ऑपरेशन सिंदूरचं ब्रिफिंग देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशींना विशिष्ट सेवा पदक, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

सोफिया कुरेशी

फोटो स्रोत, PIB INDIA

फोटो कॅप्शन, भारतीय सैन्यदलातील कर्नल सोफिया कुरेशी
वाचन वेळ: 3 मिनिटे

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान चर्चेत आलेल्या भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरेशी यांना 2026 सालातील विशिष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आलं आहे.

'ऑपरेशन सिंदूर' द रम्यान कर्नल सोफिया कुरेशी यांनी विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासोबतीने माध्यमांसमोर लष्करी कारवायांबाबतची माहिती सादर केली होती.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सशस्त्र दलाच्या 70 कर्मचाऱ्यांना त्यांच्या असामान्य धैर्यासाठी आणि बलिदानासाठी शौर्य पुरस्कार घोषित केले. त्यातील सहा पुरस्कार हे मरणोत्तर असणार आहेत.

हा पुरस्कार प्राप्त होणाऱ्यांमध्ये ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दलातील अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र प्रदान केले जाईल.

ग्राफिक्स

कर्नल सोफिया कुरेशी भारतीय सैन्यातील एक अधिकारी आहेत.

2016 मध्ये पुण्यात बहुराष्ट्रीय फिल्ड प्रशिक्षण सराव झाला होता. FTXच्या 'फोर्स 18' मध्ये आसियान प्लस देश सहभागी झाले होते. भारतीय भूमीवर आयोजित करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ग्राऊंड फोर्सेस सराव होता. यामध्ये भारतीय सैन्यातील 40 सैनिकांच्या तुकडीचं नेतृत्व सिग्नल कोअरच्या महिला अधिकारी, लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी यांनी केलं होतं.

सोफिया कुरेशी

फोटो स्रोत, @SpokespersonMoD

त्यावेळेस इतक्या मोठ्या बहुराष्ट्रीय सरावात भारतीय सैन्याच्या प्रशिक्षण तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या.

भारतीय संरक्षण मंत्रालयानं देखील सोशल मीडियावरील पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली होती आणि सोफिया कुरैशी यांचे फोटो प्रसिद्ध केले होते.

सोफिया कुरेशी मूळच्या गुजरातच्या आहेत. त्यांनी बायोकेमेस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यांच्या कुटुंबाला सैन्याची पार्श्वभूमी आहे.

त्यांचे आजोबा भारतीय सैन्यात होते. त्यांचं लग्न मॅकेनाईझ्ड इन्फंट्रीमधील एका अधिकाऱ्याशी झालं आहे.

1999 मध्ये सोफिया कुरैशी वयाच्या 17 व्या वर्षी शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे भारतीय सैन्यात आल्या होत्या.

सहा वर्षे त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती सेनेमध्ये देखील काम केलं आहे. यात 2006 मध्ये काँगोमधील एका उल्लेखनीय कार्यकाळाचाही समावेश आहे.

त्यावेळेस शांती मोहिमेमध्ये प्रशिक्षणासंबंधित योगदान देण्यात त्यांनी मुख्य भूमिका बजावली होती.

ग्राफिक्स

भारतीय वायू सेनेतील विंग कमांडर व्योमिका सिंह या 'ऑपरेशन सिंदूर'ची प्रसारमाध्यमांना माहिती देणाऱ्या दुसऱ्या अधिकारी होत्या.

व्योमिका सिंह भारतीय वायुदलात हेलिकॉप्टर पायलट आहेत. त्यांच्याविषयी उपलब्ध माहितीनुसार त्यांना नेहमीच पायलट होण्याची इच्छा होती.

त्यांच्या नावाचं अर्थ 'आकाशाशी जोडणारा' असा होतो आणि या नावानं त्यांच्या महत्वाकांक्षेला दिशा दिली.

व्योमिका सिंह, नॅशनल कॅडेट कोअर म्हणजे NCCमध्ये होत्या.

त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतलीय. 2019 मध्ये त्यांना भारतीय वायुदलात फ्लाईंग ब्रँचमध्ये पायलट म्हणून पर्मनंट कमिशन मिळालं होतं.

विंग कमांडर व्योमिका सिंह

फोटो स्रोत, PIB INDIA

फोटो कॅप्शन, विंग कमांडर व्योमिका सिंह

व्योमिका सिंह यांनी एकूण 2500 तासांहून अधिक उड्डाण केलं आहे.

त्यांनी जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील कठीण परिस्थितीत चेतक आणि चीता सारखी हेलिकॉप्टर हाताळली आहेत.

अनेक बचाव मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यात नोव्हेंबर 2020 मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या एका ऑपरेशनचादेखील समावेश आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)