उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यासाठी आघाडीतील नेत्यांचं प्लॅनिंग- चंद्रकांत पाटील #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Facebook
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी आघाडीतील नेत्यांचं प्लॅनिंग - चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतला असून तसा प्रस्ताव मंत्रिमंडळानं राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र हा प्रस्तावच बेकायशीर असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
"आमदारकीच्या पेचप्रसंगातून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागावा, हे आघाडीतल्याच काही असंतुष्ट नेत्यांचं प्लॅनिंग आहे. त्यात आम्हाला बोल कशाला लावता," असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला आहे.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं, "उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकीचा महाविकास आघाडीनं राज्यपालांकडे पाठवलेला प्रस्ताव बेकायदेशीर आहे. त्यात आम्ही कशासाठी पुढाकार घ्यायचा. आमदारकीचा पेचप्रसंग निर्माण होऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल, हे महाविकास आघाडीतीलच काही असंतुष्ट नेत्यांचं प्लॅनिंग आहे."
पीएम केअर फंडाला मदत करण्याचं आवाहन केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करण्यात आलं होतं. त्याविषयी बोलताना पाटील म्हणाले, "आम्ही भाडोत्री ट्रोलर्सला घाबरत नाहीत. माझ्या ट्वीटमुळेच 14 जिल्ह्यामध्ये पालकमंत्री गेले. हे माझं यश आहे."
2. 'भारताने घाई करू नये, किमान 10 आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर करावा'
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारतानं किमान 10 आठवड्यांचा लॉकडाऊन पाळला पाहिजे, असं मत जगातील प्रतिष्ठित मेडिकल जर्नल 'लँसेट'चे संपादक रिचर्ड हॉर्टन यांनी व्यक्त केलं आहे. इंडिया टुडेशी ते बोलत होते.
रिचर्ड यांनी म्हटलं आहे, "कोरोना व्हायरस हा कायम राहणार नाही. एक दिवस त्याचा शेवट होईल. आपले देश कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती पाऊलं उचलत आहेत. जर भारतात लॉकडाऊन यशस्वी झाला, तर 10 आठवड्यांनी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसेल. जर व्हायरस पूर्णपणे संपला तर गोष्टी पुन्हा एकदा सामान्य होतील. पण खरं सांगायचं तर अगदीच सामान्य होणार नाहीत. आपल्याला सामाजिक अंतर पाळावं लागणार आहे. कदाचित आपल्याला मास्कचा वापरही करावा लागेल, तसंच स्वच्छतेकडे सर्वांत जास्त लक्ष द्यावं लागणार आहे".

फोटो स्रोत, LANCET.COM
भारतात लॉकडाऊनची मुदत संपत असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितलं, की मला कल्पना आहे की तुम्हाला अर्थव्यवस्थेला चालना द्यायची आहे. पण घाई करु नका. जर तुम्ही लॉकडाऊन संपवण्यात घाई केली आणि जर व्हायरसची दुसरी लाट आली तर ती जास्त भयंकर असेल.
"अशावेळी तुम्हाला पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात करावी लागणार आहे. तुम्ही लॉकडाऊनमध्ये इतके प्रयत्न आणि वेळ घालवला आहे. तो वाया जाऊ देऊ नका. लॉकडाउन शक्यतो 10 आठवड्यांसाठी सुरु राहू द्या," असं रिचर्ड यांनी सांगितलं आहे.
रिचर्ड यांनी यावेळी चीनचं उदाहरण देत वुहानमध्ये 10 आठवड्यांनी परिस्थिती नियंत्रणात कशी आली याबद्दल सांगितलं.
"वुहाननं 23 जानेवारीला 10 आठवड्यांसाठी लॉकडाऊन जाहीर केला होता. अशा पद्दतीनं त्यांनी व्हायरसवर नियंत्रण मिळवलं. आता तेथील परिस्थिती सामान्य होत आहे. व्हायरसचं स्वरुप पाहता हेच योग्य मॉडेल आहेत. कारण जर तुम्ही सोशल डिस्टन्सिंग नाही पाळलं, तर वेगानं त्याचा फैलाव होतो," असं रिचर्ड यांनी सांगितलं आहे.
3. अर्णब गोस्वामी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल कथित अपमानास्पद उद्गार काढल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात देशभरात डझनभर याचिका दाखल झाल्या आहेत. यानंतर अर्णब यांनी दिलासा मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
अर्णब यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून यावर शुक्रवारी (24 एप्रिल) सकाळी साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि एम. आर. शाह याचिकेवर सुनावणी घेणार आहेत. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, ARNAB GOSWAMI/SOCIAL MEDIA
बुधवारी (22 एप्रिल) संध्याकाळी ऑन एअर गेलेल्या कार्यक्रमात सोनिया गांधी यांच्याबद्दल कथित अनुद्गार काढल्याप्रकरणी महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगढ, राजस्थान, झारखंडमधल्या पोलीस ठाण्यांमध्ये अर्णब यांच्याविरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी एफआयआर नोंदवले आहेत.
बुधवारी झालेल्या कार्यक्रमानंतर आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप अर्णब यांनी केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
4. DRDO ची मोबाईल लॅब, दिवसाला कोरोनाच्या 1000 टेस्ट
कोरोनाची चाचणी करण्यासाठी संरक्षण संशोधन विकास संस्थेनं (DRDO) 15 दिवसांमध्ये मोबाईल लॅब तयार केली असून तिच्याद्वारे दिवसाला 1 हजार सॅम्पलची चाचणी केली जाणार आहे. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे DRDO ने तयार केलेल्या मोबाईल लॅबचे उद्घाटन केले.

फोटो स्रोत, Getty Images
या प्रयोगशाळेच्या मदतीनं कोरोना विषाणू संदर्भातल्या चाचण्या करता येणार आहेत. प्रयोगशाळेची निर्मिती DRDO आणि हैदराबादचे ईएसआयसी रुग्णालय यांनी संयुक्तपणे केली आहे.
DRDO च्या मोबाईल प्रयोगशाळेत दररोज 1 हजार नमुन्यांची चाचणी करता येईल. ही आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रयोगशाळा जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआर या भारतीय संस्थेच्या मानकांनुसार तयार करण्यात आली आहे.
5. कृषी विभाग देणार शेतकऱ्यांना स्वतंत्र पास
खरीप हंगामाकरता शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरवठा करण्यासाठी कृषी विभाग स्वतंत्र पास देणार आहे. अॅग्रोवननं ही बातमी दिली आहे.
लॉकडाऊनदरम्यान शेती साहित्याचा पुरवठा करण्यात अडचणी आल्या आहेत. त्यामुळे खतांची मालवाहतूक आणि पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे. ही साखळी पूर्वपदावर आणण्यासाठी कृषी खाते स्वतंत्र पास देणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 43 लाख टन खते उपलब्ध करून द्यायची आहे. विविध कंपन्यांच्या प्रकल्पांमध्ये खते उपलब्ध आहेत, मात्र ती गावपातळीपर्यंत पोहोचण्यासाठी पासेसची व्यवस्था करण्यात येणार आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








