SCSS : निवृत्तीनंतर दर तीन महिन्यांनी नियमित व्याज देणारी ही योजना काय आहे? जाणून घ्या

गुंतवणूक योजना

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 4 मिनिटे

निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवणं ही एक मोठी चिंता असते. अशा वेळी सरकारची 'सिनियर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम' (एससीएसएस) ही एक सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक योजना ठरू शकते.

फक्त 1000 रुपयांपासून सुरुवात करता येणाऱ्या या योजनेतून दर तीन महिन्यांनी व्याज मिळू शकते आणि निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य राखण्यास मदत करते.

गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते आपण आपल्या पहिल्या नोकरीपासूनच निवृत्तीचं नियोजन सुरू केलं पाहिजे. पण खरा प्रश्न असा आहे, निवृत्तीनंतर असे कोणते गुंतवणुकीचे पर्याय आहेत, जे आपल्याला दरमहा स्थिर उत्पन्न देऊ शकतील?

निवृत्तीनंतरच्या नियमित उत्पन्नासाठी एक चांगला पर्याय म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना (सिनियर सिटीझन्स स्कीम–एससीएसएस).

ही एक सरकारी गुंतवणूक योजना आहे. पण यामधून कोणते लाभ मिळू शकतात? या योजनेत कोण गुंतवणूक करू शकतं? याचा किती फायदा होतो आणि यात काही धोका आहे का?

या प्रश्नांची उत्तरं सविस्तर जाणून घेऊया.

कोणतीही गुंतवणूक करताना आपल्याला हे पाहावं लागतं, की त्या गुंतवणुकीतून किती परतावा मिळेल?, गुंतवणूक किती सुरक्षित आहे? आणि करसवलत (टॅक्स बेनिफिट) मिळेल का? यावरूनच आपण ठरवतो की, ही योजना आपल्यासाठी योग्य आहे की नाही.

बहुतेक गुंतवणूकदारांची जोखीम सहन करण्याची क्षमता निवृत्तीनंतर कमी होते.

त्या वेळी ते सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय शोधायला सुरूवात करतात, जे स्थिर आणि हमखास परतावा देतील.

असाच एक पर्याय म्हणजे सिनियर सिटीझन्स सेव्हिंग्ज स्कीम (एससीएसएस). ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, जी नियमित व्याज आणि सुरक्षित गुंतवणूक देते.

एससीएसएसमध्ये कोण गुंतवणूक करू शकतो?

या योजनेत 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो.

याशिवाय, ज्या व्यक्तीने ते काम करत असलेल्या कंपनीची निवृत्ती योजना स्वीकारली आहे, किंवा स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) किंवा विशेष व्हीआरएस घेतली आहे, अशा 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या (पण 60 वर्षांखालील) व्यक्तीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

संरक्षण दलांमधून निवृत्त झालेले 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे अधिकारीही, काही अटींचं पालन करून या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

गुंतवणूक योजना

फोटो स्रोत, Getty Images

तुम्ही वैयक्तिकरित्या किंवा तुमच्या जोडीदारासोबत संयुक्त खाते उघडू शकता. यासाठी फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र यासारख्या कागदपत्रांची गरज असते.

कुठं खातं कुठं उघडू शकतो?

ही योजना शेड्युल बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करता येते. खाते सुरू केल्याच्या तारखेपासून ते 5 वर्षांसाठी वैध असतं. नंतर ते आणखी 3 वर्षांसाठी वाढवता येतं.

गुंतवणूकदार फक्त काही ठराविक किंवा विशिष्ट कारणांमुळेच हे खाते मुदतीपूर्वी बंद करू शकतो.

एससीएसएसमध्ये किती गुंतवणूक करू शकतो?

या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. आपण जास्तीत जास्त 30 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतो.

या योजनेत गुंतवणूकदारांना प्रत्येक तीन महिन्यांनी (प्रत्येक तिमाहीत) व्याज दिलं जातं. प्रत्येक तिमाहीसाठी व्याजदर सरकारकडून ठरवला आणि जाहीर केला जातो.

या योजनेत काही करलाभ आहेत का?

एससीएसएसमधील (ज्येष्ठ नागरिक बचत योजना) ठेवींवर मिळणारं व्याज करपात्र असतं, म्हणजेच त्यावर कर लागतो. पण 60 वर्षांवरील नागरिकांना इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर करसवलत मिळू शकते.

मुदतीपूर्वी खातं बंद करता येतं का?

खातं उघडताना जमा केलेली रक्कम आपल्याला पाच वर्षांनंतर परत मिळते. पण जर आपण ही योजना आणखी तीन वर्षांसाठी वाढवली, तर एकूण आठ वर्षांनी ही रक्कम परत मिळते.

प्रश्न असा आहे की, हे खातं पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी बंद करता येतं का?

गुंतवणूक योजना

फोटो स्रोत, Getty Images

यासाठी काही अटी आहेत:

जर खातं उघडल्यापासून एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच बंद करायचं असेल, तर जमा केलेल्या रकमेवर मिळालेलं व्याज कापून उरलेली रक्कम परत दिली जाईल.

जर खातं एक वर्षानंतर पण दोन वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केलं गेलं, तर जमा केलेल्या रकमेच्या दीड टक्के रक्कम कापली जाईल आणि उरलेली रक्कम परत दिली जाईल.

जर खातं उघडल्यानंतर दोन वर्षांनंतर बंद केलं, तर उरलेल्या ठेव रकमेवर एक टक्का वजा करून बाकीची रक्कम परत दिली जाईल.

ही योजना किती सुरक्षित आहे

एससीएसएस ही सरकारच्या निवृत्ती योजनेचा एक भाग आहे. सरकारचं म्हणणं आहे की, या योजनेतील ठेव रकमेवर व्याजदर सरकार ठरवतं आणि ठेवलेली रक्कम 100 टक्के सुरक्षित असते.

ही योजना निवृत्तीनंतरच्या नियमित उत्पन्नाचा चांगला पर्याय ठरू शकते, कारण यात गुंतवणूकदारांना दर तीन महिन्यांनी व्याज दिल जातं.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ या.

समजा आपण एकच खाते उघडलं आणि त्यात 30 लाख रुपये जमा केले. सध्या या योजनेवर 8.2 टक्के व्याजदर दिले जाते आणि ही योजना 5 वर्षांसाठी आहे.

गुंतवणूक योजना

त्याप्रमाणे, दर तीन महिन्यांनी आपल्याला 61,500 रूपये इतकं व्याज मिळेल.

पाच वर्षांत व्याजाची एकूण रक्कम 12,30,000 होईल.

थोडक्यात, ही योजना अधिक सुरक्षित मानली जाते. या योजनेत दर तीन महिन्यांनी व्याज दिलं जातं. इतर योजनांच्या तुलनेत व्याजदर चांगला आहे.

काही बँका ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर यापेक्षा जास्त व्याजदर देतात. आपण आपल्या सोयीप्रमाणे या फिक्स्ड डिपॉझिटसाठी अल्प किंवा दीर्घ मुदतीचा पर्याय निवडू शकतो.

या योजनेत पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. पण काही रक्कम कपात करून पैसे परत मिळवण्याचा पर्यायही आहे. दहा लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत (टॅक्स बेनिफिट) मिळते, परंतु या योजनेत मिळणारे संपूर्ण व्याज पीपीएफसारखं करमुक्त नसतं.

(ही फक्त माहिती आहे. गुंतवणुकीचा निर्णय नेहमी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन घ्यावा.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.