विठ्ठलभक्ती ते समाजप्रबोधन, अशी आहे महाराष्ट्रातील मुस्लीम मराठी संतांची परंपरा

फोटो स्रोत, Vitthal Rukmini Mandir Samit
- Author, प्राजक्ता धुळप
- Role, प्रतिनिधी, बीबीसी मराठी
- वाचन वेळ: 7 मिनिटे
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला जात, वर्ग इतकंच काय तर धर्माची देखील अट नाही. हे वारकरी संप्रदायाचं वैविध्यच नाही तर वैभवच म्हणावं लागेल. तुम्ही वारकरी व्हायला केवळ एकच अट असावी लागते ती म्हणजे तुमचा ईश्वराबाबत असलेला प्रेमभाव.
हीच शिकवण जशी वारकरी संप्रदायात जन्मलेल्या मराठी संतांनी दिली आहे तशीच ती दख्खनी, दख्खनी उर्दू, कोकणी, हिंदुस्तानी अशा विविध भाषा बोलणाऱ्या मुस्लीम संतांनी देखील दिली आहे.
या संतांच्या अथक परिश्रम आणि प्रबोधनातूनच सलोख्याची एक परंपरा निर्माण झाली आहे. धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर तर त्यांचे हे योगदान अधिकच लख्ख दिसते. त्यांच्या योगदानाचा आढावा आपण या लेखातून घेणार आहोत.
महाराष्ट्रातल्या मुस्लीम मराठी संतांच्या योगदानाविषयी ज्येष्ठ संशोधक आणि लोकसंस्कृतीचे अभ्यास डॉ. रा.चिं. ढेरे लिहितात, "भारतातील संतांनी भारतीय एकात्मतेचा पाया दृढ केला आहे. या उदार आणि समन्वयशील परंपरेच्या शिल्पकारांमध्ये हिंदूंबरोबर मुसलमानही आहेत."
"इस्लामच्या आक्रमणानंतर भारतीय एकात्मतेच्या बाबतीत जी नवी आव्हाने निर्माण झाली. ती आत्मिक पातळीवर हिंदू-मुस्लीम संतांनी धैर्याने स्वीकारली आणि त्यांनी त्यासाठी मोठी किंमतही मोजली."
या परंपरेत मुंतोजी, शहा मुंतोजी बामणी, अंबर हुसेन, चांद बोधले, शेख महंमद, बाजीद पठाण आणि शहाबेन, आलमखान, सैयद हुसेन, जमाल फकीर, शहामुनी, लतीफ शहा, शेख सुलतान यांची नावं आवर्जून घेतली जातात. याखेरीजही अनेक संतांनी महाराष्ट्राच्या भूमीवर आपली छाप सोडली आहे.
या संतांनी भारतीय साहित्यात महत्त्वाचं योगदानही दिलं आहे. असे संतकवी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातही होते, असं नमूद करताना संतसाहित्याचे अभ्यासक, संशोधक डॉ. यू. म. पठाण यांनी उत्तरेतल्या रहिम, रसखान आणि कबीर यांच्या परंपरेचा उल्लेख केला आहे.
ते म्हणतात की, "वारकरी संप्रदायात ज्ञानाचा एका, नामियाचा तुका यासोबत कबिराचा शेका ही उक्ती जोडली जाते. ज्ञानदेव आणि एकनाथ, नामदेव आणि तुकोबा या संतकवींमध्ये जशी एकरुपता आढळते तशी कबीर आणि शेख महंमद यांच्यात आढळते.
अनेक मुस्लीम संतांचा वारकरी संप्रदायाशी खूप जवळून संबंध होता. तर वारकऱ्यांनाही संत महंमद यांच्यासारखे संत जवळचे वाटत."

अनेक नाथसंप्रदायी संतांना मुस्लीम संतांच्या पर्यायी नावांनीही ओळखलं जातं, हा स्वतंत्र अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे असं मत डॉ. यु. म. पठाण नोंदवतात
मुंतोजी उर्फ वजिरुल मुल्क
संत मुंतोजी हे खिलजी घराण्यातील होते. त्यांचा काळ इ. स. 1435 ते 1450 असा मानला जातो. त्यांनी लिहिलेल्या संगीत विषयक ग्रंथाचं नाव 'संगीत मकरंद' आणि ज्योतिषविषयक ग्रंथाचं नाव विजयवैभव. त्यांच्या वडिलांचं नाव जिया दोलतखान होतं तर गुरूंचं नाव महेंद्राचार्य होतं.
मुस्लीम मराठी संतकवीची ही पहिली ग्रंथनिर्मिती असावी असं मत डॉ. यु. म. पठाण मांडतात.
शहा मुंतोजी बामणी
मुंतोजी बामणी यांना 'मृत्यूंजय' नावानेही ओळखले जाते. बहामनीच्या राजघराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या चरित्रकारांनी त्यांना बेदरचा बादशाहा असंही म्हटलं आहे.
आपल्या वैभवाचा त्याग करुन योगमार्गावर जात त्यांनी पुढे पंढरीची वाट धरली आणि वैष्णवांच्या मांदियाळीत ते सामील झाले. विठ्ठलाची भक्ती करत ते आनंद संप्रदायात सामील झाले आणि त्यांनी स्वामी सहजानंदाचं शिष्यत्व पत्करलं.
याच गुरुंनी त्यांचं नाव मृत्यूंजय, ज्ञानसागरानंद ठेवले, असं चरित्रकार सांगतात. त्यांचा नागेश संप्रदायाशीही संबंध होता असंही सांगितलं जातं.
मुंतोजींनी सीताबोध, पंचीकरण, अद्वैतप्रकाश, प्रकाशदीप, स्वरुपसमाधान, अनुभवसार, गुरूलीला, विवेकोत्पत्ती, अनुभवामृत हे ग्रंथ लिहिले. यातील बहुतेक ग्रंथ तंजावूरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात आहेत.
संत मुंतोंजींचा काळ निश्चित माहित नसला तर साधारण 1627 च्या सुमारास संत म्हणून त्यांची किर्ती महाराष्ट्रभर झाली असावी असावी असा अनुमान डॉ. रा.चिं.ढेरे काढतात.
शहा मुंतोजी बामणी हे आधी सुफी संप्रदायातील कादरी शाखेचे अनुयायी होते. नारायणपूरच्या त्यांच्या समाधीला 'मूर्तजा कादरीका दर्गा' नावाने ओळखलं जातं.
बिजापूरमध्ये हा दर्गा हजरत सईद मुर्तझा शहा कादरी म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून दर्ग्याला सर्व धर्मीय लोक भेट देतात.
गीतेवर भाष्य करणारे अंबरहुसेनी
सतराव्या शतकाच्या सुरुवातीला होऊन गेलेले हे संत अंबरहुसेनी नावाने ओळखले जातात. भगवद्गीतेवरच्या टिकेसाठी त्याचं नाव आदराने घेतलं जातं. टीका म्हणजे भाष्य. गीतेचा भावार्थ जाणून घेण्यासाठी त्यांनी ही रचना केली.
871 ओव्या असलेली ही गीताटीका त्यांनी महाराष्ट्र भाषेत लिहिली. मूळ संस्कृत शब्दार्थ त्यांनी त्या काळातील मराठीत आणले. यावरून हुसेन अंबरखान हे संस्कृतपंडित आणि मराठीचेही सखोल अभ्यासक असल्याचं मानलं जातं.
अंबरखान यांचं घराणं दौलताबादमध्ये निजामशाहीच्या सेवेत होतं.

फोटो स्रोत, Padmgandha Publication
निजामाच्या सेवेत असणारे अंबरखान हेच हुसेन अंबरखान यांचे वडील याकुत अंबरखान असावेत, असं डॉ. ढेरे लिहितात. "चांद बोधले, जनार्दनस्वामी, अंबाजीपंत हे हिंदू संत दौलताबाद येथे याकुत अंबरखान यांच्या आश्रयाने आपली पारमार्थिक सेवा करीत असत. हुसेन अंबरखान याच वातावरणात वाढले. त्यामुळे त्यांच्या मनावर हिंदू साधूंच्या सान्निध्याचे दृढ संस्कार झाले असावेत."

"संतवाङ्मयाच्या अभ्यासकांना संस्कृत गीतेचा मराठी अवतार घडविणारा आणि गणेशवंदन करणारा हा मुसलमानसाधू धार्मिक क्षेत्रातील भेदाभेदांच्या आग्रहाचा नाश करून अद्वैताच्या अधिष्ठानावर उभा आहे", असे ढेरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रापासून तंजावरपर्यंत त्यांची शिष्यपरंपरा दिर्घकाळ टिकून होती.
चांदसाहेब कादरी उर्फ चांद बोधले
देवगिरी किल्ल्याजवळची चांद बोधले म्हणजेच चांदसाहेब कादरी या सुफी संतांची समाधी जनार्दन स्वामींनी बांधली.
चांद बोधले यांना दत्ताचा अवतारही मानलं गेलं. नाथांच्या पारंपारिक चरित्रात त्यांचा दत्तावतारी साधू असा उल्लेख असल्याचं डॉ. यू. म. पठाण सांगतात. नाथांचे चरित्रकार कृष्णदास जगदानंदनंदन यांच्या 'प्रतिष्ठानचरित्र' या ग्रंथाचा दाखला देतात. त्यात म्हटलंय-
एकनाथासी करीतां बोध । तवं आला चांदबोध ।
चंद्रशेखर महासाधू । अवतार प्रसिद्ध दत्तात्रयाचा ।।
चांद बोधले यांचे शिष्य जनार्दन स्वामी आणि शेख महंमद. आणि संत एकनाथ हे जनार्दन स्वामींचे शिष्य.
श्रीगोंद्याचे शेख महंमद
अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंद्यात हा शेख महंमद यांचा प्रसिद्ध दर्गा आहे. संतांच्या मांदियाळीत शेख महमंद यांना कबिराचा अवतार म्हणतात.
कवी मोरोपंत लिहितात-
तारिती न किर्तीच्या, जो न लवे, त्या मुसल-मानवा नावा ।
हर्षे सेख महामद, भगवज्जन मुसलमान मानावा ।।
(जो माणूस लवत नाही, अशा मुसळासारख्या ताठ माणसाला भवसागरातून केवळं कीर्तीच्या नावा तारु शकत नाहीत. म्हणूनच विनम्रतेचा आदर्श असलेल्या मुसलमान भगवद्भक्त शेख महमंदाचा हर्षभराने गौरव करावा)

फोटो स्रोत, Nitin Nagarkar
योगसंग्राम हा त्यांचा प्रमुख ग्रंथ. ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील योगदुर्गाची कल्पना घेऊन साधना कशी करावी याचं वर्णन या ग्रंथात आहे.
वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान आणि इस्लाम धर्माचं तत्वज्ञान त्यांच्या रचनांमध्ये हातात हात घालून आल्याचं दिसतं, असं अभ्यासक म्हणतात. त्यांनी मराठी, हिंदी, उर्दू, फारसी भाषांमध्ये रचना केल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे निजामशाहीच्या नोकरीत होते. डॉ. ढेरे लिहितात की, मालोजीराजांचा मनःपिंड भक्तिपरायण होता. पीर-फकिरांविषयीही त्यांची विशेष श्रद्धा होती.
दौलताबादच्या वातावरणात ख्याती पावू लागलेल्या शेख महमदांचं मालोजीराजांनी आणि त्यांचे दिवाण बाळाजी कोन्हेरे यांनी शिष्यत्व स्वीकारलं. श्रीगोंदे येथे मठ बांधून दिला. ही घटना 1595 च्या सुमारास घडली.

फोटो स्रोत, Rana Safvi
शेख महंमद समाज प्रबोधनकार होते, देवदासीसारख्या प्रथा, बुवाबाजी अशा सर्व धर्मांमधल्या कर्मठपणावर त्यांनी ताशेरे ओढले. हिंदू संतवाणीचा स्वीकार केला म्हणून कडवे मुसलमान त्यांना 'काफर' समजत तर कर्मठ हिंदूही त्यांची निंदा करत.
'मज छळती दुर्जन, नानापरि बोलती मज अवलक्षण' अशी नोंद करत लोकांच्या छळाचे प्रसंगही त्यांनी आपल्या रचनांमध्ये उभे केले आहेत. लोक प्रबोधनासाठी त्यांनी भारुड हे माध्यम प्रभावीपणे हाताळलं.

फोटो स्रोत, Rana Safvi
शेख महमंदनी गणेश आणि विठ्ठलाचं मराठी स्तोत्र लिहिलं, आणि अल्लाची दक्खिनी भाषेतली आरती लिहिली आहे. दक्खिनी म्हणजे मराठी आणि फारसी मिश्र भाषा. अनेक संतांनी या दक्खिनी भाषेत लेखन केलं आहे.
'सच्चा पीर कहे मुसलमान
मऱ्हाटे म्हणवती 'सद्गुरू' पूर्ण
दोन्हीत नाही भिन्नत्वेपण
आखो खोल देख भाई' (योग संग्राम)
सुफी परंपरेतील कादिरी शाखेच्या या संताची कबर श्रीगोंद्यात आहे. दरवर्षी होणाऱ्या उरुसात हिंदू मोठ्या संख्येने सहभागी होतात.
संत बाजीद पठाण आणि संत शहाबेन
सतराव्या शतकातील संत बाजीद पठाण हे केशवस्वामी भागानगरकर यांचे शिष्य होते. विजापूरच्या आदिलशाहीत अधिकारी असलेल्या संत बाजीद यांनी मराठीत काही बदं लिहिली तर दक्खिनीत पाचशे साक्या लिहिल्या.
बाजीद यांचे गुरूबंधू शहाबेन उर्फ शांबेग यांच्या पदांचं बाड हैदराबादमध्ये एका खासगी संग्रहात आहे.
भोंदू बाबांच्या विरोधात आलमखान
संत आलमखान महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील सोलापूरजवळच्या परिसरात त्यांचं वास्तव्य होतं.
डॉ. पठाण यांच्या मते, "नागेश संप्रदाय हा चौदाव्या शतकातील समन्वयवादी संप्रदाय होता. त्याच्या शिष्यपरंपरेतील आलमखान या संतकवींची रचना औसा, किल्लारी, अहमदपूरसारख्या मराठवाड्यातील गावांमध्ये मठा-मंदिरांत आढळते. तशीच कर्नाटकातल्या करळी-मुगळीच्या परिसरातही आढळते."

फोटो स्रोत, Getty Images
आलमखान यांनी भोंदू साधूंच्या ढोंगीपणाबद्दल, मंत्रतंत्र, आसक्ती, जनसामान्याना नाडण्याच्या वृत्तीवर कठोर शब्दांत समाचार घेतला आहे.
सात्विक पाहूनी भूलवीसी । त्यासी नागविशी ।
ऐसे किती एक नाडिसी? अंती पस्तावीसी ॥
मार्ग नोहे रे नोहे रे संतांचा । हा तव ठकपणाचा ।
साठा करविला नरकाचा । तयासी मोक्ष कैसा ? ॥
त्यांच्या वाणीत-लेखणीत स्थानिक लोकभाषा, मराठी, कन्नड, दक्खिनी भाषांचा संगम झाल्याचं अभ्यासक म्हणतात.
सैयद हुसेन आणि जमाल फकीर हे देखील नागेश संप्रदायाचे संत. काही सुफी संत चौदाव्या शतकात नागेश संप्रदायाशी जोडले गेले. सैयद हुसेन उर्फ जंगली फकीर यांनी प्रामुख्याने पौराणिक कथांवर दिर्घ काव्य लिहिली. रा. चिं. ढेरेंनी जंगली फकीर यांना 'पुराणकथांचे गायक' म्हटलंय.
तर कोल्हापूरच्या जमाल फकीर यांचं साहित्य विखुरलेलं असल्याने त्यावरही संशोधन करण्याची गरज अभ्यासक व्यक्त करतात.
मराठवाड्यातील संत शहामुनी
जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये शहागड इथे शहामुनींची समाधी आहे. 1748 ते 1808 हा त्यांचा काळ. शहामुनींनी 'सिद्धांतबोध' या ग्रंथात आपल्या मागील चार पिढ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकलाय.
पणजोबांपासून फारसी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व, तसंच आजोबा वैष्णवभक्त असल्याचं ते लिहितात.
सिद्धांतबोध हा ग्रंथ महानुभाव संप्रदायात सर्वात लोकप्रिय असून तो महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चातुर्मासात सामुहिकपणे वाचला जातो, असं ढेरे आणि पठाण दोघांनीही लिहिलंय.

फोटो स्रोत, Getty Images
लतीफ शहा
वारकरी परंपरेशी नातं सांगणाऱ्या लतीफ शहा यांचा दर्गा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात आहे.
इतिहासकारांच्या मते त्यांचा काळ सतराव्या शतकाचा उत्तरार्ध ते अठराव्या शतकाचा पूर्वार्ध असावा. लतीफ यांची विठ्ठलभक्ती या ओव्यांमध्ये दिसून येते.

'आता पूजा कोठे वाहू? पाहता देहीच झाला देवु ।
भावे पूजन करिता । देही देव झाला तत्वतः ॥
ताडू गेली तुळसीपाण । तेथे अवघा मधूसुदन ॥
अन्न, गंध, पुष्प, धूप । अवघे विठ्ठलस्वरूप ।
फळ, तांबूळ, नैवद्य । पाहतां अवघाचि गोविंद ॥
म्हणे लतीफ ब्रह्मज्ञानी । अवघा पाहता चक्रपाणी' ।
शेख सुलतान
छत्रपती शाहू महाराजांचा आश्रय लाभलेले हे कऱ्हाडचे संत हे तुरेवाला शाहीर म्हणून प्रसिद्ध होते. आधी शृगांरिक रचना करणारे शेख सुलतान संतांच्या सानिध्यात आल्यानंतर साधना करू लागले.
पौराणिक कथांच्या आधारे त्यांनी गणपती जन्माचं 28 ओव्याचं कथाकाव्य, 17 ओव्यांची हनुमंत जन्मकथा, 49 ओव्यांची शिवरात्रीकथा लिहिली.
जसं सय्यद अनगडशाहा बाबा आणि संत तुकाराम यांच्या मैत्रीचा दाखला दिला जातो. तसंच अभ्यासक परभणीचे प्रसिद्ध संत शेख तुराब यांनी संत रामदास यांच्या मनाच्या श्लोकाचं केलेलं भाषांतर याचाही उल्लेख करतात. 'मनसमझावन' या नावाने त्यांनी दक्खिनी उर्दूत हे श्लोक आणले.
महाराष्ट्रातल्याच नाही तर संपूर्ण भारतात अशा धार्मिक, पंथिक, सांप्रदायिक समन्वयक भूमिका असल्याचा इतिहास सांगतो.
गंगा-जमुना तहजिब ही काल्पनिक नाही तर वास्तवातली संकल्पना असल्याचं मुस्लीम मराठी संतांच्या उदाहरणांवरुन समोर येतं.
धार्मिक ध्रुवीकरणाच्या विखारी वातावरणात संतांच्या शिकवणीतून बरंच काही शिकण्यासारखं आहे.
संदर्भ:
मुसलमान मराठी संतकवी- डॉ. रामचंद्र चिंतामणी ढेरे
मुसलमान(सुफी) संतांचे मराठी साहित्य- डॉ. यु. म. पठाण
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











