प्रमुख माओवादी नेता देवजींचं आत्मसमर्पण; तेलंगणाच्या पोलीस महासंचालकांनी दिली माहिती

- Author, प्रवीण शुभम आणि बल्ला सतीश
- Role, बीबीसी तेलुगू प्रतिनिधी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
सीपीआय (माओवादी) संघटनेचा प्रमुख माओवादी नेता थिप्परी तिरुपती ऊर्फ देवजी यांनी आपल्या तीन सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.
देवजीने काही दिवसांपूर्वीच आत्मसमर्पण केलं होतं. तेलंगणाचे पोलीस महासंचालक शिवाधर रेड्डी यांनी मंगळवारी (24 फेब्रुवारी) याची अधिकृत माहिती दिली. त्यांच्या उपस्थितीत देवजी आणि त्यांच्या साथीदारांनी आत्मसमर्पण केले.
या आत्मसमर्पणाबाबत बीबीसीचे सहकारी पत्रकार आलोक प्रकाश पुतुल यांनी बस्तर पोलीस रेंजकडून अधिक माहिती घेतली.
बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. याबाबत बोलताना म्हणाले की, "हिंसाचाराची व्याप्ती कमी होत असून शांततेची प्रक्रिया अधिक बळकट होत असल्याचं यावरून दिसून येतं."
उर्वरित माओवाद्यांनाही मुख्य प्रवाहात परतण्याचं आवाहन सुंदरराज पी. यांनी केलं.
गेल्यावर्षी मे महिन्यात छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये पोलिसांनी एका चकमकीत 27 माओवाद्यांसह नंबाल्ला केशव राव उर्फ बसवराजूला मारल्याचा दावा केला होता.
माओवादी पार्टी संघटनेनुसार, सद्यपरिस्थितीत थिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी हेच त्यांचे सर्वोच्च नेते होते.
छत्तीसगड सरकारने देवजीवर दीड कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं, तर तेलंगणा पोलिसांनी 25 लाख रुपयांचे बक्षीस ठेवलं होतं.

फोटो स्रोत, Alok Putul
देवजी यांच्यासोबत आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये केंद्रीय समितीचा सदस्य मुरली ऊर्फ संग्राम याचा समावेश असून, त्यांच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षीस होतं.
तसेच आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये टीएससी सचिव दामोदर आणि डीकेएसझेडसी सदस्य नरसिंहा रेड्डी यांचाही समावेश आहे.
सीपीआय (माओवादी) च्या पोलिट ब्युरोचे सदस्य राहिलेले देवजी यांच्यासह हे चारही नेते गेल्या अनेक दशकांपासून भूमिगत होते.
आआधी, पीटीआय या वृत्तसंस्थेनं 22 फेब्रुवारी रोजी तेलंगणा पोलिसांचा संदर्भ देत देवजींनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती दिली होती. पीटीआयच्या वृत्तानंतर छत्तीसगडच्या उपमुख्यमंत्र्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला होता.
'देवजी'नं तेलंगणात आत्मसमर्पण केल्याच्या बातम्यांबद्दल छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले होते की, "बसवराजूनंतर देवजींनंच नक्षल चळवळीची (सशस्त्र नक्षल चळवळीचं) धुरा सांभाळली होती. देवजींनं आज (22 फेब्रुवारी) तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर, केंद्रीय समितीचा सदस्य, संग्राम उर्फ मुरली यानं देखील आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे."
31 मार्चपर्यंत देशातील सशस्त्र नक्षलवादी चळवळीची समस्या संपुष्टात येईल, असं विजय शर्मा यावेळी म्हणाले.
कुटुंबातील सदस्य काय म्हणाले?
देवजींचा भाऊ तिप्पिरी गंगाधर यानं स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं, "त्यांच्या अटक आणि चकमकीची बातमी चिंताजनक आहे. सत्य काय आहे, हे आम्हाला माहीत नाही. जर ते पोलिसांच्या ताब्यात असतील, तर त्यांना कोणताही अपाय न करता न्यायालयासमोर हजर करण्यात आलं पाहिजे. ते सुरक्षित राहावेत, अशी आमची इच्छा आहे."

फोटो स्रोत, ANI
देवजींच्या छोट्या भावाची मुलगी, तिप्पिरी सुमानं यापूर्वी त्यांना एक खुलं पत्र लिहून आत्मसमर्पण करण्याची विनंती केली होती.
तिनं लिहिलं होतं, "जेव्हा जेव्हा तुमचं नाव घेतलं जातं, तेव्हा मला एक विचित्र अभिमान आणि वेदनेची जाणीव होते. तुमची हिंमत आणि दृढनिश्चय मला बराच विचार करण्यास भाग पाडते. तुम्ही एक समतावादी समाज बनवण्यासाठी गेला होता. अलीकडच्या काही घटना पाहून मला खूप चिंता वाटते. या कठीण परिस्थितीत तुम्ही परत येण्याची मी मनापासून इच्छा व्यक्त करते."
देवजींच्या आत्मसमर्पणाची इतकी चर्चा काय होते आहे?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अनेकवेळा दावा केला आहे की 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षल चळवळ संपुष्टात आणली जाईल.
त्या दृष्टीकोनातून देवजींचं आत्मसमर्पण ही एक मोठी घटना मानली जात आहे.
गेल्या वर्षी पोलिसांबरोबरच्या चकमकीत नंबाल्ला केशव राव उर्फ बसवराजूंचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देवजींनं पक्षाची जबाबदारी सांभाळली होती. सध्या ते पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सरचिटणीस पदावर होते.

फोटो स्रोत, @AmitShah
कोरुटलामधील तिप्पिरी तिरुपतींचा जन्म सध्याच्या जगतियाल जिल्ह्यातील एक दलित कुटुंबात झाला होता. ते 1980 च्या दशकात करीमनगरमधील एसआरआर महाविद्यालयात बीएससी करत असताना विद्यार्थी राजकारणात आले.
महाविद्यालयात असताना विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या संघर्षानंतर ते भूमिगत झाले.
तिरुपती (देवजी) करीमनगर भागात सक्रिय होते. ते एका कट्टरतावादी विद्यार्थी संघटनेत सहभागी झाले होते.
प्रतिबंधित संघटनेचे माजी सदस्य आणि करीमनगरचे रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने बीबीसीला सांगितले की "1981-82 मध्ये, रायथु कुल्ली संगमनं एक विशाल सभा घेतली होती. त्यावेळेस ती एक ऐतिहासिक सभा होती. त्याचं आयोजन तिरुपतीनंच केलं होतं. नंतर 1983-84 मध्ये पक्षानं त्याला दंडकारण्यात पाठवलं."
दंडकारण्यातील जंगलात
देवजी यांनी करीमनगर शहरात आणि नंतर सिरोंचा परिसरात माओवादी पक्षाचा आयोजक म्हणून काम केलं. देवजींनी जवळपास 15 वर्षे गडचिरोलीत काम केलं. त्यांनी पक्षाचा डिव्हिजनल कमिटी सदस्य म्हणूनही काम केलं.
नंतर 1993-94 मध्ये त्याला दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य म्हणून निवडण्यात आलं.
देवजी 1990 च्या दशकाच्या मध्यापर्यंत पक्षाच्या उभारणीच्या प्रक्रियेत कार्यरत होते. नंतर ते सशस्त्र गटाकडे वळले. तेव्हापासून ते पक्षाच्या सशस्त्र गटामध्येच होते.
सीपीआय (माओवादी)नं 1996 च्या जवळपास दंडकारण्यात त्यांची पहिली प्लॅटून तयार केली. ती एक सशस्त्र प्लॅटून होती. देवजींनी या प्लॅटूनचा पहिला कमांडर म्हणून काम केलं.
नंतर 2001 मध्ये ते पक्षाच्या केंद्रीय समितीचा सदस्य झाले. त्यावेळेस ते केंद्रीय समितीमधील सर्वात तरुण सदस्यांपैकी एक होते. केंद्रीय समितीबरोबरच, देवजी सेंट्रल मिलिटरी कमिशन (सीएमसी) चा सदस्यही झाले.
त्यांनी माओवादी पार्टीमध्ये संजीव, चेतन, सुदर्शन आणि रमेश अशा वेगवेगळ्या नावांनी काम केलं.

फोटो स्रोत, NIA
एका माजी माओवाद्यानं बीबीसीला सांगितलं, "2004 मध्ये पीपल्स वॉर माओवादी झाल्यानंतरदेखील, ते केंद्रीय समिती आणि सेंट्रल मिलिटरी कमिशनमध्ये होते. बसवराजू सेंट्रल मिलिटरी कमिशनचा प्रमुख असताना तिरुपतींनी यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
"2018 मध्ये बसवराजू केंद्रीय समितीचे सरचिटणीस झाल्यानंतर देवजी हे सेंट्रल मिलिटरी कमिशनचे प्रमुख झाले."
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये देवजींची प्रमुख भूमिका असल्याचं सांगितलं जातं.
पक्षाच्या जवळच्या निरीक्षकांचं म्हणणं आहे की देवजींनं माओवादी लष्करी प्रशिक्षण आणि मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
असंही म्हटलं जातं की पीएलजीए (पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) च्या उभारणीमागे त्याचा हात होता.
राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)च्या सर्वात वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत देवजीचा समावेश आहे. त्याच्या नावावर बक्षीसही जाहीर करण्यात आलेलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











