IPL 2020 : अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार आयपीएलमधून बाहेर

फोटो स्रोत, Robert Cianflone
दुखापतींमुळे अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा आणि फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार यंदाच्या हंगामातील उर्वरित मॅचेस खेळू शकणार नाही.
अमित मिश्रा दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळतो तर भुवनेश्वर कुमार सनरायझर्स हैदराबादचा भाग आहे.
दुखापत गंभीर असल्याने भुवनेश्वरच्या टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळण्याविषयी साशंकता आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला 6 ते 8 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.
साईड स्ट्रेन आणि हॅमस्ट्रिंगच्या दुखापतींमुळे भुवनेश्वर यंदा दुखापतग्रस्त होता. यामुळेच त्याला न्यूझीलंड दौऱ्यात खेळता आलं नव्हतं.
बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत असल्याने भुवनेश्वरला दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक प्रक्रिया बीसीसीआयतर्फे राबवली जाईल.

फोटो स्रोत, Sunrisers hyderbad
बीसीसीआयच्या मेडिकल टीमचा भाग असलेले भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल युएईतच असल्याने भुवनेश्वर तिथेच थांबू शकतो.
दरम्यान हैदराबादने तूर्तास तरी भुवनेश्वर कुमारऐवजी बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.
सनरायझर्स हैदराबादच्या भुवनेश्वरला चेन्नईविरुद्धच्या लढतीत दुखापत झाली होती. 19वी ओव्हर टाकताना भुवनेश्वर दुखापतग्रस्त झाला. फिजिओंच्या उपचारानंतर त्याने तीनदा ओव्हर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला मात्र दुखापत गंभीर असल्याने त्याने मैदान सोडलं.
हैदराबादसाठी भुवनेश्वर हुकूमी एक्का होता. रन्स रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्ही आघाड्या तो यशस्वीपणे सांभाळत होता. त्याचवेळी युवा बॉलर्सना मार्गदर्शन करण्याचंही कामही करत होता. भुवनेश्वर खेळू शकणार नसल्याने हैदराबादसाठी मोठा धक्का आहे.

फोटो स्रोत, Sunrisers Hyderabad
भुवनेश्वरने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत 121 मॅचेसमध्ये 136 विकेट्स घेतल्या आहेत. 2016 आणि 2017 अशा सलग दोन वर्षी भुवनेश्वर परपल कॅपचा मानकरीही ठरला होता. हैदराबादने 2016 मध्ये आयपीएल जेतेपदावर कब्जा केला होता. हैदराबादला जेतेपद मिळवून देण्यात भुवीच्या बॉलिंगची भूमिका निर्णायक होती.
भुवनेश्वर आतापर्यंत बेंगळुरू, पुणे आणि हैदराबाद या संघांसाठी खेळला आहे.
दरम्यान पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी प्रयत्नशील दिल्ली कॅपिटल्स संघाकरता मिश्रा नसणं हा मोठा धक्का आहे. 37 वर्षीय मिश्रा हा दिल्ली संघाचा अविभाज्य भाग होता.
3 ऑक्टोबर रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीत स्वत:च्या बॉलिंगवर कॅच घेताना मिश्राच्या बोटाला दुखापत झाली. बॉलिंग टाकण्याच्या उजव्या हातालाच ही दुखापत झाली. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याचं एक्सरे चाचण्यांमध्ये स्पष्ट झालं.
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अमित मिश्रा दुसऱ्या स्थानी आहे. आयपीएलच्या दीडशे मॅचेसमध्ये मिश्राच्या नावावर 160 विकेट्स आहेत.
स्पर्धेचे सगळे हंगाम खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये अमित मिश्राचा समावेश होतो. आयपीएल स्पर्धेत तब्बल तीन हॅट्ट्रिकचा दुर्मीळ विक्रम मिश्राच्या नावावर आहे.

फोटो स्रोत, Robert Cianflone
2008 मध्ये रवी तेजा, प्रग्यान ओझा, आरपी सिंग यांना आऊट करत त्यानं विक्रम केला होता. 2011 मध्ये रायन मॅकलरेन, मनदीप सिंग आणि रायन हॅरिस यांना आऊट करत धमाल उडवून दिली होती. 2013 मध्ये भुवनेश्वर कुमार, राहुल शर्मा आणि अशोक दिंडा यांना आऊट करत मिश्राने अनोखा विक्रम नावावर केला.
दिल्लीच्या ताफ्यात रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, संदीप लमाचीने, ललित यादव हे फिरकीपटू आहेत. मात्र तरीही त्यांना मिश्राची उणीव भासणार आहे. दिल्लीने अद्याप तरी बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.
यंदाच्या हंगामात चेन्नईविरुद्धच्या लढतीत मिश्राने 4 ओव्हर्समध्ये फक्त 23 रन्स दिल्या. हैदराबादविरुद्ध खेळताना मिश्राने 4 ओव्हर्समध्ये 35 रन्सच्या मोबदल्यात डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे या तडाखेबंद बॅटिंगसाठी प्रसिद्ध बॅट्समनला आऊट केलं. कोलकाताविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त होण्याआधी मिश्राने 2 ओव्हर्समध्ये 14 रन्सच्या मोबदल्यात शुभमन गिलला आऊट केलं.
बॉलर्सची कत्तल होणाऱ्या या स्पर्धेत सलग तेरा हंगाम विकेट्स मिळवणं आणि धावांची लूट रोखणं हे काम मिश्राने समर्थपणे केलं आहे.
मिश्राने दिल्ली कॅपिटल्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
मिश्राने 22 टेस्ट आणि 36 वनडेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये हरयाणासाठी खेळताना मिश्राच्या नावावर 535 विकेट्स आहेत.
ट्वेन्टी-20 प्रकारात भल्याभल्या बॅट्समनना मिश्राने आपल्या जाळ्यात अडकवलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








