अर्णब गोस्वामींच्या व्हॉट्स ॲपमध्ये दडलंय काय? चॅट्स लीक कसे होतात?

अर्नब गोस्वामी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

कथित टीआरपी घोटाळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या पोलीस तपासात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्क अर्थात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलचे कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यात झालेलं कथित व्हॉट्स अॅप चॅट उघड झाल्यामुळे अर्णब गोस्वामी नवीन वादांत घेरले गेले आहेत.

या मीडियामध्ये चर्चेला आलेल्या या कथित चॅट्समधून लक्षात येतेय अर्णब गोस्वामी यांची केंद्रसरकारमधल्या बड्या मंत्र्यांशी असलेली जवळीक. कारण, बालाकोट एअरस्ट्राईक सारखा महत्त्वाचा सरकारी निर्णय गोस्वामी यांना तीन दिवस आधीच माहीत होता. आणि हे जर खरं असेल तर सरकारी गोपनीयतेचा यातून भंग होत नाही का? आणि केंद्रसरकारशी असलेल्या जवळीकीचा असा गैरवापर अर्णब गोस्वामी करत होते का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. या लीक झालेल्या चॅट्सवरून देशात आणि अगदी पाकिस्तानमध्येही राजकारण सुरू झालंय.

अर्णब यांच्या चॅट्समध्ये दडलंय काय?

कथित टीआरपी घोटाळ्याची चौकशी मुंबई पोलीस करत असताना आपल्या चौकशी अहवालात मुंबई पोलिसांनी हे व्हॉट्स अॅप चॅट्स जोडले आहेत. पाचशे पानांचे हे चॅट आहेत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल अर्थात टीआरपी मोजणारी संस्था बार्कचे कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्या दरम्यानचे.

२०१९च्या फेब्रुवारी ते ऑक्टोबर महिन्यात दोघांमध्ये व्हॉट्स ॲपवरून झालेलं काही संभाषण सोशल मीडियावर अलीकडे चांगलंच व्हायरल झालं आहे.

या चॅटमधून दोन मुख्य मुद्दे समोर येतात.

1) भारतीय वायूसेना बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक करणार ही गोष्ट अर्णब गोस्वामी यांना 3 दिवस आधीच माहीत होती. कारण, एका चॅटमध्ये गोस्वामी म्हणतात, समथिंग बिग विल हॅपन... काहीतरी मोठं होणार आहे. आणि नेहमीच्या हल्ल्यापेक्षा हा हल्ला मोठा असेल.

2) तीच गोष्ट काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविषयी... तिचा उल्लेखही अर्णब यांनी या चॅट दरम्यान केला आहे. Also same time, something big on Kashmir, असं अर्णव यांनी म्हटलं आहे. म्हणजे त्याच दरम्यान, काश्मीरमध्येही काहीतरी मोठं घडेल.

तर बार्कचे सध्या तुरुंगात असलेले सीईओ पार्थो दासगुप्ता अर्णव यांच्याकडून टीआरपी मोजण्याच्या पद्धतीविषयी सरकारी नियमांत बदल होऊ नयेत यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून मदत व्हावी अशी विनंती अर्णब यांना करत आहेत.

त्यासाठी त्यांनी बार्कचं एक गोपनीय पत्र अर्णब यांना पाठवलं आहे. आणि अर्णब यांनी दासगुप्ता यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे. पंतप्रधानांची भेट यासाठी घेणार असल्याचंही त्यांनी कळवलं आहे.

चॅट लीकचं राजकारण होतंय?

कथित टीआरपी घोटाळ्याची सुनावणी मुंबई हायकोर्टात सुरू असतानाच पोलिसांच्या चार्जशिटमध्ये असलेलं हे व्हॉट्स अॅप संभाषण लीक होऊन सोशल मीडियावर व्हायरल झालं.

अर्णब गोस्वामी

फोटो स्रोत, Getty Images

ज्येष्ट वकील प्रशांत भूषण, प्रशांत कनोजिया यांच्यापासून ते पी. चिदंबरम अशा सगळ्याच विरोधीपक्ष नेत्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून या संभाषणाचा संदर्भ देऊन केंद्र सरकारवर टीका केली आहे. खासकरून काँग्रेस पक्षाने हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर उचलून धरला आहे.

यात दोन मुद्दे आहे,

1) केंद्र सरकारच्या गोपनीय आणि महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती एका पत्रकाराला आगाऊ होणं हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचं आहे.

2) आणि एखाद्या पत्रकाराचा केंद्रसरकारच्या उच्चपदस्थांशी आणि साक्षात पंतप्रधानांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांचा त्यांनी टीआरपी घोटाळ्यात करून घेतलेला कथित वापर हा आक्षेपार्ह आहे.

भाजपाने अजून यावर आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली नसली तरी व्हॉट्स अॅप चॅट्सच्या सत्यतेवर काही नेते अविश्वास दाखवत आहेत. तर मुंबई पोलिसांनी कोर्टाच्या पुढच्या सुनावणी पर्यंत अर्णब यांना अटक करणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.

चॅट लीक आणि पाकिस्तानची प्रतिक्रिया आणि रिपब्लिक टीव्हीचं उत्तर

बालाकोट हल्ल्याचा उल्लेख या चॅट लीकमध्ये असल्यामुळे शेजारी पाकिस्तानमध्येही याचे पडसाद नसते उमले तरंच नवल... पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने अधिकृत पत्रक काढून भारत सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

''भारतात समोर आलेल्या अलीकडच्या संभाषणांमुळे भारतातील RSS-BJP सरकारबद्दल आम्ही सातत्याने मांडलेल्या भूमिकेला पुष्टी मिळते. भारतातील सरकार दहशतवादाशी संबंधित आरोप करून आणि त्यासाठी खोटे हल्ले घडवून आणून पाकिस्तान सरकारची प्रतिमा मलिन करत आहे. भारतातील लोकांमध्ये राष्ट्रवाद भडकवून तिथल्या निवडणुका जिंकण्यासाठी ते असली कृत्य करत आहेत."

पाकिस्तानच्या या आरोपांना रिपब्लिक टीव्हीने ट्विटरवर पत्रक काढून उत्तर दिलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"पाकिस्तान सरकारने रिपब्लिक मीडियावर केलेला शाब्दिक हल्ला आत्यंतिक निराशेतून आला आहे. आणि रिपब्लिक मीडियाविरोधात भारतात सुरू असलेल्या कट करस्थानात देशाबाहेरील भारत-विरोधी शक्ती सामील आहेत, हे त्यातून सिद्ध होतं," असं रिपब्लिक टीव्हीने ट्विटरवर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

रिपब्लिक टीव्हीनं त्यांच्या पत्रात काँग्रेस पक्षावर आरोप केले आहेत. "काँग्रेस पक्षाने, जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे, पाकिस्तान सरकारला सामील होऊन भारतीय हिताच्या विरोधात जाऊन खोटं पसरवू नये."

पण, विशेष म्हणजे रिपब्लिक टीव्हीच्या या अख्ख्या आणि सविस्तर प्रसिद्धी पत्रकात जी चॅट्स लीक झाली त्याबद्दल कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाही.

व्हॉट्स ॲप चॅट लीक कशी होतात?

या सगळ्या प्रकरणात व्हॉट्स अॅप चॅट एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड असतानाही लीक कशी होतात असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल.

कारण, एन्क्रिप्टेडचा अर्थच मूळात असा आहे की, संदेश पाठवणारा आणि संदेश ज्याच्यासाठी आहे, अशा दोनच लोकांना तो नीट वाचता यावा. संदेशाचं वहन होताना तो एका अगम्य कोडमध्ये रुपांतरित होतो. त्यामुळे मधल्या कुठल्याही यंत्रणेला किंवा अगदी सरकारी यंत्रणेलाही तो वाचता येत नाही.

मग असे चॅट्स लीक होऊ शकतात का? किंवा लीक झालेले चॅट खरे असू शकतात का?

यापूर्वी रिया चक्रवर्ती अंमली पदार्थ प्रकरणातही नार्कोटिक्स ब्यूरोच्या ताब्यात असलेले रियाचे काही चॅट्स लीक झाले होते. ही नेमकी काय भानगड आहे?

तर चॅट्स सुरक्षितच असतात. पण, अनेकदा आपण व्हॉट्सअॅप चॅटचा बॅक अप आपल्या मोबाईलवर किंवा क्लाऊड स्टोरेजवर घेत असतो. तो बॅक अप कोडच्या भाषेत नाही तर सगळ्यांना वाचता येईल असा भाषेत असतो. आणि तो लीकही होऊ शकतो.

अर्थात, मुंबई पोलीसांकडे असलेले हे चॅट लीक्स नेमके कुठले आहेत, ते खरे आहेत की खोटे, त्याचा कथित टीआरपी घोटाळ्यासाठी न्यायालयीन उपयोग शक्य आहे का, याविषयी अजून स्पष्ट माहिती नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)