कोरोना अपडेट : माध्यमांच्या न्यूजरूममध्ये व्हायरस घुसला आणि बातमी देणारेच बातमी झाले

फोटो स्रोत, AFP
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
काही दिवसांपूर्वी मुंबईतले अनेक पत्रकार कोरोना व्हायरससाठीची चाचणी करून घ्यायला रांगेत उभे होते. यातच एका मराठी वृत्तवाहिनीच्या स्टुडिओमधले एक कॅमेरामन होते .
35 वर्षांच्या या कॅमेरामनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पण त्यांना ना कोणता त्रास होत होता, ना कोरोनाची काही लक्षणं त्यांच्यात दिसत होती.
"हा आम्हा सगळ्यांसाठीच एक मोठा धक्का होता. कामाशिवाय ते इतर कारणांनी घराबाहेरही पडलेले नव्हते," जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक प्रसाद काथे सांगतात.
तेव्हापासून या 7 वर्षं जुन्या न्यूज चॅनलमधल्या 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यातले बहुतेक रिपोर्टर्स आणि कॅमेरामन आहेत. तीन आठवड्यांपूर्वी या न्यूज चॅनलने पत्रकारांना वार्तांकनासाठी बाहेर म्हणजेच 'फील्डवर' पाठवणं थांबवलं. यातले बहुतेकजण आता घरीच विलगीकरणात आहेत.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

अंधेरीच्या गजबजलेल्या भागात एका 8 मजली इमारतीतली या न्यूज चॅनलची 12,000 चौरस फुटांची, 2 स्टुडिओ असणारी न्यूजरूम आता बंद आहे. एक इलेक्ट्रिशियन आणि प्रॉडक्शन कन्ट्रोल रूमचा एक तंत्रज्ञ, असे दोनच जण आता या न्यूजरूममध्ये असतात.
चॅनलच्या 120 कर्मचाऱ्यांपैकी बहुतेकांची म्हणजे पत्रकारांपासून तंत्रज्ञ ते वाहन चालकांपर्यंत सगळ्यांची कोव्हिडसाठी चाचणी करण्यात आलेली आहे. हळूहळू या चाचण्यांचे अहवाल येतायत.
"व्हायरसच्या संसर्गामुळे आता एक लाईव्ह न्यूज चॅनल चालवणं एक आव्हान झालंय. म्हणूनच चॅनल सुरू ठेवण्यासाठी आम्ही वेगळी आखणी केली," काथेंनी माझ्याशी बोलताना सांगितलं.
गेल्या तीन आठवड्यांपासून 'जय महाराष्ट्र' ही वृत्तवाहिनी 28 मिनिटांची 6 बातमीपत्रं एका दिवसात प्रसारित करत आहे. पूर्वी याच वाहिनीवर एकूण 18 लाईव्ह बातमीपत्रं व्हायची. उरलेल्या वेळात रेकॉर्डेड बातम्या आणि सध्याच्या घडामोडींविषयीचे कार्यक्रम दाखवण्यात येतायत.
घरून प्रसारण सुरू
कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा फटका बसलेली ही एकमेव वृत्तसंस्था नाही. जवळपास 100 पत्रकारांना या विषाणूची लागण झालेली आहे.
म्हणूनच आता अनेक न्यूज चॅनल्सचे अँकर्स नेहमीच्या भव्य स्टुडिओऐवजी त्यांच्या घरी बसून बातम्या देताना दिसतात. त्यांच्यापाठी त्यांच्या नेटवर्कचं ब्रँडिंग वा लोगो असतो. घरचं ब्रॉडबँड वा 4G मोबाईल हॉटस्पॉट वापरून याचं प्रसारण होतं.

"अनेकदा ग्लिच येतात. कधी कधी बुलेटिन सुरू असताना मध्येच अँकरच्या घरातली वीज जाते. कधी कधी इंटरनेट डिस्कनेक्ट होतं. हे सोपं नाही पण आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही एकही बुलेटिन चुकवलेलं नाही," काथे सांगतात.
भारतात सध्या लॉकडाऊनमुळे लोक घरी आहेत, उद्योग बंद आहेत आणि वाहतूक व्यवस्था ठप्प आहे.
पण अनेक पत्रकार विशेषतः मोठ्या नेटवर्क्ससाठी काम करणारे पत्रकार वार्तांकनासाठी नियमितपणे बाहेर जात होते. यातल्या काही पत्रकारांना कोरोनाची लागण झाली.
चेन्नईमधल्या सुमारे 35 पत्रकारांना कोरोना व्हायरसची लागण झाली. कोलकात्यामध्ये एका क्रीडा छायाचित्रकाराचा मृत्यू झालाय. त्यालाही कोव्हिड-19ची लागण झाली असल्याची शंका डॉक्टरांना आहे.
लुधियानातल्या पंजाब केसरी मीडिया समूहातील 19 कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचं वृत्त आहे. कर्मचाऱ्यांनी घरून काम करावं, असं या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना सांगण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
पण पत्रकारांमध्ये संसर्ग होण्याचं सर्वात जास्त प्रमाण मुंबईत आहे. मुंबई कोरोनाच्या संसर्गासाठीचा देशातला सगळ्यात मोठा हॉटस्पॉटही आहे.
मुंबईतल्या चाचणी करण्यात आलेल्या एकूण 167 पत्रकारांपैकी 53 जणांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते. यातले जवळपास 36 जण आता घरी परतले आहेत. तर इतर या आजारातून बरे होतायत. अनेकांना घरी आणि हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलंय, तर आणखी 170 पत्रकारांची चाचणी होणं बाकी आहे.
ज्या टीव्ही पत्रकार आणि कॅमेरामनना कोरोना व्हायरसची लागण झाली, त्यातल्या बहुतेकांमध्ये या संसर्गाची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. किंबहुना भारतातल्या बहुतेक रुग्णांमध्येच या कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणं दिसत नाहीयेत किंवा अगदी सौम्य आढळत असल्याचं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हटलंय.
पण इतक्या पत्रकारांना संसर्ग का होतोय?
"याची काही कारणं आहेत," मुंबईतल्या टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळेंनी सांगितलं. "सुरुवातीला काही नेटवर्क्समध्ये टीव्ही पत्रकारांवर बाहेर जाऊन लॉकडाऊनची दृश्यं मिळवण्याचं संपादकीय दडपण म्हणजेच 'एडिटोरियल प्रेशर' होतं. त्यात असे काही अतिउत्साही पत्रकार होते, ज्यांनी कदाचित पुरेशी खबरदारी घेतली नाही. ते या संसर्गाच्या हॉटस्पॉट्सना जाऊन चित्रीकरण करत होते, मुलाखती घेत होते,"

फोटो स्रोत, Getty Images
हे पत्रकार कंपनीची वाहनं घेऊन चित्रीकरणासाठी फिरत होते आणि ऑफिसला परतल्यानंतर कामाच्या लहानशा जागेत इतर सहकाऱ्यांसोबत बसत होते. या पत्रकारांना घेऊन फिरणाऱ्या गाड्या चालवणाऱ्या किमान 3 ड्रायव्हर्सचा समावेश कोरोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये आहे.
आता परिस्थिती इतकी चिघळळीय की, नेटवर्क्सनी आता त्यांच्या बहुतेक पत्रकारांना घरून काम करायला सांगितलंय.
"पत्रकारांमध्येही भीतीचं वातावरण आहे. बहुतेकांनी आता बाहेर जाणं थांबवलंय. बाहेर जाऊन बातम्या कराव्यात यासाठी आग्रह करताना आता या पत्रकारांचे बॉसेसही काळजी घेतायत," जगदाळे सांगतात.
कोलकात्यामधलेय क्रीडा छायाचित्रकार रॉनी रॉय यांनी सहा वर्षांपूर्वी बीबीसी न्यूज साईटसाठी एक असाईनमेंट केली होती. त्यांना अशी काही भीती वाटत नव्हती.

फोटो स्रोत, Abhijit Addy
मार्च महिन्यात गुजरातमधल्या राजकोटमध्ये झालेली क्रिकेट मॅच कव्हर करणं हे त्यांचं शेवटचं काम होतं. तोंडावर मास्क लावणं, वेळोवेळी हात धुणं अशी खबरदारी त्यांनी घेतली होती. घरी परतल्यानंतर काही आठवड्यांनी त्यांना ताप भरला. कोरडा खोकला आणि अंगदुखीही सुरू झाली.
24 एप्रिलला सकाळी त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. "मला श्वास घ्यायला त्रास होतोय. लवकर अॅम्ब्युलन्स बोलव नाहीतर माझा जीव जाईल," त्यांनी एका फोटोग्राफर सहकाऱ्याला फोनवर सांगितलं.
तीन तासांनी अॅम्ब्युलन्स आली. हॉस्पिटलला पोचल्यानंतर तासाभरात ते कोसळले आणि त्यांना हार्ट अॅटॅक आला. "त्यांची चाचणी करण्यापुरता वेळही मिळाला नाही," रॉय यांचे कुटुंबीय सांगतात. रॉय यांना कोव्हिड 19चा संसर्ग झाला होता, अशी आरोग्य अधिकाऱ्यांना शंका होती. म्हणून रॉय यांच्या कुटुंबियांना त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू दिलं नाही.
कोव्हिड-19 विषयीचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी काही गाईडलाईन्स (मार्गदर्शक तत्त्वं) जाहीर करण्यात आलेली आहेत. पण ही तत्त्वं पाळली जाणं महत्त्वाचं आहे.
पत्रकार बरखा दत्त यांनी या कोव्हिडच्या साथीचं आणि लॉकडाऊनचं भारतातल्या इतर कोणत्याही पत्रकारांपेक्षा जास्त वार्तांकन केलंय. आपल्या धकाधकीच्या दिवसातही या मार्गदर्शक तत्त्वांमधल्या सूचनांचं आपण पालन करत असल्याचं त्या सांगतात.
गेल्या महिन्याभराच्या काळामध्ये बरखा दत्त यांनी त्यांच्या दिल्लीतल्या तळापासून 6 विविध राज्यांमध्ये मिळून एकूण 4,000 किलोमीटर्सपेक्षा जास्तीचा प्रवास केलाय. या संपूर्ण प्रवासात त्यांची 3 सदस्यांची टीम आणि ड्रायव्हर बदलेला नाही.
"विज्ञानासोबतच खबरदारीचे उपायही बदलले आहेत," दत्त यांनी मला सांगितलं. "आम्ही पूर्ण वेळ मास्क आणि ग्लव्हज घातलो. माईक एका मोठ्या लांब काठीला बांधतो आणि जवळ जाऊन मुलाखत घेण्याऐवजी लांबून मुलाखत घेतो."
प्रत्येक शूट नंतर बरखा दत्त यांची टीम त्यांनी वापरलेले ग्लव्हज आणि मास्क टाकून देते. हात धुवून सगळी इक्विपमेंट्सही विशेष स्पंजने निर्जंतुक केली जातात.

फोटो स्रोत, Prashant Tyagi
कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या इंदौरमधल्या कोव्हिड 19 रुग्णालयात जाताना त्यांनी संरक्षक कपडे घातले होते.
"अनोळखी जागी रहावं लागू नये म्हणून आम्ही दिल्लीला घरी परतायचा प्रयत्न करतो. अनेकदा आम्ही 8 तासांचा एका दिशेने प्रवास करतो. चार ते पाच तास शूटिंग करतो आणि मग पुन्हा 8 तासांचा प्रवास करून दिल्लीला परततो," बरखा दत्त सांगतात.
कितीही काळजी घेतली तरी या भीषण साथी दरम्यान पत्रकारिता करणं हे शौर्याचं आणि कठीण काम आहे, हे मात्र खरं.
हेही नक्की वाचा -
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








