विरोधकांना मारून पुलावर टांगणारा ड्रग माफिया, ज्याच्यावर कारवाईसाठी मेक्सिकोचं सैन्य उतरलं होतं

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, विल ग्रांट, बीबीसी प्रतिनिधी, मेक्सिकोतून आणि जॅक बर्गेस
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

मेक्सिकोतील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार, एल मेंचो एका लष्करी मोहिमेत मारला गेला आहे.

एल मेंचो हा हलिस्को न्यू जनरेशन कार्टेल (सीजेएनजी) ड्रग कार्टेलचा प्रमुख होता. तो मारला गेल्याची माहिती मेक्सिकोच्या संरक्षण मंत्रालयानं दिली आहे.

एल मेंचोचं पूर्ण नाव नेमेसियो ओसगेरा सर्वांटिझ असं होतं.

रविवारी (22 फेब्रुवारी) मेक्सिकोची राजधानी असलेल्या मेक्सिको सिटीत घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. सैन्याबरोबरच्या चकमकीत तो गंभीररीत्या जखमी झाला होता.

तपालपा नावाच्या छोट्या शहरात ही चकमक झाली. ते मेक्सिकोतील हलिस्को राज्यात आहे.

या कारवाईत एल मेंचोसह त्याच्या टोळीतील 4 जण मारले गेले आहेत. सैन्याचे देखील 3 जवान जखमी झाले.

अमेरिकेनं एल मेंचो टोळीबद्दलची गुप्तचर माहिती मेक्सिकोला पुरवली होती. त्यानंतर ही मोहीम पार पाडण्यात आली.

सैन्यानं केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर देताना सीजेएनजीनं हल्ला करत अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ केली. तसंच रस्ते अडवले आणि सुरक्षा दलांवर हल्लेदेखील केले.

फोटो स्रोत, IndEmbMexico

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं हलिस्को, तमौलीपासबरोबरच इतर अनेक राज्यांमधील अमेरिकेच्या नागरिकांना आवाहन केलं आहे की त्यांनी जिथे असतील तिथेच राहावं आणि बाहेर पडू नये.

मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम पार्दो यांनी लोकांना 'शांत राहण्याचं' आवाहन केलं आहे.

त्यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे की 'देशाच्या बहुतांश भागात कामकाज सामान्यपणे सुरू आहे.'

मेक्सिकोमधील भारतीय दूतावासानं देखील तिथे असणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी केली आहे.

एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे, "मेक्सिकोमधील सर्व भारतीय नागरिकांसाठी इशारा: सध्या लष्करी मोहिमा सुरू आहेत, त्याचबरोबर रस्त्यांवर अडथळे आणले जात आहेत आणि गुन्हेगारी कृत्येदेखील होत आहेत. मेक्सिकोच्या हलिस्को, तमौलीपास, मिचोआकान, ग्वेरेरो आणि न्यूवो लियोन राज्यांमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी सुरक्षित ठिकाणीच राहावं."

एल मेंचो 59 वर्षांचा होता. तो आधी पोलीस अधिकारीदेखील होता. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कोकेन, मेथामफेटामाइन आणि फेन्टॅनिलच्या तस्करी त्याच्या टोळीकडून केली जात असे.

अमेरिकेनं त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी दीड कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 136 कोटी रुपयांचं बक्षीस ठेवलेलं होतं.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, एल मेंचोच्या टोळीनं मेक्सिकोमध्ये अनेक वाहनांची जाळपोळ केली

मेक्सिकोच्या संरक्षण मंत्रालयानं एका वक्तव्यात म्हटलं आहे की देशातील सैन्यानं समन्वय साधत नियोजनबद्धपणे ही मोहीम पार पाडली.

एल मेंचोच्या विरोधातील मोहिमेत मेक्सिकोच्या हवाई दल आणि राष्ट्रीय गार्डच्या विमानांना देखील तैनात करण्यात आलं होतं.

मंत्रालयानं असंही सांगितलं की या मोहिमेदरम्यान अनेक चिलखती वाहनं आणि शस्त्र जप्त करण्यात आले. यात रॉकेट लाँचरचा देखील समावेश आहे.

वक्तव्यात म्हटलं आहे की यादरम्यान अमेरिकेनं मेक्सिकोला सातत्यानं माहिती दिली. त्यामुळे या मोहिमेला खूप मदत झाली.

अनेक प्रत्यक्षदर्शींनी शहरांमधून निघणारे धुराचे लोट चित्रित केले. ग्वाडिलहारा नावाच्या शहरात देखील अडथळे निर्माण करण्याच्या घटना घडल्या. आगामी फीफा वर्ल्ड कपचं यजमानपद असणाऱ्या शहरांपैकी हे एक शहर आहे.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

हलिस्को एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. इथे हजारो पर्यटक अडकले आहेत. कारण राज्यात अशांतता निर्माण झाली आहे.

रविवारी (22 फेब्रुवारी) रात्रभर, राज्यातील अनेक रस्त्यांवर बंदूकधारी लोक दिसत होते.

राज्याच्या गव्हर्नरनं सोशल मीडियावर लोकांना आवाहन केलं की त्यांनी रेड अलर्टचं पालन करावं आणि घरामध्येच राहावं.

युनायटेड एअरलाईन्स, अमेरिकन एअरलाईन्सबरोबरच एअर कॅनडानं देखील काही शहरांसाठीची त्यांची उड्डाणं रद्द केली आहेत. अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

मेक्सिकोमधील अमेरिकेचे माजी राजदूत ख्रिस्तोफर लँडाओ यांनी एल मेंचोला 'सर्वात खूनी आणि क्रूर ड्रग किंगपिन्सपैकी एक' म्हटलं.

ते म्हणाले की "एल मेंचोचा मृत्यू हा मेक्सिको, अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि जगासाठी एक मोठं यश" आहे.

फोटो स्रोत, Reuters/ Getty Images

किती धोकादायक होता एल मेंचो?

माइक विजिल यांनी अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट एजन्सीमध्ये इंटरनॅशनल ऑपरेशन हेड म्हणून काम केलेलं आहे.

ते म्हणाले की, एल मेंचोला मारण्यासाठी चालवण्यात आलेली मेक्सिकोची लष्करी मोहीम ही 'अंमली पदार्थांच्या तस्करीच्या इतिहासात करण्यात आलेल्या सर्वात महत्त्वाच्या मोहिमांपैकी एक' आहे.

अमेरिकेतील बीबीसीचं सहयोगी चॅनल असलेल्या सीबीएसशी बोलताना ते असं म्हणाले.

एल मेंचोच्या मृत्यूकडे मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांसाठी देशाच्या ड्रग कार्टेलच्या विरोधातील लढाईतील विजयाचं प्रतीक म्हणून पाहिलं जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेकदा ड्रग कार्टेलला लक्ष्य करण्याबद्दल बोलले आहेत.

तज्ज्ञांच्या मते एल मेंचोच्या मृत्यूमुळे ट्रम्प आणि मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष शेनबॉम यांच्यातील संबंध आणखी दृढ होऊ शकतात.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, 'एल मेंचो' सीजेएनजी नावाच्या ड्रग कार्टेलचा प्रमुख होता (फाइल फोटो)

ट्रम्प गेल्या वर्षी जानेवारीमध्ये, फॉक्स न्यूजला म्हणाले होते की अंमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्या बोटींना लक्ष्य केल्यानंतर "आता आम्ही जमिनीवरदेखील हल्ला सुरू करू."

ते असंही म्हणाले होते की "हे कार्टेल्सच मेक्सिको चालवत आहेत."

त्यावेळेस मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम पार्दो त्याला उत्तर देत म्हणाले होते, 'दक्षिण सीमेवर अमेरिकेचं सैन्य तैनात करण्याबाबत' कधीही एकमत झालं नव्हतं.

तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत की एल मेंचोच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीवर जर लगेच नियंत्रण मिळवलं गेलं नाही, तर मेक्सिको सरकारच्या या विजयाला कार्टेलकडून हिंसक प्रत्युत्तर मिळू शकतं.

एल मेंचो याचं हे कार्टेल सुरक्षा दलं आणि सरकारी अधिकाऱ्यांवर अनेक हल्ले करण्यासाठी कुख्यात होतं.

हा ग्रुप इतका शक्तिशाली होता की त्यांनी रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेडनं लष्कराचं एक हेलिकॉप्टर पाडलं होतं. तसंच अनेक सरकारी अधिकाऱ्यांची हत्या केली होती.

हे कार्टेल त्यांच्या विरोधकांना घाबरवण्यासाठी कधी-कधी लोकांची हत्या करून त्यांचे मृतदेह पुलांवर टांगण्यासाठीदेखील कुख्यात आहे.

सीजेएनजी ड्रग कार्टेल

सीजेएनजी टोळी 2010 पर्यंत प्रामुख्यानं हलिस्को राज्यातच सक्रिय होती.

मात्र आता त्यांचा प्रभाव संपूर्ण मेक्सिकोमध्ये आहे.

अमेरिकेचं ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशन या गटाला अतिशय शक्तिशाली सिनालोआ टोळीच्या बरोबरीचं मानतं. सिनालोआ टोळीचा प्रभाव अमेरिकेतील जवळपास सर्व 50 राज्यांमध्ये आहे.

सीजेएनजी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी करते आणि फेन्टानिलच्या उत्पादनातून अब्जावधी डॉलर्सची कमाई करते.

मेक्सिकोतून अमेरिकेत येतं फेन्टानिल

यूएस कस्टम्स अँड बॉर्डर पेट्रोलनं जून 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या आकडेवारीत सांगितलं होतं की ऑक्टोबर 2024 पासून आतापर्यंत अमेरिकेत एकूण 9,200 पौंड (4,182 किलोग्रॅम) फेन्टानिल जप्त करण्यात आलं आहे.

यापैकी जवळपास 96 टक्के फेन्टानिल मेक्सिकोला लागून असलेल्या दक्षिण-पश्चिम सीमेवर पकडण्यात आलं होतं.

तर, 1 टक्क्याहूनही कमी फेन्टानिल कॅनडाला लागून असलेल्या अमेरिकेच्या उत्तर सीमेवर जप्त करण्यात आलं होतं.

उर्वरित फेन्टानिल सागरी मार्गानं किंवा अमेरिकेच्या इतर चेक पॉईंट्समधून आलं होतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.