अर्णब गोस्वामींसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 3 मिनिटे

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्याच्या प्रकरणात विविध प्रतिक्रिया उमटत असताना आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उडी घेतली आहे.

अर्णब यांच्या अटकप्रकरणी कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला. कोश्यारी यांनी गृहमंत्र्यांसोबत अर्णब यांच्याबाबत चर्चा केली.

अर्णब यांच्या सुरक्षा आणि आरोग्याबाबत कोश्यारी यांनी चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसंच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली.

भाजप आमदार राम कदम अर्णब यांच्या भेटीला

भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम अर्णब गोस्वामी यांना भेटण्यासाठी तळोजा जेलमध्ये दाखल झाले आहेत. अर्णब यांच्याबाबत चौकशी करण्यासाठी आपण तळोजाला जात असल्याचं कदम यांनी सांगितलं.

तत्पूर्वी राम कदम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अर्णबप्रकरणी चर्चा करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना वेळ मागितली होती. पण मुख्यमंत्र्यांनी अद्याप मला वेळ दिली नाही. एका आमदाराला भेटण्यासाठी मुख्यमंत्री का टाळाटाळ करत आहेत, असा प्रश्न राम कदम यांनी विचारला.

तसंच राज्य चालवणाऱ्या सरकारला राज्यपालांनी सूचना करावी लागत आहे, हे सरकारचं अपयश आहे, असंही राम कदम म्हणाले.

अर्णब गोस्वामी यांच्याशी संबंधित आज दोन सुनावण्या

अर्णब यांच्याशी संबंधित दोन सुनावण्या आज (सोमवार, 9 नोव्हेंबर) न्यायालयात होणार आहेत.

यातील एक सुनावणी मुंबई हायकोर्टात तर दुसरी सुनावणी अलिबाग कोर्टात होणार आहे.

अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. ही अटक अवैध असल्याचं सांगत आपल्याविरोधातील FIR रद्द करण्यात यावा. तसंच तत्काळ जामीन मिळावा, या मागणीसाठी अर्णब यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई हायकोर्ट आज त्यांचा निर्णय देण्याची शक्यता आहे.

तसंच दुसरी सुनावणी अलिबाग न्यायालयात होईल. अन्वय नाईक प्रकरणात अलिबाग न्यायालयाने अर्णब यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. पण त्यांना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी अलिबाग पोलिसांनी केली होती. या अर्जावरही आज सुनावणी होईल.

दरम्यान, अर्णब यांना रविवारी(8 नोव्हेंबर) रायगड जिल्ह्यातील तळोजा जेलमध्ये हलवण्यात आलं. त्याआधी तीन रात्री त्यांना अलिबाग मधल्या एका शाळेमध्ये ठेवण्यात आलं होतं, ते कैद्यांसाठीचं क्वारंटाईन सेंटर होतं. या दरम्यान त्यांच्या अटकेविरोधात त्यांच्या वकिलांनी केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाने शनिवारी निर्णय राखीव ठेवला.

मात्र PTI वृत्तसंस्थेने एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितलं की अर्णब न्यायालयीन कोठडीत कथितरीत्या फोन वापरताना आढळले होते. अर्णब हे त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये कुणा दुसऱ्याचाच फोन वापरत होते आणि सोशल मीडियावर सक्रीय होते, हे रायगड पोलिसांचा लक्षात आलं. त्यामुळे त्यांना तळोजा जेलमध्ये हलवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

त्यांचा स्वतःचा फोन 4 नोव्हेंबरलाच ताब्यात घेण्यात आला होता, जेव्हा त्यांना मुंबईस्थित त्यांच्या घरून अटक करण्यात आली होती. कुठल्याही कोठडीत किंवा तुरुंगात मोबाईल फोनचा वापर प्रतिबंधित असतो.

मात्र अर्णब मोबाईल फोन वापरतानाचे, सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्याचे सर्व आरोप खोटे आहेत, असं रिपब्लिक टीव्हीने एक निवेदन जारी करत म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

अर्णब यांच्यासह आणखी दोन जणांना या क्वारंटाईन सेंटरमधून तळोजा तुरुंगात पाठवण्यात आलं. द हिंदू वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, गोस्वामी यांच्यासोबत फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनाही तळोजा जेलमध्ये हलवण्यात आलं.

या दोघांचा त्याच क्वारंटाईन सेंटरमध्ये आयसोलेश पीरियड पूर्ण झाल्यामुळे त्यांनाही हलवण्यात आलं, तसंच ही एक हायप्रोफाईल केस असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अर्णब यांनाही हलवण्यात यावं, अशी मागणी करणारं पत्र रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना लिहिल्याचं द हिंदूने त्यांच्या बातमीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Reuters

जेव्हा रविवारी अर्णब यांना तळोज्याला पाठवलं जात होते, तेव्हा पोलीस व्हॅनमध्ये शिरताना ते अलिबाग पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याबाबत ओरडून सांगत होते. आपल्या जीवाला धोका आहे, वकिलांशी बोलू जात नाही, असंही ते म्हणत होते.

रिपब्लिक टीव्हीने त्यांच्या या प्रकरणावर वार्तांकन करताना म्हटलंय की अर्णब यांना तळोजा जेलमध्ये हलवलं जात असल्याचं त्यांच्या वकिलांनाही सांगण्यात आलेलं नाही.

मात्र या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी करता आली नाही. या प्रकरणानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक व्हीडिओ ट्वीट करत सांगितलं की तळोजा जेलचे जेलर कुरळेकर यांनी त्यांना आश्वासन दिलंय की अर्णब यांना तुरुंगात कोणताही त्रास होणार नाही. गरज पडल्यास वैद्यकीय उपचारही पुरवले जातील.

रायगड जिल्ह्यातल्या तळोजा जेलमध्ये अनेक कुख्यात गुंडांना ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)