दक्षिण आफ्रिकेविरोधात भारत का पराभूत झाला? कर्णधार सूर्यकुमार यादवनं सांगितली 'ही' कारणं
फोटो स्रोत, Matthew Lewis-ICC/ICC via Getty
टीम इंडियाला ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीत सलामीला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेनं भारतावर 76 धावांनी मात केली. विजयासाठी 188 धावांचं लक्ष्य समोर असताना भारताचा डाव 111 धावांवरच आटोपला.
मार्को यान्सनने चार विकेट्स घेतल्या तर केशव महाराजने तीन विकेट्स काढल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या विजयात मोठा वाटा उचलला.
भारताकडून शिवम दुबेनं सर्वाधिक 42 धावा केल्या. तर प्लेअर ऑफ द मॅच म्हणून अर्धशतक ठोकणाऱ्या डेव्हिड मिलरची निवड करण्यात आली.
पराभवावर काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं म्हटलंय की, आमचा संघ मजबुतीनं पुनरागमन करेल.
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, या सामन्यानंतर जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये भारताला चांगली कामगिरी करण्यासाठी काय करावं लागेल, तेव्हा सूर्यकुमारने उत्तर दिलं की, "चांगली बॅटींग, चांगली बॉलिंग आणि चांगली फिल्डींग... फक्त इतकंच..."
पुढे त्यांनी म्हटलं की, "आम्ही गोष्टी सहजसोप्या ठेवण्याचा प्रयत्न करू. आम्ही त्याच प्रकारचं क्रिकेट खेळू, जे आम्ही खेळू इच्छितो. तसेच, मला वाटतं की, आम्ही मजबुतीनं पुनरागमन करू."
फोटो स्रोत, Getty Images
188 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने पॉवरप्लेमध्ये आपल्या तीन विकेट्स गमावलेल्या होत्या. सुरुवातीलाच संघाचं ढासळणं आणि त्यानंतर सामन्यात पराभव पत्करावा लागणं, याबाबत सूर्यकुमार यादवनं दु:ख व्यक्त केलं.
त्यानं म्हटलं की, "कधीकधी तुम्हाला असा विचार करावा लागतो की जर तुम्ही 180-185 धावांचा पाठलाग करत असाल तर तुम्ही पॉवरप्लेमध्ये सामना जिंकू शकत नाही, तर पॉवरप्लेमध्ये तुम्ही सामना गमावू शकता."
पुढे त्याने म्हटलं की, "पॉवरप्लेमध्ये आम्ही खूप विकेट्स गमावल्या. त्यानंतर 180-185 धावांचा पाठलाग करताना आम्हाला हव्या असलेल्या लहान पार्टनरशीप साकारता आल्या नाहीत."
पुढे तो म्हणाला की, "पण हा खेळाचा एक भाग आहे. आम्ही त्यातून शिकलो आहोत, आम्ही बसून यावर विचार करू आणि नंतर अधिक मजबूतीनं पुनरागमन करू."
टॉप ऑर्डरची पडझड भारतासाठी पुन्हा डोकेदुखी
1 बाद 8, 1 बाद 25, 1 बाद 1, 1 बाद 0, 1 बाद 0
भारताच्या सलामी जोडीची यंदाच्या ट्वेन्टी20 विश्वचषकातली ही कामगिरी. टीम इंडियाची टॉप ऑर्डर गेल्या पाच सामन्यात सातत्यानं कोसळली आहे आणि ही टीमसाठी चिंतेची बाब ठरते आहे. विशेषतः अभिषेक शर्माचा फॉर्म.
स्पर्धेच्या साखळी फेरीत सलग तीनदा शून्यावर बाद झालेल्या अभिषेकला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर एट लढतीत पंधरा धवाच करता आल्या. पण अहमदाबादमध्ये ईशान किशनही शून्यावर बाद झाला तर तिलक वर्मा एकच धाव करू शकला.
फोटो स्रोत, ANI
पण साखळी फेरीतल्या चारही सामन्यांत भारतानं प्रथम फलंदाजी केली होती, म्हणजे फलंदाजांवर कुठला मोठा दबाव नव्हता आणि सुरुवातीला पडझड झाल्यावरही मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि शिवम दुबेनं मोठ्या खेळी करत भारताला सावरलं होतं.
पण फक्त मधल्या फळीवर एवढं विसंबून राहता येणार नाही. विशेषतः धावांचा पाठलाग करताना टॉप ऑर्डरची चांगली कामगिरी गरजेची असते, हेच अहमदाबादमध्ये पुन्हा दिसून आलं आहे.
विश्वचषकाचं विजेतेपद कायम राखायचं असेल, तर भारताला हा एक कच्चा दुवा लवकर सुधारावा लागणार आहे.
टीम इंडियाच्या विकेट्स अशा पडल्या
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अगदी सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांची कोंडी केलेली दिसली.
भारताचा सलामीवीर ईशान किशनला भोपळाही फोडता आला नाही. एडन मार्करमनं त्याला माघारी धाडत टीम इंडियाला पहिला धक्का दिला. पाठोपाठ यान्सनच्या गोलंदाजीवर तिलक वर्मा झेल देऊन माघारी परतला. त्यामुळे भारताची अवस्था 1.1 षटकांत 2 बाद 5 धावा अशी झाली.
सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झालेल्या अभिषेक शर्माला या सामन्यात अखेर खातं उघडता आलं आणि त्यानं पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला.
शर्मानं काही काळ क्रीजमध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न केला, पण पाचव्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर झेल देऊन तोही बाद झाला.
फोटो स्रोत, ANI
भारतानं 26 धावांतच या पहिल्या तीन विकेट्स गमावल्या.
लवकर विकेट्स पडल्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला पाचव्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. पण त्याला 11 धावांच करता आल्या.
भारताची फलंदाजी इतकी कमकुवत झाल्यासारखी भासली की 8.3 षटकांत टीम इंडियानं फक्त 50 धावा पूर्ण केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवने 22 चेंडू झुंज दिली पण तोही फक्त 18 धावा करून माघारी परतला.
9.1 षटकात 51 धावांवरच भारताच्या अर्ध्या खेळाडूंनी पॅव्हेलियनचा रस्ता धरला होता. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण हार्दिकची खेळीही 18 धावांवर थांबली.
15व्या षटकात केशव महाराजने एकाच षटकात हार्दिक पंड्या, रिंकू सिंह आणि अर्शदीप सिंह यांना बाद करत भारताला आणखी संकटात ढकलले. रिंकू दोन चेंडू खेळून शून्यावर बाद झाला.
शिवम दुबेनं मात्र 37 चेंडूत 42 धावा करून भारताला 100 च्या पुढे नेलं, पण अखेरीस यान्सनने त्यालाही बाद केलं.
बुमराची कामगिरी जखमेवर मलम
अहमदाबादच्या मैदानात जसप्रीत बुमराची कामगिरी जखमेवर फुंकर घालणारी ठरली. बुमरानं 4 षटकांत अवघ्या 15 धावा देत तीन विकेट्स काढल्या आणि भारताकडून एक विक्रमही रचला.
बुमरा आता ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
याआधी 2012 ते 2022 या कालावधीत आर अश्विननं ट्वेन्टी20 विश्वचषकांच्या 24 सामन्यांत 32 विकेट्स काढल्या होत्या. तर जसप्रीत बुमरानं 2016 ते 2026 या कालावधीत 22 सामन्यांत 33 विकेट्स काढल्या आहेत.
यंदाच्या विश्वचषकात बुमरा पहिल्या सामन्यात खेळला नव्हता. पण साखळी फेरीतल्या बाकीच्या तीन सामन्यांत मिळून त्यानं चार विकेट्स काढल्या होत्या. मग अहमदाबादमध्ये त्याला चांगली लय सापडली.
सुपर एटमधलं पुढचं आव्हान पाहता टीम इंडियासाठी ही दिलासा देणारी गोष्ट आहे. भारताला आता 26 फेब्रुवारीला चेन्नईत होणाऱ्या लढतीत झिम्बाब्वेचा मुकाबला करायचा आहे.
फोटो स्रोत, Getty Images
खरंतर दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांची सुरुवात काहीशी खराब झाली होती.
दक्षिण आफ्रिकेचे तीन फलंदाज 20 धावांवर माघारी परतले. पण डिवाल्ड ब्रेव्हिस आणि डेव्हिड मिलरनं मधल्या फळीत चौथ्या विकेटसाठी रचलेली भागीदारी आणि मग ट्रिस्टन स्टब्सची फटकेबाजी यांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकांत 7 बाद 187 धावांची मजल मारली.
फोटो स्रोत, Getty Images
मिलरनं 35 चेंडूंमध्ये 63 धावा केल्या. ब्रेव्हिसनं 45 धावा केल्या, तर ट्रिस्टन स्टब्जनं 24 चेंडूंमध्ये नाबाद 44 धावांची खेळी केली.
भारताकडून जसप्रीत बुमरानं 4 षटकांत केवळ 15 धावा देत तीन विकेट्स काढल्या.
तर अर्शदीपनं दोन विकेट्स घेतल्या. वरूण चक्रवर्ती आणि शिवम दुबेला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
फोटो स्रोत, Getty Images
इंग्लंडची श्रीलंकेवर मात
रविवारीच सुपर-8 च्या आणखी एका सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा 51 धावांनी पराभव केला.
श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 9 बाद 146 धावा केल्या. इंग्लंडच्या फिल सॉल्टने 40 चेंडूत 62 धावांची खेळी केली.
मग 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवस्था खूपच खराब झाली आणि 16.4 षटकांत केवळ 95 धावांवर लंकेची अख्खी टीम गारद झाली.
श्रीलंकेकडून कर्णधार दासुन शनाकाने सर्वाधिक 30 धावा केल्या. पॉवरप्लेमध्येच श्रीलंकेने 5 विकेट्स गमावल्या आणि त्यातून त्यांची टीम सावरलीच नाही.
या विजयामुळे इंग्लंड ग्रुप 2 च्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
मोठ्या बातम्या
बीबीसी मराठी स्पेशल
लोकप्रिय
मजकूर उपलब्ध नाही