IPL 2020: मावी, नागरकोट्टी, शुभमन चमकले; कोलकाताची यंग ब्रिगेड जोरात

शुभमन गिल

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, शुभमन गिल
वाचन वेळ: 2 मिनिटे

शिवम मावी, कमलेश नागरकोट्टी आणि शुभमन गिल या युवा शिलेदारांच्या दमदार खेळाच्या बळावर कोलकाताने राजस्थानवर शानदार विजय मिळवला.

कोलकाताने पहिल्यांदा बॅटिंग करताना 174 रन्सची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना राजस्थानने कोलकाताच्या बॉलिंगसमोर शरणागती पत्करली. त्यांनी 137 रन्स केल्या.

आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने स्टीव्हन स्मिथला झटपट गमावले. ऑस्ट्रेलियाच्या संघातील सहकारी पॅट कमिन्सच्या बॉलिंगवर विचित्र स्टान्समध्ये फटके मारण्याचा प्रयत्न अंगलट आला. भरवशाचा स्मिथ आऊट झाल्याने राजस्थानला चांगली सुरुवात मिळू शकली नाही.

दोन मॅचमध्ये झंझावाती खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला शिवम मावीने चकवलं. त्याने 8रन्स केल्या. पाठोपाठ जोस बटलरसारख्या अनुभवी बॅट्समनला माघारी धाडत मावीने मॅचचं पारडं कोलकाताच्या दिशेने झुकवलं. बटलरने 21 रन्स केल्या मात्र या खेळीत आत्मविश्वास नव्हता.

सगळे हंगाम खेळण्याचा अनुभव असलेला रॉबिन उथप्पा खेळपट्टीवर दाखल होताच मोठा फटका खेळायला गेला. कमलेश नागरकोट्टीने त्याला आऊट केलं. रायन परागला शुभमन गिलकडे कॅच द्यायला भाग पाडत कमलेशने राजस्थान अडचणीत आणलं.

वरुण चक्रवर्तीने राहुल टेवाटियाला फसवलं. सुनीर नरिनने श्रेयस गोपाळचा प्रतिकार संपुष्टात आणला. वरुणने जोफ्रा आर्चरला मोकळेपणे फटकेबाजी करू दिली नाही.

टॉम करनने नाबाद 54 रन्सची खेळी करत एकट्याने झुंज दिली. मात्र त्याला कोणाचाही साथ मिळाली नाही.

कोलकातातर्फे शिवम मावी, कमलेश नागरकोट्टी आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

दरम्यान कोलकाताने पहिल्यांदा बॅटिंग करताना 174 रन्सची मजल मारली. शुभमन गिलने सर्वाधिक 47 रन्स केल्या. आयोन मॉर्गनने 23 बॉलमध्ये 34 रन्स करत कोलकाताला पावणेदोनशेचा टप्पा गाठून दिला. सुनील नरिनला सलामीला पाठवण्याचा निर्णय या मॅचमध्येही फळला नाही.

राहुल टेवाटियाला मोठा फटका खेळण्याचा नितीश राणाचा प्रयत्न रायन परागच्या हातात जाऊन विसावला. त्याने 22 रन्स केल्या. कोलकाताने वादळी खेळींसाठी प्रसिद्ध आंद्रे रसेलला चौथ्या क्रमांकावर पाठवलं. रसेल 10व्या ओव्हरमध्ये बॅटिंगला आला. त्याने फटकेबाजीला सुरुवातही केली.

आयोन मॉर्गन

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, आयोन मॉर्गन

अंकित राजपूतने ऑफस्टंपच्या बऱ्यापैकी बाहेर असलेल्या बॉलवर सिक्स मारण्याचा रसेलचा प्रयत्न फसला. त्याने 24 रन्स केल्या. मॉर्गनने एका बाजूने चिवटपणे खेळ करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. जोफ्रा आर्चरने बाऊन्सर आणि लेगकटरचा शिताफीने उपयोग करत चार ओव्हर्समध्ये अवघ्या 18 रन्स देत दोन महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवल्या.

अंकित राजपूत, जयदेव उनाडकत, टॉम करन, राहुल टेवाटिया यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)