बाल विवाहाच्या बेडीतून कशा मुक्त झाल्या या मुली ?

एक युवती

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

"मला पाहायला आले होते. साखरपुडा करण्याचं ठरलं होतं. लग्न पण ठरलं होतं. आज होणार होतं लग्न. मुलाकडच्यांनी म्हटलं की, आमच्याकडे खूप जमीन आहे. फक्त मुलगी द्या. मला विचारलं पण नाही. पण आता लग्न मोडलं. लग्न करायचं नाहीये."

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात राहणाऱ्या स्वाती (नाव बदललं आहे) या 13 वर्षाच्या निरागस मुलीचे हे शब्द. ग्रामीण भागातील हे भीषण वास्तव नजरेआड करता येणार नाही.

महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्ये बालविवाह मोठ्या संख्येने होताना दिसतात. कोरोनाच्या संकटात तर ही परिस्थिती भयावह झाली आहे.

कोरोना लॉकडाऊन, ग्रामीण भागीतील कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि शाळा बंद असल्यामुळे 13 ते 17 वर्षं वयोगटातील मुलींच्या बाल विवाहांची संख्या राज्यात प्रचंड वाढली आहे.

या समस्येचा आढावा घेण्यासाठी स्वतःचा बाल विवाह रोखून आयुष्यात पुन्हा उभं राहणाऱ्या मुलींशी बीबीसी मराठीने संवाद साधला.

'मी कोणताही गुन्हा केला नाही'

स्वातीप्रमाणेच सोलापूरच्या बॅकवर्ड क्लास गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या रियाची (बदललेलं नाव) जिद्द वाखाणण्याजोगी आहे. 15 व्या वर्षी जबरदस्तीने लग्न झालं. स्वत:च्या पायावर उभं रहाण्यासाठी नवऱ्याचं घर सोडलं. कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी हालकून दिलं. पण, तिने धीर सोडला नाही.

रिया म्हणते, "मी काही गुन्हा केला नव्हता. शिकण्यासाठी मी बाहेर पडले. लोकांच्या नजरेत हा गुन्हा असेल. पण, आता आत्मविश्वास वाढला आहे. मी काहीतरी झाले. आता मी माझा अनुभव इतर मुलींना सांगते. खचून जायचं नाही. घर सोडताना मी विचार केला नाही. कोणाकडे मदत मागितली नाही. लोकांसमोर हात पसरले नाहीत."

हॉस्टेलमध्ये रिया कथक शिकली. योगा शिकली. एवढंच नाही तर चांगल्या मार्कांनी 10 वी पास झाली.

"माझं शिक्षण कर्नाटकात झालं. महाराष्ट्र माझ्यासाठी परदेशासारखा होता. लोकं, भाषा, रितीरिवाज वेगळे होतं. पण, जिद्द हरली नाही. मराठीतून शिकले. 10 वी नंतर नर्सिंगचा कोर्स केला. हेल्थ असिस्टंट बनले. मला माझ्या पायावर उभं रहायचं आहे. आता मी मागे वळून पहाणार नाही," असं ती पुढे म्हणते.

रियाला घडवण्यात मोलाची भूमिका बजावली बॅकवर्ड क्लास गल्स हॉस्टेलने. या हॉस्टेलच्या अधीक्षिका सुहासिनी कुलकर्णी म्हणतात, "सतत रडणारी, जगावर त्रागा करणारी, सर्व वाईट असं समजणारी, चेहऱ्यावर हसू नसणारी ही मुलगी स्वत:च्या हिमतीने बदलली आहे. आता ती स्वावलंबी आहे. मोठं होण्याचं तिचं स्वप्न आहे. तिच्यात शिकण्याची अफाट जिद्द आहे. गेल्या 2 वर्षात तिच्यात खूप बदल झाला आहे."

बाल विवाहाचे अनेक प्रयत्न

या समस्येबाबात बीबीसी मराठीशी बोलताना महिला बालकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मनिषा बिरारिस म्हणाल्या, "लॉकडाऊनच्या काळात किती बालविवाह झाले हे सांगता येणार नाही. पण मोठ्या संख्येने थांबवण्यात आले. मुलींना अजूनही समाजात ओझं मानलं जातं. लॉकडाऊनमध्येही मुलगी ओझं होते. घरात खाणारी तोंड जास्त, मुलीचं लग्न केलं तर एक तोंड कमी होईल या उद्देशानेही बाल विवाह करण्याचे प्रयत्न झाले."

महाराष्टात बाल विवाहामुळे हजारो मुलींचं आयुष्य उद्धस्त होत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात मार्च 2020 ते जुलै 2020 या काळात 215 बालविवाह थांबवण्यात यश आलं. पण प्रत्यक्षात संख्या खूप जास्त असण्याची शक्यता आहे.

बाल सुधारगृह

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

ज्या मुलींचा बाल विवाह थांबवण्यात आला, त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. 10 वी नंतरच्या शिक्षणासाठी गाव सोडावं लागतं. गरीबीमुळे शिक्षण घेण्याची ऐपत नसते. त्यामुळे कुटुंबीय, समाज यांच्या दबावाखाली या मुली लग्नाच्या बेडीत बांधल्या जातात. या मुलींमध्ये शिकण्याची, मोठं होण्याची जिद्द आहे आणि योग्य मार्ग मिळाला तर स्वत:च्या पायावर उभं रहाण्याची हिंमत सुद्धा.

'आता मागे वळून पाहणार नाही'

सोलापूरच्या बाल सुधारगृहात सुरक्षित असलेल्या स्मिताचं (नाव बदललेलं) अवघ्या 16 व्या वर्षी जबरदस्तीने लग्न करण्यात आलं. सासरचं माप ओलांडून ती घरी गेली. उरी बाळगलेल्या स्वप्नांचं दार कायमचं बंद झालं. भविष्य एका अंधाऱ्या खोलीत कोंडून गेलं असं वाटत असतानाच तिने पुन्हा झेप घेतली.

स्मिता म्हणते, "मी 9 वीत शिकत होते. आई-मावशीला सांगितलं शाळा शिकायची. पण, कुटुंबीयांपुढे एक चाललं नाही. मनाविरुद्ध लग्न लावून दिलं. मनाला अजिबात पटलं नाही. नवऱ्याचं घर सोडलं. 2 महिने घरी राहिल्यानंतर नवऱ्याकडे जा म्हणून मारहाण केली. मग ठरवलं. आता मागे वळून पहायचं नाही."

"मला 10 वी पूर्ण करायचं आहे. पुढे शिकायचं आहे, स्वत:च्या पायावर उभं रहायचं आहे. 8 वीला मी एनसीसीत होते. पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतलं आहे. त्यामुळे मला पुढे पोलीस दलात जायचं आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार," असं ती पुढे म्हणाली.

सोलापूरच्या सरकारी बालगृहाच्या अधीक्षिका जयाप्रदा शरणार्थी सांगतात, "या मुलींमध्ये शिकण्याची जिद्द आहे. फक्त त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या मुलींना ITI, कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारच ट्रेनिंग दिलं जातं. जेणेकरून त्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल."

एकतर्फी प्रेम, 'लग्न लावून द्या, नाहीतर जीवे मारेन,' अशी धमकी यामुळे स्वप्नांचा बळी देत 17 वर्षाच्या अस्मिताला लग्नाच्या बेडीत स्वत:ला बांधून घेणं जास्त सुरक्षित वाटलं. पण, आता ती नव्या उमेदीने जगाला सामोरं जाण्याचा प्रयत्न करते आहे.

"लग्नानंतर मी फक्त बाई म्हणून राहीले असते. ओळख गमावून बसले असते. पण, आता शिकायचं आहे, आणि शिकणारच. करिअर करायचं आहे. कंप्युटर्स शिकायचं आहे, इतर मुलींसारखी नोकरी करून ताठ मानेने जगायचं आहे. आई-वडीलही पाठीशी उभे आहेत," असं अस्मिता म्हणते.

छेडछाडीच्या भीताने तिने लग्नाला होकार दिला. पण, आता तिचा आत्मविश्वास वाढलाय. "मी इतरांना सांगेन, कोणी त्रास देत असेल तर पोलिसात तक्रार करा. आई-वडिलांना शाळा शिकायची आहे हे सांगायला घाबरू नका," अस्मिता पुढे सांगते.

लॉकडाऊनमध्ये काम नाही, पैसा नाही, कमी पैशात लग्न होईल. जबाबदारीतून मुक्त होईन, या विचाराने 16 वर्षाच्या माधुरीचं (नाव बदललेलं) लग्न लावण्यात आलं. ती म्हणते, "लग्न मोडल्यानंतर मला समजलं लहान वयात लग्न का करायचं नाही. आता मी शिकणार आहे. शाळेत पुन्हा जाणार आहे. मोठं होईन. त्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल."

बाल सुधारगृह

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

आणखी प्रयत्नांची गरज

"या मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण कमी पडतोय हे नाईलाजाने मान्य करावं लागेल. 10 वी नंतर मुलींचं शिक्षण थांबतंय. गळतीचं प्रमाण वाढतंय. ही परिस्थिती बदलायची असेल तर मुलींना शिक्षणापर्यंत आणि शिक्षणाला मुलींपर्यंत पोहोचवण्यासाठी अजून प्रयत्न करावे लागतील," असं महिला बालक्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मनिषा बिरारिस पुढे म्हणतात.

2015-16 मध्ये राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या माहितीनुसार, देशातील 70 जिल्ह्यात बालविवाह होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यात महाराष्ट्रातील 17 जिल्हे आहेत. या रिपोर्टनुसार, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं आहे.

कोवळ्या वयात लग्नाच्या बंधनात अडकल्याने या मुली मानसिक दबावाखाली असतात. अशा मुलींना मानसिक दबावातून बाहेर काढण्याचं काम काउन्सिलर करतात. काउन्सिलर पल्लवी वाठाणे म्हणतात, "मानसिक दबावाखाली असल्याने या मुली व्यक्त होत नाहीत. मग, त्यांच्याशी बोलावं लागतं. लग्नाच्या नावावर त्यांची फसवणूक झालेली असते. मग, त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहून खंबीर होण्यासाठी धीर द्यावा लागतो."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)