IPL 2020: एबीच्या वादळात कोलकाता निष्प्रभ

फोटो स्रोत, BCCI/IPL
क्रिकेटविश्वात एबी डीव्हिलियर्सला 360 डिग्री प्लेयर म्हणून ओळखलं जातं. ज्या खेळपट्टीवर बाकी बॅट्समन रन्ससाठी झगडत असताना डीव्हिलियर्सने चौकार-षटकारांची लयलूट करत बेंगळुरूला दणदणीत विजय मिळवून दिला.
बेंगळुरूने पहिल्यांदा बॅटिंग करताना 194 रन्स केल्या. कोलकाताला फक्त 112 रन्सचीच मजल मारता आली.
बेंगळुरूच्या बॅटिंगवेळी बाराव्या ओव्हरमध्ये बेंगळुरूची स्थिती 2 बाद 94 अशी होती. आरोन फिंच आणि विराट कोहली यांना संथ खेळपट्टीमुळे एकेक रनसाठी झगडावं लागत होतं.
फिंच आऊट झाल्यावर मैदानात अवतरलेल्या एबीने त्याच्या शैलीत फटकेबाजीला सुरुवात केली. मैदानाच्या कानाकोपऱ्यात चौकार-षटकारांची आतषबाजी करत एबीने स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं.
एबी-विराट जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 46बॉलमध्ये 100 रन्स जोडल्या आणि विजयाचा पाया रचला. 100 पैकी डीव्हिलियर्सचं योगदान होतं 33बॉलमध्ये 73 रन्सचं. विराट-एबी जोडीने आयपीएल स्पर्धेत भागीदारीत 3000 रन्स पूर्ण केल्या.

फोटो स्रोत, BCCI/IPL
एबीने 5 चौकार आणि 6 षटकार लगावले. कोहलीला पहिला चौकार वसूल करण्यासाठी 25 बॉल प्रतीक्षा करावी लागली. कोहलीने नाबाद 33 रन्स केल्या. फिंचने 47 तर देवदत्त पड्डीकलने 32 रन्सची खेळी केली. या दोघांनी 67 रन्सची सलामी देत कोहली-एबीसाठी रुजवात केली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बेंगळुरूच्या शिस्तबद्ध बॉलिंगपुढे कोलकाताने शरणागती पत्करली. एकाही बॅट्समने खेळपट्टीवर स्थिरावत मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला नाही. वॉशिंग्टन सुंदरने चार ओव्हरमध्ये 20 रन्सच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहलने फक्त 12 रन्स देत एक विकेट मिळवली. छोट्या आकाराच्या मैदानावर कशी बॉलिंग करावी याचा वस्तुपाठ या दोघांनी सादर केला.
पदार्पणवीर टॉम बॅन्टनने 8 रन्स केल्या. दिनेश कार्तिक 1 तर आयोन मॉर्गनने 8 रन्स केल्या. आंद्र रसेलकडून कोलकाताला मोठ्या अपेक्षा होत्या. तो 16 रन्सची खेळी करून तंबूत परतला. ख्रिस मॉरिसने सलग दुसऱ्या मॅचमध्ये किफायतशीर बॉलिंग करत बेंगळुरूच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
दरम्यान अॅक्शन वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने कोलकाताने सुनील नरिनला बेंगळुरूविरुद्धच्या लढतीसाठी वगळलं. इंग्लंडच्या टॉम बँटनला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
कोलकाता-पंजाब लढतीत कोलकाताने अवघ्या दोन रन्सने विजय मिळवला होता. या मॅचमधली शेवटची ओव्हर सुनील नरिनेच टाकली होती. सुनील नरिन कोलकाताचा प्रमुख स्पिनर आहे. पहिल्या काही मॅचेसमध्ये नरिन ओपनिंगलाही आला होता. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही.

फोटो स्रोत, BCCI/IPL
पंजाबविरुद्धच्या मॅचनंतर अंपायर्सनी नरिनच्या अॅक्शनसंदर्भात इशारा दिला आहे. नरिनची अॅक्शन याआधीही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आणखी एकदा नरिनच्या अॅक्शनवर संशय घेतला गेल्यास हंगामात त्याच्या बॉलिंगवर बंदीची कारवाई होऊ शकते.
पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये नरिन अवैध अॅक्शनने बॉलिंग करत होता असं अंपायर्सनी म्हटलं आहे. पहिली वेळ असल्याने त्याला इशारा देण्यात आला. मात्र हे पुन्हा घडल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते.
2015 मध्येही नरिनची अॅक्शन वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. नरिनच्या अॅक्शनसंदर्भात आम्ही योग्य कार्यवाही करत आहोत असं कोलकाता प्रशासनाने म्हटलं आहे.
पंजाबविरुद्ध नरिनने दोन विकेट्स घेताना शेवटच्या ओव्हरमध्ये किफायतशीर बॉलिंग करत संघाला थरारक विजय मिळवून दिला होता.
आयपीएल स्पर्धेतील यशस्वी बॉलर्समध्ये गणना होणाऱ्या नरिनच्या नावावर 127 विकेट्स आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 6.74 उत्तम मानला जातो. नरिनने डावात पाचवेळा विकेट्स घेण्याची किमया एकदा तर सहावेळा डावात चार विकेट्स घेतल्या आहेत.
नरिनने बॅटिंग करताना 815 रन्स केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








