नरेंद्र मोदी सरकारचं दोन हजार कोटींचं 'मिशन मौसम' काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images
भारत सरकारने 11 सप्टेंबर 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीनंतर 'मिशन मौसम' नावाच्या योजनेची घोषणा केली. 5 वर्षांमध्ये दोन टप्प्यांमध्ये राबवलं जाईल.
यासाठी पुढच्या दोन वर्षांत 2000 कोटींचा निधी दिला जाणार आहे.
केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या या मिशन मौसमद्वारे हवामानाबद्दल काम करणाऱ्या देशातल्या 3 मोठ्या संस्थांमधल्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा विकास करण्यात येणार आहे.
भारताला 'वेदर रेडी' आणि 'क्लायमेट स्मार्ट' करणं हे यामागचं उद्दिष्टं असल्याचं केंद्र सरकारने म्हटलंय.
'मिशन मौसम'ची उद्दिष्टं काय आहेत?
India Meteorological Department (IMD) म्हणजेच हवामान खातं, National Centre for Medium Range Weather Forecasting म्हणजे शेतकऱ्यांना उपयोगी ठरेल असा मध्यम पल्ल्याचा राष्ट्रीय हवामान अंदाज मांडणारी संस्था आणि Indian Institute of Tropical Meteorology (IITM) म्हणजे भारतीय उष्णकटीबंधीय हवामान विज्ञान संस्थान या तीन संस्थांमध्ये हवामान अभ्यासाठी वापरण्यात येणार तंत्रज्ञान या मिशन मौसमद्वारे आधुनिक करण्यात येईल.
देशातल्या हवामानाबद्दलचं निरीक्षण, विश्लेषण, हवामान अंदाज या सगळ्यामध्ये सुधारणा होत यामुळे हवामानाचा लोकांना फायद्याचा ठरणारा अचूक अंदाज वेळेमध्ये देता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.
'मिशन मौसम'ची उद्दिष्टं काय आहेत?
- अधिक सखोल हवामान अंदाज
- हवेची शुद्धता पातळी खालावल्यास धोक्याचा इशारा
- अतिवृष्टी, वादळासारख्या हवामानाशी संबंधित अतितीव्र, गंभीर घटनांविषयीचा पूर्वइशारा
हवामान निरीक्षणासाठीच्या आधुनिक यंत्रणा या कार्यक्रमाद्वारे वापरात आणण्यात येणार आहेत.
यामध्ये डॉप्लर रडार, हाय परफॉर्मन्स कम्प्युटर्स, विंड प्रोफायलर्स आणि रेडिओमीटर्सचा समावेश असेल.

भारतात सध्या हवामान खात्याकडे (IMD) 39 डॉप्लर रडार आहेत, पण अद्याप विंड प्रोफायल बसवण्यात आलेला नाही.
चीनकडे 217 रडार आणि 128 विंड प्रोफायलर आहेत, तर अमेरिकेत 160 रडार आणि 100 विंड प्रोफायलर आहेत.
प्रोजेक्ट मौसमच्या दुसऱ्या टप्प्यात हवामान यंत्रणेत नवीन उपग्रह आणि विमानांचाही समावेश करण्यात येईल.
अॅडव्हान्स सेन्सर असणारी आधुनिक रडार आणि उपग्रह यंत्रणा, सुपरकम्प्युटर्सचा वापर करत पृथ्वीवरील हवामान प्रणालींची मॉडेल्स टिपणं, त्यांचं विश्लेषण करत अंदाज मांडण्यासाठीही याचा फायदा होईल. याशिवाय वातावरणाच्या वेगवेगळ्या पातळ्यांमध्ये वाऱ्याच्या वेगामध्ये होणारा बदल, Atmospheric Pressure म्हणजेच हवेचा दाब, आर्द्रता आणि तापमान यांच्याविषयीची नियमित माहितीही मिळू शकेल.
यासोबत या मोहीमेअंतर्गत पुढच्या दीड वर्षामध्ये पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेटेओरॉलॉजीमध्ये एक 'क्लाऊड चेंबर' सुरू करण्यात येईल. वाढतं तापमान आणि ढगांमध्ये होणारे बदल आणि प्रक्रिया याबद्दलचा अभ्यास या अंतर्गत करण्यात येईल.
मिशन मौसममुळे काय होईल?
सुरुवातीला हवामानाचा अंदाज मांडणं हे सांख्यिकीवर आधारित होतं. हवामानाबद्दलच्या विविध घटकांच्या पातळ्यांची गुणोत्तरं मांडून त्यानुसार हवामान अंदाज मांडला जाई. त्या त्या वर्षात पाऊस - मान्सूनचा हंगाम कसा असेल, हे सांगितलं जात असे.
त्यानंतर हवामानासंबंधीच्या विविध पातळ्यांची आकडेवारी आणि सुपरकम्प्युटर येत्या काही दिवसांत वा आठवड्यांत हवामान कसं असेल याचा अंदाज मांडला जाऊ लागला. पण अशा प्रकारच्या पद्धतीमध्ये मध्यम पल्ल्याच्या कालावधीसाठीचा हवामान अंदाज मांडला जाऊ शकतो.
Numerical Weather Prediction (NWP) models द्वारे विशिष्ट दिवसासाठीचा वा विशिष्ट भूभागासाठीचा अंदाज मांडणं कठीण असतं.
भारत हा उष्ण कटिबंधातला देश आहे. इथे एकाच देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी भौगोलिक स्थिती असल्याने हवामानावर परिणाम करणारे घटकही वेगवेगळे आहेत.
शिवाय, हवामान बदलांमुळे ढगफुटी, वादळं, एखाद्या विशिष्ट ठिकाणी अतिवृष्टी होणं अशा घटनांमध्ये वाढ होतेय आणि त्याचा वेगळ्याने अभ्यास करण्याची गरज निर्माण झालेली आहे.

मिशन मौसममुळे येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे AI आणि मशीन लर्निंगचा वापर करत मान्सूनसोबत नैसर्गिक आपत्ती, उष्णतेची लाट, थंडीची लाट आणि स्थानिक हवामान यासगळ्यांबाबत अधिक अचूक अंदाज मांडण्यासाठी मदत होईल.
शिवाय, ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची प्रणालीही सक्षम करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारने म्हटलंय. Now Cast म्हणजे येत्या काही तासांमधला हवामान अंदाज, अचूक शेतीविषयी सूचना देणं हे देखील याचं उद्दिष्टं असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय.
मिशन मौसममध्ये वेगळं काय आहे?
हवामान प्रणालींचा अभ्यास करणं, हवामानाचा अंदाज व्यक्त करणं यासोबतच या Weather Interventions ही या मिशन मौसमचं उद्दिष्टं असेल. म्हणजे काय, तर धुकं, गारा आणि पाऊस यामध्ये मानवी हस्तक्षेपाद्वारे बदल करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
पावसाचं प्रमाण कृत्रिमरित्या (Artificially) वाढवता किंवा कमी करता येईल का, याबद्दलही पुढच्या 5 वर्षांमध्ये प्रयोग करण्यात येणार असल्याचं पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव एम. रविचंद्रन यांनी म्हटल्याचं PTI ने म्हटलंय.
यासाठी "पुण्याच्या IITM च्या प्रयोगशाळेत कृत्रिम ढग तयार करण्यात येतील आणि त्यांवर प्रयोग करण्यात येतील. यामुळे संशोधकांना प्रक्रिया समजणं सोपं जाईल आणि पाऊस पाडण्यासाठी कोणत्या ढगांचं सीडिंग करणं शक्य आहे, या सीडिंगसाठी कसला वापर करायचा, आणि पाऊस पाडण्यासाठी वा कमी करण्यासाठी किती प्रमाणात सीडिंगची गरज असते, हे लक्षात येईल." असंही रविचंद्रन यांनी म्हटलंय.
एखाद्या भागात अति-मुसळधार पाऊस पडणाऱ्या भागातला पाऊस थांबवण्यासाठी वा दुष्काळग्रस्त भागात पाऊस पाडण्यासाठी सीडिंगचा कसा वापर करता येईल याबद्दल संशोधन करण्यात येणार आहे.
पावसाबद्दलच्या या अभ्यासानंतर गारा पडणं, वीज कोसळणं याबाबतही असे प्रयोग केले जाणार आहेत.











