पुरुषांच्या 'विनोदी' असण्याचं किती मोठं ओझं बायकांना सहन करावं लागतं?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

'हंसी तो फंसी' असं ठासून सांगणाऱ्या समाजात बलात्कारापासून गर्भपातापर्यंत सगळ्या विषयांवरून पुरुष 'जोक' करतात. काही 'जोक' तर शारिरीक हिंसा करतात. या तथाकथित 'जोक'चा महिलांवर, त्यांच्या मनोधैर्यावर आणि सामाजिक आरोग्यावर काय परिणाम होतो त्याचा लेखाजोखा.

तो व्हीडिओ पाहिलाय का? ज्यात नववधू तिच्या लग्नाच्या पांढऱ्या ड्रेसमध्ये आहे. तो ड्रेस मनासारखा असावा म्हणून तिने कित्येक दुकानांच्या कित्येक महिने चकरा मारल्यात. आज तिचं लग्न आहे, मनासारखा मेकअप आहे, तासभर बसून हेअरस्टाईल केलेली आहे.

आलेले सगळं पाहूणे 'मी किती छान दिसते याचं कौतुक करतील' अशा विचारात ती आहे. तिला कदाचित भरपूर फोटो काढायचे असतील.

अचानक नवरा मुलगा आणि त्याचे मित्र तिला उचलतात आणि शेजारी असलेल्या स्वीमिंग पूलमध्ये फेकून देतात.

हा एक 'प्रँक' असतो आणि नवरा मुलगा आणि त्याचे मित्र भरपूर हसतात. हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला जातो, आणखी काही हजार लाख लोक पाहातात, हसतात.

ती नवरी मात्र गच्च ओली असते, तिचा ड्रेस खराब होतो, तिचा मेकअप वाहून जातो, तिच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती फ्रीज होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

दुसरा असाच व्हीडिओ, सत्तरीतले म्हातारा म्हातारी आहेत आणि आजीबाईंचा बर्थडे आहे. अचानक आजोबा आजींचं डोकं मागून पकडतात आणि जोराने केक वर आदळतात. सगळे हसतात. एक ओळखीतल्या मित्राने, मी 'सत्तरीत असेन तेव्हा मला असंच आयुष्य जगायला आवडेल' अशा कॅप्शनसह शेअर केला होता.

तुम्हाला कदाचित हे चालेल पण तुमच्या पार्टनरला हे चालेल का? तिचा बर्थ डे खराब होईल, तिला किती त्रास होईल हा विचार त्याचा डोक्यात आलाच नाही. त्याला असं वागणं रोमॅन्टिक वाटलं.

पण पुरुषांच्या या 'विनोदी' असण्याचं किती मोठं ओझं असतं बायकांवर? तेच या लेखात शोधण्याचा प्रयत्न केलाय.

लहानपणी मी ऐकलं होतं, एक काका म्हणायचे त्यांच्या बायकोला, "अगं मी तुला बोलतो, तुला चिडवतो, बावळट म्हणतो, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो."

पण काकू मात्र कायम धुसमुसत राहायच्या. चिडलेल्या असायच्या आणि त्यामुळे त्यांना खाष्ट हे नाव पडलं.

काका 'विनोदी', काकू मात्र 'खाष्ट'. विनोदाच्या नावाखाली आयुष्यभर झालेल्या अपमानामुळे त्या अशा झाल्या असतील हे कोणाच्या गावीही नव्हतं.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

"यातून तयार होतो कटकट्या बायकोचा स्टीरिओटाईप," केईम हॉस्पिटलच्या मनोविकार विभागाच्या माजी डीन डॉ शुभांगी पारकर म्हणतात.

"मला अशा अनेक बायका माहिती आहेत ज्या स्वतःच्या कर्तृत्वाने मोठ्या पदापर्यंत गेल्यात पण त्यांना घरातल्या पुरुषांकडून, नवऱ्यांकडून स्वतःवर होणारे असे विनोद सहन करावे लागतात. हे एकप्रकारचं नैतिक खच्चीकरण आहे. सामाजिक, सांस्कृतिक कारणांमुळे त्या गप्प बसतात. प्रतिक्रिया देत नाही, पण तो अपमान मनात साठत जातो.

"कधी त्या स्वतःवर संशय घेतात, जन्मभर एक गिल्ट घेऊन वावरतात. किंवा स्वतःबद्दल लाज बाळगतात. पण हे खच्चीकरण कसं ना कसं बाहेर पडणारच ना? मग कधी त्या डिप्रेस होतात, किंवा चिडचिड्या होतात, कटकट्या होतात. त्यांच त्यांनाच कळत नाही की त्यांना काय होतंय.

"तुमची मनःशांती हरवते, त्याचा शारिरीक आरोग्यावरही परिणाम होतो. ब्लडप्रेशर वाढतं, आणि काही रोग होतात. आणि 'कटकटी', 'खाष्ट', अशी सगळी लेबलही बाईलाच लागतात. पुरुषांच्या या सोकॉल्ड विनोदाची खूप मोठी किंमत चुकवतात बायका," डॉ शुभांगी पुढे म्हणतात.

सेक्सिस्ट जोक्स आणि 'प्रँक' व्हीडिओज

जुन्या काळातल्या 'आमची बायको' म्हणून केल्या जाणाऱ्या सेक्सिस्ट जोक्सचा हा पुढचा अवतार म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारे 'प्रँक' व्हीडिओज.

एकतर हे छोटे शॉर्ट व्हीडिओ असतात, पटकन शेअर करण्यासारखे. हे व्हीडिओ आवडणारेही खूपजण असतात, त्यामुळे ते व्हायरलही होतात.

पण अशाप्रकारच्या कंटेंटमुळे बायकांशी असं वागणं नॉर्मल आहे, हे चालतं, एवढं काय त्यात, फक्त जोकच तर आहे अशी मानसिकता बळावते.

बऱ्याच व्हीडिओमध्ये वरवरची का होईना बायकांवर केलेली मानसिक किंवा शारिरीक हिंसा असते.

एक व्हीडिओ आहे, आई बाजारातून पिशव्या घेऊन येतेय, वडील आणि दोन मुलगे तिने दार उघडताच तिच्यावर खेळण्यातल्या बंदूकीतून गोळ्या चालवायला लागतात. तिघे जण एकदम अटॅक करतात. तिला ना बचावाची संधी, ना तिला या खेळात सहभागी व्हायची संधी.

पिशव्या पडतात, त्यातलं सामान अस्ताव्यस्त होतं, अंडी फुटतात. (व्हीडिओत दाखवलं नाही, पण हा पसारा त्या आईनेच आवरला असणार, आणि पुन्हा सामान आणायला तीच बाहेर गेली असणार) आणि तिच्या चेहऱ्याला, हाताला लागतं ते वेगळचं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बायका काय पीडित नाहीयेत, त्याही हसतातच की, किंवा एवढा राग आला असेल तर तिथल्या तिथे का बोलत नाही त्या असा आक्षेप कोणी नोंदवू शकतं. खरं आहे, काही व्हीडिओमध्ये बायका हसताना दिसतात, पण याचा अर्थ त्यांनी हा प्रँक एन्जॉय केला असं होतं का?

कॅमेरा चालू असताना दिलेली रिअ‍ॅक्शन ही तेवढ्यापुरती असते, आणि मुळात काय करावं हे न सुचल्यामुळे आलेली असते. पांढरा ड्रेस घातलेली नववधू पाण्यात फेकल्यावर फ्रीज होते, ना काही बोलत, ना हसत.

तज्ज्ञांच्या मते झालेला अपमान आणि त्यामुळे लाजिरवाणं वाटणं ही भावना इतकी प्रबळ असते की बऱ्याचदा काहीच रिएक्शन बायका देत नाही.

श्रुतकिर्ती फडणवीस पुण्यातल्या थेरेपिस्ट आहेत. याबद्दल बोलताना त्या म्हणतात, "तुम्ही अचानकपणे अवघड परिस्थितीत सापडलात तर तुमची नर्व्हस सिस्टिम तीन रिअ‍ॅक्शन देते. फ्लाईट, फाईट किंवा फ्रीज.

या प्रँकसारख्या सिच्युएशनमध्ये बायका फाईट करू शकत नसतील, कारण तो करणारा जवळचाच पुरुष असतो, सहसा नवरा किंवा पार्टनर. सामजिक दडपण, भेदभावावर आधारित नातेसंबंध यामुळे त्या तिथे वाद नको म्हणून फाईट टाळतात. फ्लाईट, म्हणजे तिथून निघून जाणं हेही कदाचित शक्य होत नसेल. त्यामुळे अक्षरशः फ्रीज होतात."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

पण फ्लाईट, फाईट आणि फ्रीज या प्रतिक्रिया तेव्हाच येतात जेव्हा मनावर टोकाचं दडपण असतं आणि इतर कुठला मार्ग मेंदूला दिसत नाही. म्हणजे असं समजायचं का की वरकरणी गमतीशीर वाटणारे हे प्रँक, महिलांना टोकाचं दडपण देतात.

"बरं असे प्रँक बायका करत नाहीत. त्यांना हे रोमॅन्टिक नाही वाटत. अपमान आणि विनोद यात एक हलकीशी सीमारेषा आहे. पण ती दिवसेंदिवस धुसर होत चालली आहे. अशा प्रकारच्या विनोदांमध्ये मुळात महिला आणि पुरुष समान पातळीवर नसतात.

"हे विनोद म्हणजे आपला डॉमिनन्स, आपलं स्वामित्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न असतो. की बघा, मी कसाही कसाही वागलो तरी ही माझ्याबरोबर राहील, कुठे जाणार नाही. हा विनोद नाहीये हा पावर स्ट्रगल आहे," श्रुतकीर्ती सांगतात.

कारण बायका त्यांच्या पार्टनरला चारचौघात विनोदाच्या नावाखाली असं वागवत नाही, लाजिरवाणं करत नाही.

मग मुळात महिला आणि पुरुष यांच्या विनोदाच्या व्याख्याच वेगळ्या असतात का? दोघांच्या मेंदूचं विनोदाचं वायरिंग वेगवेगळं असतं का?

विनोदाची व्याख्या

महिला आणि पुरुषांचे मेंदू विनोदाला कशी प्रतिक्रिया देतात किंवा त्यांच्यासाठी विनोद म्हणजे काय याचा अभ्यास करणाऱ्या संशोधनात लक्षात आलं आहे की महिलांना शाब्दिक कोट्या, म्हणजेच तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करायला लावणारे (Semantic) विनोद आवडतात, त्या तशा प्रकारचे विनोद करतात, तर पुरुषांना आक्रमक (क्वचित सीमा ओलांडणारे), लैंगिक आणि व्दयअर्थी विनोद आवडतात.

त्यामुळेच पुरुषांच्या 'आम्ही असेच विनोद करतो, त्यात काय एवढं? गंमतच तर आहे. मी असाच जोक एखाद्या मित्राबरोबर केला तर त्याला नाही वाईट वाटत,' या बचावाला फारसा अर्थ राहात नाही.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

श्रुतकिर्ती म्हणतात, "तुम्ही मित्रांसोबत असेच राहात असाल, पण पण मित्र (पुरुष) समान पातळीवर असतात, समान understanding असतं. आज तू त्याच्यासोबत जोक केला, उद्या तो तुझ्यावर करेल, नातं समानतेचं आहे. पण बायकांचं तसं नाही ना, त्या असं करत नाही. त्या चारचौघात तुम्हाला अपमानास्पद वाटेल असं वागत नाही, आणि वागल्या तर मग आपली पुरुषप्रधान संस्कृती त्यांना कसं वागवते हे आपल्याला दिसतंच."

त्या पुढे म्हणतात, "अशा प्रकारच्या अपमानास्पद विनोदावर एखाद्या बाईने प्रतिक्रिया दिली, हे चालणार नाही असं म्हटलं तर तिलाच दोषी ठरवलं जातं की एवढ काय ओव्हररिएक्ट करायचं.

विनोदाला, विनोदासारखंच घ्यायला शिका. म्हणजे तुम्ही एखादीचा अपमान करता, त्यांना कमी लेखता, मानसिक छळ करता आणि पुन्हा त्यांनाच शिकवता की त्यात काय एवढं! त्या महिलांची प्रतिक्रिया रास्तच आहे, तुम्ही तुमची सीमा ओलांडली आहे."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र

तिथल्या तिथे नाही म्हणणं फार गरजेचं आहे असं डॉ शुभांगी पारकर यांनाही वाटतं.

"विनोदाच्या नावाखाली असं वागणं जंगली आहे आहे. त्याला तत्काळ तिथेच थांबवलं गेलं पाहिजे."

मुळात विनोद म्हणजे कोणाच्या लेखी विनोद? फक्त एका व्यक्तीचीच, गटाचीच विनोदाची व्याख्या योग्य, एखाद्या बाईला तो आवडला नाही तर ती उगाच आक्रस्तळेपणा करतेय असं म्हणणं कितपत योग्य?

पण असं म्हटलं जातं कारण आधी म्हटलं तर विनोद फक्त विनोद न राहाता दमनाचा मार्ग बनतो.

विनोदाच्या मार्फत बायकांचं शोषण करता येतं, आणि समजा त्या चिडल्या तर म्हणता येतं, अरे इट वॉज जस्ट ए जोक!

पुढच्या पिढीला काय शिकवण जातेय?

पुढच्या पिढीवरही या असल्या 'विनोदी' व्हीडिओजचा परिणाम होतोय. अलाईन (Advancing Learning and Innovation on Gender Norms) या संस्थेच्या 2024 च्या रिपोर्टमध्ये यासंबधी काही निरीक्षणं मांडली आहेत.

त्यात लिहिलं आहे की, शॉर्ट व्हीडिओचे अल्गोरिदम व्ह्यूज आणि शेअर्सवर ठरतात. अशा प्रकारच्या व्हीडिओज कित्येक लाखांमध्ये व्ह्यू असतात, शेअर्स असतात, त्यामुळे ते आणखी जास्त प्रसारित केले जातात. त्यामुळे लिंगभेदभाव, महिलांना कमी लेखणं, त्यांच्यावर झालेली हिंसा नॉर्मलच आहे असा समज बळावू शकतो, विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये. ( मेल चाइल्ड)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक फोटो

या रिपोर्टमध्ये पुढे असंही लिहिलं आहे की, 'असे व्हीडिओ 'जोक' म्हणून दाखवले जात असले तरी ते सतत पाहिल्याने किशोरवयीन मुलग्यांना असं वाटू शकतो की महिला/मुली या थट्टा करण्यासाठीच आहेत, आणि त्या थट्टेमुळे त्यांना कसं वाटतं वाटतं, किंवा थट्टेसाठी त्यांची परवानगी घेण्याची गरज नाही. हे वागणं चुकीचं नाहीये, तर मजेशीर आहे. महिलांशी पुरुष असेच वागतात.'

लहान किंवा वयात येणाऱ्या मुलांच्या (मेल चाइल्ड) मनात अशाप्रकारची भावना निर्माण होणं हे लिंगाधारित भेदभाव कमी करण्यासाठी, आणि एक समान समाज बनवण्याच्या दृष्टीने हानिकारक आहे.

फोटो स्रोत, Javier Hirschfeld/ Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

हे वरती जे एवढं सगळं लिहिलं, ते लांबवर, कुठे वेगळ्या जगात घडत नाहीये. रोज तुमच्या माझ्या आयुष्यात घडतंय. आणि असं वागणारे पुरुषही कमी नाहीयेत. यात खरं राष्ट्राध्यक्षांसारखे पुरूषही मागे नाहीत.

नुकताच घडलेला किस्सा ऐकला/पाहिला का? विंटर ऑलिम्पिक सुरू आहे. समर ऑलिम्पिकसारखाच मोठा इव्हेंट असतो हा. बर्फावर खेळले जाणारे खेळ यात समाविष्ट असतात.

या ऑलिम्पिकच्या आईस हॉकी प्रकारात अमेरिकेच्या महिला आणि पुरूष दोन्ही संघांनी सुवर्ण पदक मिळवलं.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुरुष संघाला फोन केला आणि त्यांचं अभिनंदन केलं. इथवर ठीक आहे, पुढे त्यांनी पुरुष संघाला व्हाईट हाऊसमध्ये जेवायला आमंत्रित केलं, हेही ठीक.

त्यापुढे ते जे म्हणाला, त्यांच्यात शब्दात सांगते – "आता मला महिला संघालाही बोलवावं लागेल" (यावर पुरुष संघात मोठाच हशा पिकला. सगळेच हसायला लागले.) (त्यांना बोलावलं) नाहीतर माझ्यावर महाभियोगही चालू शकतो."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिलरी नाइट

महिला आणि पुरुष संघानी एकच कामगिरी केली आहे, एकाच खेळप्रकारात, एकाच स्पर्धेत, मग महिला संघाला बोलवण्यावरून एवढं हसण्यासारखं काय? एकच, विनोदाच्या नावाखाली महिलांना कमी लेखणं आणि वरती श्रुतकिर्ती यांनी उल्लेख केला तो आपला डॉमिनन्स, स्वामित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणं.

आता यावरून अमेरिकेत आईस हॉकीचा पुरुष संघ आणि व्हाईट हाऊसवर टीका होतेय, पण या सर्वात लक्षात राहिली ती महिला आईस हॉकी संघाची कॅप्टन हिलरी नाईट हिची प्रतिक्रिया, "त्यांचं वागणं एक्सप्लेन करणं ही माझी जबाबदारी नाही."

हेच लक्षात ठेवायला हवं – पुरुषांचे विनोद टिकवणं, त्यावर इच्छा नसताना हसणं आणि त्यांनी विनोदाच्या नावाखाली केलेल्या चुका किंवा शोषण सोडून देणं ही महिलांची जबाबदारी नाही किंबहुना पुरुषांच्या 'विनोदी स्वभावाचं' ओझं वाहाणं ही महिलांची जबाबदारी नाही.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.