डाएटमुळे कॅन्सर बरा होऊ शकतो का? तज्ज्ञ काय सांगतात?

फोटो स्रोत, Navjot Sidhu/FB
माजी भारतीय कसोटीपटू आणि राजकारणी नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक पत्रकार परिषद घेत आपली पत्नी नवज्योत कौर कॅन्सरमधून पूर्णपणे बरी झाल्याचं जाहीर केलं. हे सगळं पत्नीने पाळलेल्या एका विशेष डाएटमुळे झालं, असा दावा सिद्धू यांनी केलाय. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
'आपल्या पत्नीची कॅन्सरसाठीची ट्रीटमेंट सुरू होती, सर्जरी - किमोथेरपी करण्यात आली होतं, पण बायको वाचण्याची शक्यता अगदी कमी असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं होतं, पण डाएटच्या जोरावर तिचा स्टेज 4 कॅन्सर पूर्ण बरा झाला,' असा दावा सिद्धू यांनी केलाय.
आपण बराच काळ इंटरनेटवर आयुर्वेद आणि वैद्यकीय संशोधनाबद्दलचा मजकूर वाचला आणि त्यातल्या निरीक्षणांनुसार पत्नीसाठी डाएट सुरू केलं, ते तिच्यासाठी परिणामकारक ठरलं, असंही सिद्धू यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलं.
फक्त डाएटच्या जोरावर कॅन्सर बरा होऊ शकतो का? सिद्धू यांनी म्हटल्याप्रमाणे हळद, कडुनिंब, तुळशी हे कॅन्सरसाठी मारक ठरू शकतात का? समजून घेऊयात प्रश्नोत्तरांत.
कॅन्सर म्हणजे काय?
कॅन्सर म्हणजे काय होतं, तर शरीरामध्ये पेशींमध्ये बदल होऊन त्यांची अनियमित वाढ होते. त्यावर शरीराला नियंत्रण राखता येत नाही आणि या विकृत पेशी झपाट्याने पसरतात.
ज्या अवयवातून या पेशी पसरतात. त्याचं नाव त्या कॅन्सरला दिलं जातं. म्हणजे स्तनांचा कर्करोग किंवा फुफ्फुसाचा कर्करोग.
नवज्योत सिंग सिद्धूंनी काय दावा केलाय?
नवज्योत सिंग सिद्धू यांनी पत्रकार परिषद घेऊन काही दावे केले.
- कॅन्सर शर्करेवर बळावतो वा वाढतो.
- साखर, मैदा, कर्बोदकं, रिफाईन्ड ऑईलचा वापर बंद केला.
- खाण्यामध्ये मोठी गॅप ठेवली, तर कॅन्सरच्या पेशी स्वतःच मरतात.
- लिंबूपाणी, कच्ची हळद, लसूण, कडुलिंबाची पानं, तुळशीची पानं, कडू - आंबट फळ, मसाले, विविध रस यांचं सेवन केल्याने कॅन्सर बरा झाला.
असं त्यांनी म्हटलं. त्यांनी त्यांचा हा डाएट प्लान 'एक्स' या सोशल मीडियावरून शेअरही केला आहे.
सिद्धू यांच्या दाव्यात तथ्य आहे का?
तर नाही. टाटा मेमोरियल हॉस्पिटलशी संलग्नित 262 कॅन्सर तज्ज्ञांनी (Oncologist) एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे काही गोष्टी स्पष्ट केल्या.
"सिद्धू यांनी केलेल्या विधानांना पाठबळ देणारे ठोस पुरावे नाहीत. यात त्या काही वस्तूंविषयी संशोधन करण्यात येत असलं, तरी हे पदार्थ कॅन्सरविरोधी असल्याचं सुचवणारा कोणताही क्लिनिकल डेटा सध्या उपलब्ध नाही. अशा मान्यता न मिळालेल्या उपायांसाठी लोकांनी उपचार घेणं पुढे ढकलू नये, असं आवाहन आम्ही करतो. कॅन्सरची लक्षणं दिसत असतील, तर डॉक्टरांचा, शक्यतो कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला घ्या."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कॅन्सर बरा होऊ शकतो का?
कॅन्सरचं लवकर, वेळेत निदान झालं तर सर्जरी, रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपी यांच्यामदतीने कॅन्सर बरा होऊ शकतो, असं टाटा मेमोरियल हॉस्पिटल्सच्या डॉक्टर्सनी म्हटलंय.
म्हणूनच स्तनांमध्ये गाठ आढळली, वा इतर कोणती लक्षणं कॅन्सरची असल्याचं तुम्हाला वा तुमच्या डॉक्टरना वाटत असेल, तर योग्य चाचण्यांद्वारे त्याचं निदान करून घेणं महत्त्वाचं असतं.
जर वेळेत निदान झालं नाही, तर कॅन्सरच्या पेशी शरीराच्या एका अवयवातून शरीरभर पसरण्याचा धोका असतो. असं झालं, तर त्यावर उपचार करणं, कॅन्सरच्या पेशी मारणं कठीण होतं.
सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन आणि त्यानंतर इम्युनोथेरपी अशा चार टप्प्यांमध्ये कॅन्सरची ट्रीटमेंट होते.
डाएटमुळे कॅन्सर बरा होऊ शकतो का?
कॅन्सरवरचे उपचार सुरू असताना रुग्णाचा आहार महत्त्वाचा असतो कारण त्याने रुग्णाची तब्येत सुधारायला - रिकव्हरीला मदत होते. पण फक्त डाएटच्या मदतीने कॅन्सर बरा होऊ शकत नाही.
मुंबईतल्या फोर्टिस हॉस्पिटलमधल्या कर्करोग तज्ज्ञ डॉ. उमा डांगी सांगतात, "फक्त कॅन्सरच नाही तर एकूणच आरोग्याच्या दृष्टीने आहार हा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण जे खातो-पितो, आपला आहार चांगला असेल, वजन योग्य असेल तर आपल्याला असणारा कॅन्सरचा धोका बराच कमी होतो. पण जर आपण मनाला येईल ते खाल्लं - तळलेलं - हाय कॅलरी डाएट खाल्लं, तर त्याने वजन वाढलं आणि स्थूलपणा आला तर आपली कॅन्सरची आणि डायबिटीस बीपीसारख्या इतर रोगांची रिस्क वाढू शकते. त्यामुळे आपल्या एकूणच आरोग्यासाठी डाएट महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.
"पण तुम्ही म्हणालात, मला कॅन्सर आहे आणि मी फक्त डाएटने तो पूर्ण बरा करीन, तर हे असं होत नाही. कारण कॅन्सर एकदा शरीरात झाला, तर तो आपोआप कधीच जात नाही. त्याच्यावर उपचार करणं गरजेचंच असतं. सर्जरी, किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी असा कोणत्या तरी प्रकारचा उपचार झाल्याशिवाय फक्त डाएटवर कॅन्सर बरा होत नाही. नुसती हळद किंवा काढा-बिढा घेऊन सुद्धा कॅन्सरचा रोग बरा होत नाही," डॉ. उमा डांगी सांगतात.
कॅन्सर रुग्णांनी इंटरमिटंट फास्टिंग वा इतर कुठलं डाएट करावं का?
इंटरमिटंट फास्टिंगमध्ये दिवसात आहाराच्या मध्ये मोठा कालावधी ठेवला जातो. आणि दिवसातून ठराविक वेळाच अन्न सेवन केलं जातं. असं केल्याने शरीराला पुरेसं पोषणं मिळेल का, याविषयी शंका निर्माण होऊ शकते.
शिवाय कॅन्सरचे उपचार सुरू होत असताना त्याचा परिणाम शरीरातल्या रोगी पेशींसोबतच निरोगी पेशींवरही होत असतो. अशावेळी शरीराला पोषक आहाराची आणि त्यासाठी वेगवेगळ्या पोषण तत्वांची आणि घटकांची गरज असते.
त्यामुळे Intermittent fasting, Keto, No or Low Carb diet किंवा इतर कोणतंही डाएट करताना, शरीराला मिळणारं पोषण पुरेसं ठरणारं आहे का, हे तपासणं महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच कॅन्सर रुग्णांसाठीचा आहार त्यांच्यावर उपचार करणाऱ्या कॅन्सर तज्ज्ञांना - त्यांच्यासोबतच्या न्यूट्रिशनिस्टना विचारून ठरवण्यात यावा.
कॅन्सरवर इंटरनेटच्या मदतीने स्वतः उपचार करणं किती योग्य?
कॅन्सरवरची उपचारपद्धती ही अतिशय गुंतागुंतीची आहे. ताप आला - औषध घेतलं - ताप उतरला - असं इतकं सोपं गणित नसतं. तापही सारखा चढत असेल तर त्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. कॅन्सरचे तर अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रत्येकासाठी, वेगवेगळ्या टप्प्यावर, वेगवेगळ्या पद्धतींनी उपचार केले जातात.
प्रत्येक रुग्णाचं शरीर, रोग किती पसरलाय, कोणत्या टप्प्यावर आहे याचं गांभीर्य, रुग्णाची मनःस्थिती, शरीर उपचारांना किती प्रतिसाद देतंय, या सगळ्या गोष्टींवर औषधोपचारांची परिणामकारकता ठरत असते.
त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने सुरू असणारी ट्रीटमेंट थांबवून इंटरनेटवर भरवसा ठेवणं प्रचंड धोक्याचं ठरेल. कोणत्याच आजारामध्ये इंटरनेटवर पाहून औषधं घेऊ नका, असा सल्ला डॉक्टर देत असतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











