टी 20 वर्ल्ड कप : न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक, फिन अॅलनचं 'फिनटॅस्टिक' शतक
फोटो स्रोत, Matthew Lewis-ICC/ICC via Getty Images
न्यूझीलंडनं फिन अॅलनच्या झंझावाती शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला अगदी सहज हरवून पुरुषांच्या टी-20 विश्वचषकाची फायनल गाठली आहे.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्समध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आज अक्षरशः धुमाकूळ घातला. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट राखून दारुण पराभव केला आहे.
फिन अॅलनने टी-20 विश्वचषकातलं सर्वात वेगवान शतक झळकावलं. फिनने फक्त 33 बॉलमध्ये 10 चौकार आणि 8 षटकारांसह 100 धावा केल्या.
न्यूझीलंडने याआधी 2021 मध्ये उपविजेतेपद मिळवलं होतं. आता येत्या रविवारी न्यूझीलंडला त्यांचा पहिला टी-20 विश्वचषक जिंकण्याची संधी असणार आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखून हा निर्णय सार्थ ठरवला.
आधी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना 169 धावांमध्ये रोखलं. त्यानंतर 170 धावांचा पाठलाग करायला आलेल्या टीम सायफर्ट आणि फिन अॅलनने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची पिसं काढली.
पहिल्या एक-दोन ओव्हरमध्ये काही संधी निर्माण झाल्या पण त्यानंतर फिन अॅलन आणि नंतर टीम सायफर्टने आक्रमक फलंदाजी करत न्यूझीलंडला अगदी आरामात विजयापर्यंत पोहोचवलं.
टी-20 विश्वचषकात एकही सामना न गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीत पराभूत होऊन थेट मायदेशी परतावं लागणार आहे.
फिन आणि टीमची धमाकेदार फलंदाजी
सुरुवातीच्या ओव्हरमध्ये क्विंटन डिकॉकने फिन अॅलनचा झेल सोडला. त्यानंतर फिनने ईडन गार्डन्सवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. फिन अॅलनने 19 बॉल्समध्ये अर्धशतक झळकावून टी-20 विश्वचषकातल्या सर्वाधिक वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली.
त्याच्यासोबत फलंदाजीला उतरलेल्या टीम सायफर्टने देखील 33 बॉल्समध्ये 58 धावा केल्या. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पहिली विकेट गमावण्यापूर्वी तब्बल 117 धावांची भागीदारी केली.
फोटो स्रोत, Arun SANKAR / AFP via Getty Images
117 धावा झालेल्या असताना कागिसो रबाडाने टीम सायफर्टचा त्रिफळा उडवला.
फिन अॅलनचे आडव्या बॅटने मारलेले फटके प्रेक्षणीय होतेच पण त्याचवेळी संपूर्ण स्पर्धेत शिस्तबद्ध गोलंदाजी केलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना मात्र शेवटपर्यंत सूर गवसला नाही.
टीम सायफर्टनंतर फलंदाजीला आलेल्या रचिन रवींद्रने 11 बॉल्समध्ये 13 धावा करून न्यूझीलंडला 9 विकेट राखून विजयी केलं.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी नांगी टाकली
कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, मार्को यान्सन, कॉर्बीन बॉश अशा तेजतर्रार गोलंदाजांची फौज घेऊन उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडच्या फलंदाजांना कुठेही रोखता आलं नाही.
अगदी पहिल्या दोन ओव्हरनंतरच फिन आणि टीमच्या जोडीने प्रत्येक गोलंदाजाला सीमेबाहेर पाठवलं. कागिसो रबाडाने न्यूझीलंडची एकमेव विकेट मिळवली.
रबाडाने 3 ओव्हरमध्ये 28 धावा दिल्या. लुंगीने 2 ओव्हरमध्ये 22 धावा दिल्या. कॉर्बीन बॉशच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 35 धावा दिल्या.
त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या केशव महाराजला सुद्धा फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने 3 ओव्हरमध्ये 33 धावा दिल्या.
न्यूझीलंडने अंतिम फेरीत धडक मारली आहे. न्यूझीलंडने आजपर्यंत एकही टी-20 विश्वचषक जिंकलेला नाही.
आता उद्या (5 मार्च) होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध भारताच्या सामन्यात जो विजयी होईल त्या संघाला अंतिम सामना खेळावा लागणार आहे.
अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
डिकॉक, मिलर यांची निराशा
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डिकॉक 8 बॉल्समध्ये 10 धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रायन रिकल्टनला भोपळाही फोडता आला नाही.
त्यानंतर कर्णधार एडन मार्करम आणि डेव्हिड मिलर देखील स्वस्तात बाद झाले. मार्करमने 20 बॉल्समध्ये 1 चौकार आणि 1 षटकार खेचत 18 धावा केल्या. डेव्हिड मिलर फक्त 6 बॉल्समध्ये 6 धावा करून बाद झाला.
फोटो स्रोत, Matthew Lewis-ICC/ICC via Getty Images
ब्रेवीस देखील 27 बॉल्समध्ये 34 धावाच करू शकला. आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि मार्को यान्सन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
मार्को यान्सनने आक्रमक फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. मार्कोने 30 बॉल्समध्ये 2 चौकार आणि 5 षटकार खेचत 55 धावा केल्या.
तर ट्रिस्टन स्टब्सने 24 बॉल्समध्ये 29 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेने सलग टी-20 सामने जिंकले असले तरी त्यांच्या संघावर असणारा ऐतिहासिक 'चोकर्स'चा शिक्का यावेळी पुसून काढण्यास ते नक्कीच उत्सुक असतील.
अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयी होऊन त्यांनी हा शिक्का काही प्रमाणात मिटवण्याचा प्रयत्न केला असला तरी मर्यादित ओव्हर्सच्या स्पर्धांमध्ये अजूनही त्यांना ही कामगिरी करायची आहे.
न्यूझीलंडची चिवट गोलंदाजी
कर्णधार मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या खेळाडूंनी अतिशय कंजूस गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेची धावगती नियंत्रणात ठेवली. सुरुवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू नियमित अंतराने बाद करून न्यूझीलंडने आफ्रिकेवर दबाव टाकला होता.
अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रने 4 ओव्हर्समध्ये 29 धावा देऊन 2 फलंदाजांना बाद केलं. कोल मॅककोन्ची या फिरकीपटूने देखील एका खेळाडूला बाद केलं. कर्णधार सँटनरने त्याच्या 4 ओव्हर्समध्ये फक्त 25 धावा दिल्या.
मॅट हेन्रीने 4 ओव्हर्समध्ये 34 धावा देऊन 2 विकेट मिळवल्या.
फोटो स्रोत, Dibyangshu SARKAR / AFP via Getty Images
जेम्स निशमने देखील 3 ओव्हर्समध्ये 42 धावा देऊन 1 विकेट मिळवली.
लोकी फर्ग्युसनने देखील 4 ओव्हर्समध्ये 29 धावा देऊन 1 विकेट मिळवली.
आता अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी न्यूझीलंडला धावांची आवश्यकता आहे. तर सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखावं लागणार आहे.
न्यूझीलंडने 2000 नंतर आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. पण मागच्या दशकभरात किवींच्या या संघाने आयसीसीच्या स्पर्धांमध्ये अत्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
उपांत्य फेरीआधी काय घडलं?
न्यूझीलंडचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास दक्षिण आफ्रिकेसारखा सहज राहिलेला नाही.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात झालेली डबल सुपर ओव्हर असो किंवा मग इंग्लंडविरुद्ध झालेला दारुण पराभव असो त्यांच्या संघाचा प्रवास नाट्यमय राहिलेला आहे.
फोटो स्रोत, Dibyangshu SARKAR / AFP via Getty Images
एडन मार्करमच्या नेतृत्वातील दक्षिण आफ्रिका आणि मिचेल सँटनरच्या नेतृत्वात खेळणारा न्यूझीलंड हे दोन्ही संघ अत्यंत गुणवान खेळाडूंनी भरलेले आहेत.
आता उपांत्य सामन्यात कोण शांत डोक्याने खेळ करतं यावर गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्याची समीकरणं अवलंबून असतील.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
मोठ्या बातम्या
बीबीसी मराठी स्पेशल
लोकप्रिय
मजकूर उपलब्ध नाही