची सूचना

कोव्हिड-19 लशींच्या परिणामकारकतेबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे. कोव्हिड-19 लशीबाबत चुकीची आणि अपुरी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्रं पाठवली आहेत. द हिंदू या वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेली कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सिन या दोन्ही लशी सुरक्षित आणि प्रतिकारक्षम असल्याचं राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाला आढळले आहे, असं अजय भल्ला यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

देशभरात 16 जानेवारीपासून कोव्हिड-19 विरुद्ध लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)