पार्थ पवार यांची राज्यभेसाठी घोषणा: मावळचा पराभव, शरद पवारांचे वक्तव्य आणि जमीन व्यवहार प्रकरणापर्यंतचं सारंकाही
फोटो स्रोत, PARTH AJIT PAWAR/FACEBOOK
पार्थ पवार यांची राज्यसभेसाठी पक्षातर्फे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. पार्थ पवार यांच्या रुपानं अजित पवार यांच्या कुटुंबातील आणखी एक व्यक्ती राजकारणात सक्रिय झाली आहे.
तसेच आज 26 फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार ची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनी घोषणा केली.
अजित पवार यांच्या विमानाला 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर पवार कुटुंबात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत.
याआधी पार्थ यांनी मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना त्यावेळेस यश आले नव्हते. त्यानंतर ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी दीड वर्षांपासून ते अजित पवार यांच्या सोशल मीडियाचं काम पाहत होते.
वाणिज्य शाखेतील पदवी घेतल्यानंतर त्यांनी लंडनमधून बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
2019 मध्ये मावळ चर्चेत राहिला कारण पार्थ पवार यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत फूट पडल्याच्या चर्चाही त्यावेळी झाल्या होत्या. पण अखेर श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा पराभव केला आणि हा मतदारसंघ शिवसेनेकडे राखला.
फोटो स्रोत, Getty Images
जेव्हा पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आल तेव्हा मात्र पार्थ यांची उमेदवारी घोषित करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली होती.
त्याआधी शरद पवार माढ्यामधून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. 'पण एकाच कुटुंबातून तिघांनी निवडणूक लढवू नये, म्हणून मीच न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पिढीला संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला,' असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
पण त्यावरून पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे पवारांच्या घरात राजकीय सत्तासंघर्ष सुरू होणार का, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला.
या 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी मावळमध्ये 'स्थानिक विरुद्ध बाहेरचा' हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाला मावळच्या मतदारांनी खासदार म्हणून पसंती दिली नाही.
पार्थ पवारांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज असलेल्या राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांनी त्यावेळी घेतलेली भूमिका श्रीरंग बारणे यांच्या हिताची ठरली होती.
तब्बल 2 लाख 15 हजार मतांनी पार्थ पवार यांचा दणदणीत पराभव करत शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे दुसऱ्यांदा खासदार झाले होते.
या निवडणुकीत एका भाषणामुळे पार्थ पवार यांना सोशल मीडियात ट्रोल करण्यात आले होते. तेव्हा वारंवार विविध कारणाने पार्थ पवारला सोशल मीडियावर ट्रोल केल्यामुळे त्यांचे वडील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार संतप्त झाले आहेत. "पार्थ राजकारणात नवखा आहे. नवख्याकडून चुका होत असतात म्हणून त्याला फासावर लटकवता का?" अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती.
या भाषणात पार्थ पवार यांनी काही चुकामुका झाल्यातर सांभाळून घ्या असं आवाहन लोकांना केलं होतं.
पार्थ यांना त्याबाबत विचारलं असता ते म्हणाले होते, "पहिल्या भाषणावेळी मी नर्व्हस झालो होतो. पाय कापत होते. सगळं भाषण चांगलं झालं मात्र एक दोन ओळी इकडे तिकडे झाल्या आणि त्यावरूनच भाजप शिवसेनेनं ट्रोल केलं."
तसंच भाषणाची तयारी करायला आवडत नाही. लोकांसमोर जसं आहे तसं जायला आवडतं हेच लोकांना हवं असतं, असंही पार्थ यांनी पुढे सांगतलं.
'माझ्या नातवाच्या मताला कवडीची किंमत देत नाही'
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरून राजकारण सुरू असतानाच पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आणि सुशांत सिंहच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करणारं निवेदन त्यांना दिलं होतं. प्रत्यक्षात मात्र आघाडी सरकारचा सीबीआय चौकशीला विरोध होता.
फोटो स्रोत, Getty Images
तेव्हा शदर पवार यांनी मात्र पार्थ पवार यांच्या मताला कवडीची किंमत नाही, ते अपरिपक्व आहेत, असं विधान केलं होतं. "माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही ते इमॅच्युअर आहेत," असं ते म्हणाले होते.
महार वतन जमीन प्रकरण
पुण्यातील मुंढवा-कोरेगाव पार्क परिसरातल्या 40 एकर जमिनीच्या विक्रीवरुन पार्थ पवार यांच्या नावावरुन वाद निर्माण झाला होता.
या परिसरात बाजारभावाप्रमाणे कथितरित्या जवळपास 1800 कोटी एवढं मूल्य असलेल्या या जमिनीची विक्री केवळ 300 कोटी रुपयांना करण्यात आली आणि या व्यवहारावरुन वादंग उठले होते.
पार्थ पवार यांची भागिदारी असलेल्या 'अमेडिया' या कंपनीनं ही जमीन काहीच महिन्यांपूर्वी विकत घेतली होती. आता या प्रकरणात बावधन पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला आहे, पण त्यात पार्थ यांचे नाव नव्हते.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही नेमण्यात आली आहे.
फोटो स्रोत, FACEBOOK
अजित पवार काय म्हणाले होते?
या प्रकरणाबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 8 नोव्हेंबर रोजी खुलासा केला होता. अजित पवार यांनी त्यावेळी म्हटलं होतं की "काही गैरकृतीचे आरोप केल्यामुळे पार्थने तो करार रद्द करण्याचा निर्णय घेतला असून विक्रीपत्र रद्द करण्याचे आवश्यक दस्तऐवज नोंदणी कार्यालयात सादर केले गेले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, "अनियमितता आहे का, हे पडताळून पाहिलं जाईल आणि अनियमितता असेल तर नक्की कारवाई केली जाईल."
या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून, आपण कधीही चुकीच्या कामाचे समर्थन केले नसल्याचं अजित पवारांनी त्यावेळी म्हटलं होतं.
माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले होते, "जे काही आता माध्यमं बातम्या दाखवत आहेत त्याच्यासोबत माझा अजित पवार म्हणून काहीही संबंध नाही. मला महाराष्ट्र 35 वर्षापासून ओळखतो. मला चुकीच्या गोष्टी केलेल्या चालत नाही. जमिनीच्याबद्दल बातम्या सुरू आहेत. पण कोणी परवानगी दिली माहिती नाही."
"आपल्या नावाचा वापर करून कोणी चुकीचे करत असेल, तर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी," असंही त्यांनी म्हटलं होतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
मोठ्या बातम्या
बीबीसी मराठी स्पेशल
लोकप्रिय
मजकूर उपलब्ध नाही