पाईपलाईन कामासाठी 21 किलो सोन्याची बिस्किटं देणारा 'गूढ माणूस' कोण?

फोटो स्रोत, Osaka City Waterworks Bureau

फोटो कॅप्शन, ओसाका शहरातील अधिकाऱ्यांना एका गूढ देणगीदारानं 21 किलो सोनं देणगी म्हणून दिलं आहे
    • Author, कोह इव्ह
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

जपानमधील एका शहराला त्यांच्या जुन्या झालेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेची दुरुस्ती करण्यासाठी चक्क सोन्याच्या स्वरुपात देणगी मिळाली आहे. तीही थोडीथोडकी नाही तर तब्बल 21 किलो सोन्याच्या बिस्किटांची देणगी मिळाली आहे.

सोन्याच्या या बिस्किटांची किंमत साधारणपणे 36 लाख डॉलर्स (अंदाजे 32 कोटी, 66 लाख, 29 हजार रुपये) आहे. नोव्हेंबर महिन्यात नाव गुप्त ठेवण्याची इच्छा असणाऱ्या एका देणगीदारानं ही देणगी दिली होती, अशी माहिती ओसाका शहराचे महापौर हिदेयुकी योकोयामा यांनी गुरुवारी (19 फेब्रुवारी) एका पत्रकार परिषदेत दिली.

ओसाका हे शहर जपानमधील कानसाई प्रदेशात असून ते एक व्यावसायिक केंद्र आहे. ओसाकाची लोकसंख्या जवळपास 30 लाख आहे. हे जपानमधील तिसरं सर्वात मोठं शहर आहे.

मात्र जपानमधील इतर अनेक शहरांप्रमाणेच, ओसाकामधील पाणीपुरवठा करणारे आणि सांडपाण्याचे पाईप जुने होत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या संदर्भात चिंता वाढते आहे.

ओसाकामधील पाईप गळतीची वाढती समस्या

ओसाकाच्या वॉटरवर्क्स ब्युरोनुसार, 2024 च्या आर्थिक वर्षात ओसाकातील रस्त्यांखाली पाण्याच्या पाईपमध्ये गळती होण्याच्या 90 हून अधिक घटना नोंदवण्यात आल्या.

"पाण्याच्या जुन्या पाईपना हाताळण्यासाठी किंवा या समस्येला तोंड देण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. त्यामुळे या देणगीबद्दल कौतुक करण्याशिवाय माझ्याकडे काही नाही," असं योकोयामा गुरुवारी (19 फेब्रुवारी) या भल्यामोठ्या देणगीबद्दल पत्रकारांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

योकोयामा म्हणाले की ही रक्कम 'आश्चर्यचकित' करणारी आहे. त्याबद्दल बोलताना त्यांच्याकडे 'शब्द राहिलेले नाहीत'.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

या गूढ देणगीदारानं यापूर्वी महापालिकेच्या वॉटरवर्क्ससाठी 5 लाख येनची (अंदाजे 2 लाख 92 हजार रुपये) रोख रक्कम दिली होती, असं ते पुढे म्हणाले.

शहराच्या वॉटरवर्क्स ब्युरोनं गुरुवारी (19 फेब्रुवारी) एका निवदेनात म्हटलं आहे की सोन्याच्या स्वरुपात देण्यात आलेल्या या देणगीबद्दल ते कृतज्ञ आहेत. ते या देणगीचा वापर खराब झालेल्या पाण्याच्या पाईपची दुरुस्ती करण्याबरोबरच इतर चांगल्या कामांसाठी करतील.

जपानमधील सिंकहोलचं संकट

स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, जपानमधील 20 टक्क्यांहून अधिक पाण्याच्या पाईपनं त्यांची कायद्यानं 40 वर्षे वापरता येण्याची मुदत (लीगल सर्व्हिस लाईफ) ओलांडली आहे.

जपानमधील शहरांमध्ये सिंकहोलची समस्यादेखील वाढत्या प्रमाणात सामान्य झाली आहे. अनेक शहरांमध्ये सांडपाण्यासाठीच्या पाईपलाईनची पायाभूत सुविधा जुनी झाली आहे.

गेल्या वर्षी, साईतामा प्रीफेक्चरमध्ये एका प्रचंड सिंकहोलमध्ये ट्रकची केबिन म्हणजे ड्रायव्हर बसतो तो भाग गेला होता. त्यात ड्रायव्हरचा मृत्यू झाला. हा सिंकहोल सांडपाण्याच्या फुटलेल्या पाईपमुळे झाल्याचं मानलं गेलं होतं.

या घटनेमुळे जपानमधील अधिकाऱ्यांना देशभरातील गंजलेले पाईप बदलण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये वाढ करावी लागली. मात्र निधीच्या कमतरतेमुळे अशा पाईपच्या दुरुस्तीच्या किंवा नवीन पाईप टाकण्याच्या कामांची प्रगती थांबली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.