अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर पत्रकारांची विभागलेली मतं का?

फोटो स्रोत, Republic World
इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाली आहे. यावरून सोशल मीडियावर गोस्वामी यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात प्रतिक्रियांचा पूर आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रातल्या अनेक मंत्र्यांनी अर्णब यांच्या अटकेवर टीका केली आहे. जवळपास सर्वच केंद्रीय मंत्र्यांची या कारवाईची तुलना 1975 च्या आणीबाणीशी केली आहे.
महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांविरोधात बातमी केल्यास सूडबुद्धीने कारवाई करण्यात येते असाही आरोप भाजपने केला आहे. देशभरातील पत्रकारांमध्ये मात्र याबाबत मतमतांतरं आहेत.
आणीबाणी जवळून पाहिलेल्या पत्रकारांना यासंदर्भात काय वाटतं? पत्रकारांच्या संघटनांनी अर्णबच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे की विरोधात? हा पत्रकारितेवर हल्ला आहे असं महाराष्ट्रातल्या पत्रकारांना वाटतं का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

फोटो स्रोत, SHANTI BHUSHAN/BBC
आणीबाणीचा संबंध का जोडण्यात येत आहे?
एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्र सरकार या प्रकरणात सत्तेचा गैरवापर करणार नाही आणि पूर्ण प्रकरणाची चौकशी नि:पक्षपातीपणे होईल अशी आम्हाला आशा आहे, असं संपादकांची संघटना एडिटर्स गिल्ड ऑफ़ इंडियाने म्हटलं आहे.
राम बहादुर राय असे पत्रकार आहेत ज्यांनी आणीबाणीचा काळ जवळून पाहिला आहे. बीबीसीने त्यांना विचारलं महाराष्ट्रात खरंच आणीबाणीसारखी परिस्थिती दिसते आहे का?
त्यांनी सांगितलं, "25 जून 1975 रोजी रात्री आणीबाणी लागू करण्यासाठी कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यात आली आणि 26 तारखेपासूनच आणीबाणी लागू झाल्याची घोषणा झाली. 25 जूनपासून वर्तमानपत्रांच्या कार्यालयांमध्ये वीज कापली."
ते पुढे सांगतात, "बी. जी. वर्गिस त्यावेळी हिंदुस्तान टाईम्सचे मुख्य संपादक होते. ते रात्री 2 वाजता कार्यलयात पोहोचले आणि वर्तमानपत्राची आवृत्ती बंद करेपर्यंत 40 प्रती छापण्यात आल्या होत्या. पण त्याक्षणी त्यांचं कार्यालय बंद करण्यात आलं."

"इंडियन एक्स्प्रेस संध्याकाळीच बंद झालं. जेपींना रात्री 2.30 वाजता संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. आणीबाणीची सुरुवातच नियम, कायदा, घटना पायदळी तुडवून करण्यात आली," असं सांगत राम बहादुर राय यांनी आणीबाणीच्या आठवणी सांगितल्या.
ते सांगतात सध्या महाराष्ट्रात जे होत आहे त्याला मी आणीबाणी असं संबोधणार नाही. पण "ही दुसरी वेळ आहे जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतीमा मलीन होत आहे. सुशांत सिंह प्रकरणातही परिस्थिती हाताळण्यात त्यांना अपयश आलं होतं," असं मत राम बहादूर राय यांनी व्यक्त केलं.
ते असंही म्हणाले, "हे प्रकरण राजकीय सूडबुद्धीचं नसून वैयक्तिक शत्रुतेचं आहे. असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात जायचे ठरवलं आहेय"
अर्णब गोस्वामी यांच्या पत्रकारितेच्या पद्धतीशीही त्यांनी असहमती दर्शवली. पत्रकारांचे काम माहिती देणं, त्याचं विश्लेषण करणं आहे. पण काही पत्रकारांना गैरसमज झाला आहे की ते देश चालवत आहेत, असंही मत राम बहादुर राय यांनी व्यक्त केलं.

फोटो स्रोत, EGI/TWITTER
'तेव्हा आणीबाणी आठवली नाही का?'
ज्येष्ठ पत्रकार जयशंकर गुप्त सांगतात, "अर्णब गोस्वामी यांच्या निमित्ताने का होईना पण मंत्र्यांना आणीबाणीची आठवण झाली. यापूर्वी छत्तीसगडचे पत्रकार विनोद वर्मा यांना पोलीसांनी रात्रीच्या वेळेस त्यांच्या घरून ताब्यात घेतलं होतं. दिल्लीतील पत्रकार प्रशांत कनोजिया यांनाही यूपी पोलिसांनी अटक केली होती. काही दिवसांपूर्वी हाथरसमध्ये कव्हरेज करत असताना केरळच्या एका पत्रकाराला मथुरामध्ये ताब्यात घेतेलं गेलं. अशा सर्व घटनांच्या वेळेस कोणत्याही मंत्र्याला आणीबाणीची आठवण आली नाही."
ते पुढे सांगतात, "भीमा कोरेगावच्या नावाखाली सुधा भारद्वाज, गौतम नवलखा यांच्यासारख्या बुद्धीजीवींना यांनी अटक केली. या सर्व घटना आणीबाणीहून अधिक भयानक आहेत. आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. पण ज्या घटनांचा मी उल्लेख केला त्या घडत असताना कुठेही आणीबाणीची घोषणा नव्हती."
अर्णब गोस्वामी यांचं प्रकरण अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा पत्रकारांचं स्वातंत्र्य यात मोडत नाही, असं विनोद वर्मा यांना वाटतं.
ते सांगतात, "हे प्रकरण आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं आहे. अर्णब गोस्वामी यांनी केलेल्या एखाद्या कार्यक्रमासंदर्भात किंवा रिपोर्ट प्रकरणी कारवाई झाली असती तर आम्ही विरोध केला असता."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
इंडिया टीव्हीचे प्रमुख रजत शर्मा, एनडीटीव्हीच्या सोनिया सिंह आणि टाईम्स नाऊचे राहुल शिवशंकर यांनी ट्वीटरवरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रजत शर्मा न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनचे (NBA) अध्यक्ष आहेत. ते म्हणाले, "मी अर्णब गोस्वामी यांच्यावर अचनाक करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करतो. त्यांच्या स्टुडिओतील पत्रकारितेच्या स्टाईलचं मी समर्थन करत नाही. पण एका पत्रकाराला सत्ताधाऱ्यांनी असा त्रास देणं योग्य नाही. एका मीडियातील संपादकाशी केलेली ही वर्तणूक योग्य नाही."
सत्ताधाऱ्यांविरोधात बातमी केल्यास मुंबईतील पत्रकारांना काय अनुभव येतो?
महाराष्ट्रात सरकारविरुद्ध बोलण्याचे आणि लिहिण्याचे स्वातंत्र्य नाही का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही पत्रकारांशी बोललो.
ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी महाराष्ट्रात 30 वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती आहे असे मला वाटत नाही. सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात पत्रकार रिपोर्टिंग करत आहेत. मी सुद्धा सरकारविरोधात अनेक बातम्या करतो. पण आम्हाला असा अनुभव आलेला नाही. अर्णबचे प्रकरण वेगळं आहे. या प्रकरणाचा राजकीय मुद्दा बनवला जात आहे."
"ज्यापद्धतीने गेल्या काही काळात अर्णबने भूमिका घेतल्या त्या सर्व बाबींचा आताच्या कारवाईशी संबध असल्याचा आरोप होत आहे. 2018 मध्ये एका इंटिरियर डिझायनरच्या आत्महत्या प्रकरणात अर्णबला अटक झाली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या प्रत्नीने अर्णब विरोधात तक्रार केली आहे. हा महत्त्वाचा पैलू आहे."

"आपली प्रतिमा जपण्यासाठी मुंबई पोलिसांना अटक करताना घडलेला प्रकार टाळता आला असता. मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने प्रक्रिया राबवली असती तर हे प्रकरण अन्वय नाईक आत्महत्येचेच आहे यावर लोकांचा विश्वास बसला असता. सूडबुद्धीने कारवाई होत आहे असा मतप्रवाह बनला नसता," असंही ते म्हणाले.
निखिल वागळे एक स्वतंत्र पत्रकार आहेत. त्यांनी टीव्ही आणि वर्तमानपत्र दोन्ही ठिकाणी काम केलं आहे.
ट्विटरवर एडिटर्स गिल्डचे निवेदन ट्विट करत असताना त्यांनी लिहिलं, "अर्णबच्या अटकेचा पत्रकारितेशी काहीही संबंध नाही. हे जुने प्रकरण आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी केली नव्हती. आता पीडित कुटुंबाकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे."
पत्रकार संघटनांची सावध भूमिका
दरम्यान, महाराष्ट्रातील पत्रकार हल्ला विरोधी समितीचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी हा पत्रकारितेवरचा हल्ला नाही. ही वैयक्तिक बाब असल्याचं म्हणत या अटकेचा निषेध करणार नसल्याचं म्हटलं आहे.
देशमुख यांनी केलेल्या पोस्टमध्ये ते लिहितात, "रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध यासाठी करता येणार नाही की, हे प्रकरण व्यक्तीगत आहे. त्याचा पत्रकारितेशी दुरान्वयाने संबंध नाही. त्यामुळे अर्णब यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरचा हल्ला वगैरे म्हणत कोणी गळे काढण्याची गरज नाही."

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे लिहितात, "मे 2018 मध्ये अलिबाग तालुक्यातील कावीरमधये वास्तूविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांनी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांच्याकडून कामाची मोठी रक्कम येणं होती पण ती ते देत नसल्याने ही आत्महत्या झाल्याचे तेव्हा सांगण्यात येत होतं.
"गोस्वामी यांच्या विरोधात तेव्हा अलिबाग पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता पण पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे नाईक कुटुंबियांनी या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अलिबाग गुन्हे अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करून गोस्वामी यांना अटक केली."
"या विषयाचा पत्रकारितेशी दुरान्वयाने देखील संबंध नाही. दोघांच्या मृत्यूचा हा विषय असल्याने या अटकेचा निषेध उचित ठरणार नाही. पत्रकारितेची झुल पांघरून वाट्टेल तसे उद्योग करणाऱ्यांची पाठराखण मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करू शकत नाही. कायद्याला त्याचं काम करू द्यावं हेच उचित ठरेल."
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पोलिसांनी कायद्याने कारवाई केली, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "कुणाविरोधातही पुरावे असल्यास पोलीस कारवाई करू शकते. ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून कुणाविरोधातही सूडबुद्धीने कारवाई झालेली नाही."
तर अल्ट न्यूजचे सहसंस्थापक प्रतिक सिन्हा लिहितात, "जो कुणी अर्णब गोस्वामी पत्रकार असल्याचं म्हणत आहेत ते चुकीची माहिती पसरवत आहेत."
काय आहे प्रकरण?
2018 साली अन्वय नाईक या 53 वर्षांच्या इंटिरिअर डिझायनरने अलिबागमध्ये त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती.
घटनेनंतर मिळालेल्या स्युसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी आणि इतर दोघांनी त्याचे 5.40 कोटी रुपये थकवल्याचं म्हटलं होतं.
त्यामुळे आपल्याला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागल्याचंही त्यांनी लिहिलं होतं. त्याआधारावर नव्यानं तक्रार करण्यात आली होती. नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी ही तक्रार केली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








