बाई तुझ्यापायी : आदिमानव गुहेतून बाहेर येऊन लाखो वर्षं उलटली, आपली मानसिकता कधी येणार?

बाई तुझ्यासाठी

फोटो स्रोत, zee 5

    • Author, निखिल खैरे, मुक्ता बाम
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

साधारणत: आठवड्याभरापूर्वी 'बाई तुझ्यापायी' ही आम्ही लिहिलेली वेबसिरीज प्रदर्शित झाली.

एप्रिल महिन्यात निर्माता केयुर गोडसेनं ही सीरिज लिहिण्याबद्दल विचारलं होतं. 'अयाली' ह्या मुथुकुमार ह्यांच्या तामिळ वेबसिरीजवर आधारीत ही मराठी वेबसीरिज आहे. निपुण धर्माधिकारी याने दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

या सीरिजमध्ये एक असं काल्पनिक गाव आहे ज्या ठिकाणी मुलींना पाळी आली की त्यांची लग्नं लावून दिली जातात. याच गावात राहणाऱ्या एका मुलीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे. आणि त्याच मुलीला पाळी येते. तिचं लग्न लावून दिलं जाईल की ती पुढे आपले स्वप्न पूर्ण करू शकेल?

तिच्या प्रवासातील अनुभव हीच या वेबसीरिजची कथा आहे.

कुठल्याही कथेचं सर्वांत पहिलं काम असतं ते वाचकाचं किंवा प्रेक्षकाचं मनोरंजन करणे. इथं मनोरंजनाचा अर्थ केवळ हशा आणि टाळ्या असा न घेता लेखकाला अपेक्षित असलेल्या भावना प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण करणे हा आहे.

एखादा भावूक प्रसंग बघताना आपणही भावूक होणे म्हणजेही मनोरंजनच. आमच्यासाठी हे मनोरंजन महत्त्वाचं होतं. पण म्हणून समोर असणाऱ्या विषयाचं गांभीर्य नव्हतं असं नाही

लेखक म्हणून काम करताना दरवेळी आपल्याला जे म्हणायचं आहे तेच म्हणायची संधी मिळेलच असं नाही. मात्र एक ताकदीचा विचार मांडणारी, सामाजिक रुढींना प्रश्न विचारणारी आणि सजग व्हायला भाग पाडणारी ही गोष्ट लिहायची संधी मिळणं हा त्या अर्थाने खूप मोलाचा, लेखक म्हणून समाधान देणारा, मोकळं करणारा अनुभव होता.

आजवर आपण खेडेगावात घडणाऱ्या अनेक गोष्टी बघितल्या आहे. त्यातल्या अनेक संस्मरणीयही आहेत. आम्ही मूळ गाभ्याला धक्का न लावता गावात घडणारी गोष्ट सांगण्याऐवजी तिथल्या माणसांची गोष्ट सांगायचं ठरवलं.

त्यातून विविध पात्रे सापडत गेली, त्यांच्या इच्छा, आकांक्षा, रुढींची भीती, ह्या भीतीचा गैरवापर करणारे आणि स्त्रियांना डांबून ठेवणारे लोक सापडत गेले. ग्रामीण भागातली मराठी म्हटल्यावर कोल्हापूर किंवा विदर्भ अशा दोन भागांशीच जोडली जाते. ते टाळून वेसाईचं वडगाव या काल्पनिक गावाला तिथली बोली दिली.

बाई तुझ्यासाठी

फोटो स्रोत, zee 5

मासिक पाळी, स्त्रीसक्षमीकरण, स्त्री-पुरुष समानता, शिक्षण, अंधश्रद्धा अशा विषयांवर बेतलेल्याही गोष्टी बघितल्या आहेत. आम्हाला मुळातच मासिक पाळी किंवा यापैकी कुठल्याच विषयाची गोष्ट सांगायची नव्हती. आम्हाला त्या मुलीची गोष्ट सांगायची होती. तिच्या स्वप्नांची गोष्ट सांगायची होती. तिच्यासाठी उभ्या राहणाऱ्या आईची गोष्ट सांगायची होती.

तामिळ आणि मराठी ह्या दोन वेगळ्या संस्कृती असल्या, व्यक्त होण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी तिथे आणि इथे आईविषयी वाटणारं प्रेम मात्र एकसारखंच असतं.

माणसांची स्वप्नं, त्यासाठी घेतले जाणे कष्ट एकसारखेच असतात. त्यातून भावनांना साद घालणारे प्रसंग उभे राहिले.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

हा झाला लेखनाचा आणि निर्मितीचा प्रवास. तो सुरू असताना मनातही एक प्रवास सुरू होता. असं दिसतं की बायकांशी वागायच्या दोनच पद्धती आपण समाज म्हणून स्वीकारल्या आहेत.

म्हणजे एकतर सर्व काही तुझ्या चरणी असं म्हणत तिचा उदो उदो करायचा नाहीतर जे काही चुकीचं होतं, मग तो मुलीचा जन्म असो, विटाळ असो वा इतर कोणती आपत्ती, ते तुझ्यामुळेच झालं असा कांगावा करायचा. यापलीकडे जात, बायकांच्या कहाण्या समजून घेत त्यांच्याकडे बघण्याचा माणूस म्हणून समानतेचा एक धागा असू शकतो का?

या शोधातून 'बाई तुझ्यापायी' हा प्रवास सुरू झाला.

स्त्री आणि पाळी

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या प्रवासाची नायिका अहिल्या काल्पनिक असली तरी आमच्या आसपासच्या कितीतरीजणी त्या अहिल्यामागची प्रेरणा होत्या. लेखन करत असताना मासिक पाळी, श्रद्धा-अंधश्रद्धा या गोष्टींवर अनेकदा चर्चा व्हायची.

आमच्या सुदैवानं आम्ही अशा एका समाजात वावरतो, जिथं ह्या गोष्टी मोकळेपणे बोलता येतात. पण तरीही गावांमध्ये जी परिस्थिती आहे, तीच थोड्याफार फरकानं शहरातील अनेक सुशिक्षित घरांमध्येही आहे.

आजही अनेक घरांमध्ये पाळी आलेल्या स्त्रीशी सावत्र व्यवहार केला जातो. दुकानातून सॅनिटरी पॅडस्‌ विकत घेतले जातात पण ते कुणालाही कळू नये अशा पद्धतीनं वर्तमानपत्रामध्ये बांधून दिले जातात. का? त्यात लपवण्यासारखं काय आहे?

सर्वांत घातकी प्रकार म्हणजे आज पाळी आलेल्या स्त्रीला बाजूला बसवणं चुकीचं आहे हे मान्य करून 'कोणे एके काळी तिला आराम मिळावा म्हणून अशा प्रथा सुरू केल्या' हे सांगणं हा आहे.

असं असेल तर आज पाळी आलेली स्त्री कामासाठी बाहेर पडते तेव्हा आज आपण तिला आराम मिळावा म्हणून काय करतो? की पैसे कमावू लागल्यावर मासिक पाळीचे नियम बदलतात?

कोणे एके काळी, त्या काळाची गरज म्हणून एक प्रथा सुरू झाली. ती त्या काळासाठी योग्य असेलही, पण काळानुसार तिचं मूल्यमापन करून ती बदलणे किंवा बाद करणे आपल्या हातात असतं. ते आपण करतो का? हाच प्रश्न आपली नायिका अहिल्या विचारते.

स्त्री आणि पाळी

फोटो स्रोत, Getty Images

जे मासिक पाळीचं तेच श्रद्धेचं आणि अंधश्रद्धेचं. कुठल्या तरी एका गोष्टीवर, व्यक्तीवर श्रद्धा असणे ही जगातील सर्वांत सुंदर गोष्टींपैकी एक गोष्ट आहे. तिथे मीपणा गळून पडतो. आंतरिक शक्ती मिळते आणि अगदी देवासोबतही मित्रत्वाचा प्रवास सुरू होतो.

अहिल्याचंही देवीसोबतचं नातं असंच निरागस आहे. साऱ्या गावाला देवीची भीती वाटते. पण अहिल्या देवीशी मैत्रिणीसारख्या गप्पा मारते. जे ती तिच्या आई-वडिलांना सांगू शकत नाही ते सगळं देवीशी बोलते.

तिला स्वप्नं सांगते, मदत मागते आणि प्रसंगी बोलही लावते. ज्या देवीला आपण आई म्हणतो ती आपल्यावर का कोपेल? असा प्रश्न विचारते. जो खरं तर आम्हीच स्वत:ला विचारत होतो.

आपल्या मनातली ही निरागसता कुठे हरवते? कर्मकांड आणि दिखावा करताना आपण ज्याच्यावर श्रद्धा ठेवतो त्यालाच हरवून बसतो का? प्रत्येकाच्या मनामध्ये भक्तीची वेगळी व्याख्या असते. ती तशी असावी. पण भक्ती भीतीवर किंवा लोभावर अवलंबून असेल तर ते कितपत योग्य आहे?

स्त्री आणि पाळी

फोटो स्रोत, Getty Images

आमच्या वेसाईचं वडगावमधला जयसिंग म्हणतो की गावातल्या बायका वेशीबाहेर गेल्या नाहीत, बाहेरचं कुणी आत आलं नाही त्यामुळे स्त्रीला कधी वावग्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं नाही. हे स्त्रियांचं रक्षणच झालं नाही का? जयसिंग जरी काल्पनिक असला तरी स्त्रियांच्या शीलाच्या नावाखाली आजही स्त्रियांवरच बंधनं लादली जातात. पुरुषांना मात्र काहीही करायची मुभा! त्यातच प्रथा आणि परंपरांची जोड दिल्यास हजारो वर्षांची निश्चिंती.

हजारो वर्षं स्त्रियांनी मान खाली घालूनच जगायचं. आमच्या वेसाईच्या वडगावात जयसिंगला आणि प्रत्येक पुरुषाला हेच शिकवलं गेलंय की स्त्री दुय्यम असते. ती अबला असते. बरं ह्याचंही संदर्भासहीत स्पष्टीकरण दिलं जातं की पूर्वी पुरुष शिकार करायचे आणि स्त्रिया गुहेत रहायच्या, त्यामुळे डीएनएमध्ये तसं आहे.

आदिमानव गुहेतून बाहेर येऊन लाखो वर्षं उलटली, आपली मानसिकता गुहेतून कधी बाहेर येणार? त्यातूनच 'मुली फॅशन करतात, म्हणून बलात्काराच्या घटना घडतात'सारखी मुक्ताफळं जन्माला येतात. स्त्री आणि पुरुष समान आहेत, हे वाक्य कितीही गुळगुळीत झालं असलं तरी आधी ते मान्य करणे आणि त्यानंतर तसं वागणं आपण कधी शिकणार?

हे सगळे प्रश्न घेऊन लहानगी अहिल्या गावासमोर उभी राहते. पडते, धडपते, पुन्हा उभी राहते. तिच्यासोबत आम्हीही या प्रश्नांची उत्तरं शोधत गेलो. ज्यातून 'बाई तुझ्यापायी' साकार झालं असं वाटतं.

ही गोष्ट काहींना आपलीच वाटेल काहींना कुठेतरी पाहिल्यासारखी वाटेल तर काही असं कुठे होतं? ही झापडंही लावतील - पण अहिल्याने विचारलेले हे प्रश्न कोणत्याही संवेदनशील मनाला अस्वस्थ करतील, आपल्या आत उत्तर शोधायला भाग पाडतील हे नक्की!

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

(बाई तुझ्यापायी या वेबसीरिज लिखाणाच्या प्रक्रियेत निखिल खैरे आणि मुक्ता बाम यांना जे अनुभव आले आहेत ते त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. त्यांची मतं ही वैयक्तिक आहेत.)