राज-उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या, दोघे एकत्र आल्यास 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील?

फोटो स्रोत, Shivsena UBT

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे जेव्हा राज ठाकरेंच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले...
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. ऑक्टोबर मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन वेळा भेटले आहेत. 6 ऑक्टोबरला राज आणि उद्धव यांची भेट झाली होती.

त्यानंतर काल (12 ऑक्टोबरला) राज ठाकरे यांनी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ही भेट स्नेहभोजनासाठी असल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या तीन महिन्यांत दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही जवळपास सहावी भेट आहे.

फोटो स्रोत, Shivsena UBT

जुलै महिन्यात पहिल्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकाच व्यासपीठावर आले होते. हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले होते. हिंदीसक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार होते. पण निर्णय रद्द झाल्यानंतर मोर्चाऐवजी विजयी मेळावा पार पडला.

मुंबईतल्या वरळी डोममध्ये राज-उद्धव एकत्र दिसले. यावेळी व्यासपीठावर कुठल्याही पक्षाचा झेंडा नव्हता, मात्र ठाकरे बंधूच केवळ व्यासपीठावर असल्यानं राजकीय आडाखे सुद्धा बांधण्यास सुरुवात झाली.

यावेळी उद्धव ठाकरे आपल्या भाषणातही म्हणाले होते की, "एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी."

त्यानंतर जुलैमध्येच राज यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या होत्या.

सप्टेंबर महिन्यात उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह राज ठाकरे यांच्या दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला गेले होते.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आणि आता पुन्हा या महिन्यांतही दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटींना राजकीय महत्त्व आलं आहे. विशेषतः मुंबई महापालिकांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येणार का, याची चर्चा या भेटींमुळे सुरू झाली आहे.

बीबीसी मराठीनं ठाकरे बंधू एकत्र आल्यास राजकीय समीकरणं कशी असतील, याबाबत सविस्तर विश्लेषणात्मक बातमी प्रसिद्ध केली होती. ती इथे पुन्हा देत आहोत :

उद्धव ठाकरेंचं हे सूचक वक्तव्य आहे राज ठाकरेंच्या मनसे पक्षासोबतच्या युतीबद्दलचं. गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं बोललं जातं. तशा चर्चाही रंगतात.

गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हे दोन्ही भाऊ एकत्र येतील या चर्चांनी जोर धरला आहे.

कारण, दुसरं तिसरं कोणी नाही, तर थेट राज आणि उद्धव या दोन्ही भावांनी तसे संकेत दिले आहेत.

त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र येतील का? यावर चर्चा करण्यापेक्षा दोघंही एकत्र आले तर नेमकं काय होऊ शकतं? मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणं कसे बदलू शकतात? राजकारणावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याची चर्चा करुयात.

याआधी या दोन भावांची नेमकी वक्तव्ये काय आहेत? त्यावर एक नजर टाकुयात.

साद आणि प्रतिसाद

महापालिका निवडणुका लागतील अशी चर्चा सुरू असतानाच उद्धव आणि राज हे दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली.

या दोन्ही भावांनी 19 एप्रिलला काही वक्तव्य केली. तेव्हापासून ही चर्चा पुन्हा सुरू झाली.

राज ठाकरे यांनी सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी याबाबत सकारात्मक वक्तव्य केलं.

राज ठाकरे म्हणाले, "कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत, महाराष्ट्र फार मोठा आहे."

"या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं- एकत्र राहणं यात फार काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. परंतु हा विषय इच्छेचा आहे."

"हा माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही. आपण महाराष्ट्राच्या एकूण चित्राकडे पाहिलं पाहिजे. मला तर वाटतं सगळ्या पक्षातल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा," असं राज ठाकरे म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी तत्काळ उत्तर दिलं होतं.

"किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन करतो. परंतु, एकीकडे त्यांना (भाजपाला) पाठिंबा द्यायचा आणि नंतर तडजोड, विरोध करणं असं चालणार नाही."

"महाराष्ट्राच्या आड जो कोणी येईल त्याचं आगत-स्वागत करणार नाही. त्याच्या पंगतीला बसणार नाही हे आधी ठरवा. मी माझ्याकडून भांडणं मिटवून टाकली, पण आधी हे ठरवलं पाहिजे."

"माझ्याबरोबर हिंदुत्वाचं हित होणार की भाजपाबरोबर हे मराठी माणसांनी ठरवलं पाहिजे. चोरांना गाठीभेटी, कळत नकळत त्यांचा प्रचार करायचा नाही, ही पहिली शपथ छत्रपती शिवरायांसमोर घ्यायची, मग टाळी दिल्याची हाळी द्यायची," असं ते म्हणाले होते.

आता पुन्हा उद्धव ठाकरे यांनी "संदेश कशाला आम्ही जी काही द्यायची ती थेट बातमीच देऊ", असं म्हणून पुन्हा एकदा दोघांच्या एकत्र येण्याबद्दल सूचक वक्तव्य केलंय.

एकत्र येण्याचा फायदा-तोटा किती?

महापालिका निवडणुका तोंडावर असताना दोन्ही भावांकडून सकारात्मक वक्तव्य येत आहेत. त्यामुळे हे दोघं एकत्र येतील अशी चर्चा आहे. पण, एकत्र आले तर पुढे काय घडू शकतं? याचा दोघांनाही किती फायदा-तोटा होईल?

दोघांना आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवायचं असेल, तर दोघांनाही एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे.

या दोघांच्या एकत्र येण्यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांचा थोडा तरी आत्मविश्वास वाढेल, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

याशिवाय मुंबई महापालिकेत देखील मराठी मतांचं होणारं विभाजन टळू शकतं. या मतांचा दोघांना एकत्रितपणे फायदा होऊ शकतो.

दोघांचं एकत्र येणं दोघांसाठी फायद्याचं ठरेल. मात्र, त्याचे काही तोटे देखील असतील. कारण, काही बाबतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांच्या भूमिका परस्परविरोधी आहेत.

त्यामुळे या दोघांच्या परस्परविरोधी भूमिकेविरोधात एकमेकांकडे गेलेला मतदार दोघं एकत्र आले, तर मतं एकमेकांकडे ट्रान्सफर होतील का? हा प्रश्न आहे.

'किंतु-परंतु न ठेवता एकत्र आले, तर फायदा'

याबद्दल ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात, "उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेमुळे मधल्या काळात त्यांच्यासोबत काही लोक जोडली गेली आहेत."

"त्या लोकांना या दोघांचं एकत्र येणं कितपत रुचेल हा प्रश्न आहे. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याविरोधात जी भूमिका घेतली त्याचा फटका बसू शकतो. काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत नसेल, तर काँग्रेसमुळे जी मतं जोडली गेली ती त्यांच्याकडे परत जाऊ शकतात."

"राज ठाकरेंसोबत जशी मतं येतील तशी काही मतं जातील सुद्धा. त्यामुळे कशासाठी किती गमवायचं याचा विचार त्यांना करावा लागेल."

"असं असलं तरी, राज ठाकरेंनी त्यांची भूमिका वेगळ्या पद्धतीनं मुस्लीम मतदारांना पटवून दिली, तर त्या मतांचा सुद्धा फायदा होऊ शकतो," असं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांना वाटतं.

हेमंत देसाई म्हणतात, "राज ठाकरेंनी मुस्लिमांविरोधात घेतलेली भूमिका ही बाळासाहेबांसारखी होती, ती फक्त पाकिस्तानातल्या मुस्लिमांना विरोध करणारी होती हे राज ठाकरे मतदारांना पटवून देऊ शकले, विरोध करायचा, तर फक्त भोंग्यांच्या आवाजाला कशाला सगळेच आवाज बंद करा असा नरेटीव्ह राज ठाकरेंनी मांडला, तर या युतीचा नक्कीच मुंबईत फायदा होईल."

"कारण, मुस्लीम मतदारांना सुद्धा कुठे जायला पर्याय उरणार नाही. काँग्रेसची ताकद उरलेली नाही. आता काँग्रेस फारशी सक्रीय दिसत नाही."

दोघंही किंतु-परंतु न ठेवता एकत्र आले तर फायदा होईल. पण, तो निर्णायक असेल का? अशी शंका राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे यांना वाटते.

त्याचं कारण सांगताना ते म्हणाले, "राज ठाकरे यांच्याविषयी बोलणारे नेते म्हणून अनेकांना आकर्षण वाटतं. पण, नेता म्हणून भरोसा वाटत नाही. तो एकाएकी होऊ शकेल की नाही हे कठीण आहे."

"दोघांची विश्वासार्हता आणि दोघांचं मतदारांना होणारं अपील हे खूप कमी झालं आहे. यामुळे एक अधिक एक दोन अशी बेरीज होईल का? अशी शंका आहे."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उद्धव आणि राज ठाकरे.

मुंबईतील समीकरणं कशी बदलतील?

मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची इतकी ताकद दिसत नाही. त्यामुळे ही युतीची चर्चा चाललीय ती फक्त मुंबई महापालिकेतील आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेली आहे, असं बोललं जातंय.

कारण, मुंबई हा ठाकरेंच्या शिवसेनेचा आत्मा आहे आणि शिवसेनेनं मुंबईवर इतकी वर्षं सत्ता गाजवली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मुंबई आपल्या हातून निसटू द्यायची नाही यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय.

त्याचाच भाग म्हणून या युतीकडे बघितलं जात आहे. मात्र, हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तर मुंबईतलं राजकीय समीकरण कसं बदलेल?

मराठी आणि मुस्लीम मतं एकत्र कशी ठेवायची यासाठी या दोघांनी एकत्र येऊन व्यवस्थित अजेंडा जनतेसमोर मांडला, तर ही सगळी मतं मिळून फायदा होईल, असं हेमंत देसाई यांना वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसी मराठीसोबत बोलताना ते म्हणाले, "मुंबईत मनसेचे नगरसेवक नाहीत. एखादा असेल, तर तो इतर कोणीतरी पळवला असेल. मात्र, मनसेकडे सामान्य कार्यकर्ता आहे. विधानसभेत त्यांच्या उमेदवारामुळे काही ठिकाणी शिंदेंच्या उमेदवाराचं नुकसान झालं आणि उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला फायदा झाला. दुसरीकडे शिवसेनेकडे केडर आहे."

"जर राज ठाकरेंनी विरोधात लढायचं ठरवलं, तर उद्धव त्यांना दोन आघाड्यांवर लक्ष्य करतील. राज यांनी मुस्लिमांविरोधात घेतलेली भूमिका आणि परप्रांतीय लोकांना केलेली मारहाण. ते राज यांना अडचणीचं ठरू शकतं."

"दोन्ही पक्ष एकत्र आले, तर 100 टक्के दोघांनाही फायदा होईल. यश मिळेल का याची खात्री नाही. पण, एकटं लढण्यापेक्षा एकत्र लढलेलं कधीही चांगलं. मनसे स्वतंत्र लढली, तर त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. या दोघांना अस्तित्व टिकवायचं असेल, तर एकत्र यायलाच लागेल. हे दोघेही एकत्र आले, तर महायुतीपुढचं आव्हान गडद होईल," असं मत हेमंत देसाई व्यक्त करतात.

मतदारांना रुचेल का?

पण, हे दोघं एकत्र आले, तर मुंबई महापालिकेत किती यश मिळेल, याबाबत राजेंद्र साठे यांना शंका वाटते.

ते म्हणतात, "मुंबईत भाजपचा प्रभाव वाढलेला आहे. मुंबईत मराठी जनता जी काही आहे ती 25 ते 30 टक्के राहिलेली आहे. ती सुद्धा विखुरलेली आहे. मराठी सोडून हिंदी, गुजराती भाजपच्या बाजूनं आहे."

"शिवसेनेचा पारंपरिक मतदार होता तो आता शिंदे गटात गेला आहे हे कोकणातल्या निकालावरून दिसलं. कोकण आणि मुंबईचे घनिष्ठ संबंध आहेत. मुंबईत शाखा प्रमुखांमध्ये खालीपर्यंत फूट पडलेली आहे."

"ठाकरे गटाची ताकद कमी झालेली आहे. त्यात अजिबात शंका नाही. सध्या सत्तेचा फायदा शिंदे गटातील लोकांना मिळतोय. असलेली सत्ता सोडायची का हा प्रश्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे या दोघांच्या एकत्र येण्यानं इतका फायदा होईल का?" अशी शंका राजेंद्र साठे व्यक्त करतात.

फोटो स्रोत, Getty Images

मतविभाजन टाळण्यासाठी या दोघांच्या युतीचा फायदा होईल, असं प्रमोद चुंचुवार यांना वाटतं.

ते म्हणतात, "शिवसेनेचं मराठी मतांचं विभाजन राज ठाकरेंमुळे होतं. या दोघांच्या एकत्र येण्यामुळे ते मतविभाजन टळेल. तसेच या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हे अनेक शिवसैनिकांच्या मनातील इच्छा आहे."

राज ठाकरे उद्धवसोबत येऊन सध्याच्या महायुती सरकारवर तुटून पडले, जागावाटप आणि मतविभाजन यावर समाधानकारक तोडगा निघाला, तर एक चांगला परिणाम दिसू शकतो.

पण, हे दोन्ही बंधू एकत्र आल्यानं एकमेकांचा मतदार शिफ्ट होईल का? ही शंका सचिन परब यांना आहे.

व्हीडिओ कॅप्शन, हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, कुणाला संधी? कुणाला धोका?

ते म्हणतात, "शिवसेनेचा पारंपरिक मतदार आहे त्यांची मत ट्रान्सफर होतील. पण, नवीन मतदार ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात राज ठाकरेंकडे गेलेला आहे त्यांची मतं ट्रान्सफर होतील का ही शंका आहे."

"सध्याच्या परिस्थितीत महायुतीसमोर एकट्यानं उभं राहून लढणं कठीण आहे. त्यामुळे दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे. पण, दोघंही एकत्र येतील का याबद्दलही शंका वाटते. दोघं एकत्र आले, तर महापालिकेच्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो."

"कारण, उद्धव ठाकरेंकडे संघटना आहे, राज यांच्याकडे नरेटीव्ह उभं करण्याची ताकद आहे. दोघांना महापालिका निवडणूक कशी लढायची हे उत्तम माहिती आहे. त्यामुळे एक आणि एक दोन नाहीतर किमान दीड तरी होतीलच."

"तसेच आदित्य आणि अमित एकत्र आले, तर त्यांना तरुणांमधून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. दोघंही एकत्र येऊन महायुतीसमोर आव्हान उभं करू शकतात."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)