शिवाजी महाराजांनी सुरतमधून किती खजिना लुटला? इंग्रज यातून कसे सुटले?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिवाजी महाराजांनी सुरतवर दोनदा आक्रमण केले आणि सुमारे1.66 कोटी रुपयांची मालमत्ता लुटली.
    • Author, जय शुक्ला
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची दोनदा लूट केली. या दोन्ही स्वाऱ्यांमधून शिवाजी महाराजांच्या सैन्याने लाखो रुपयांची लूट केली. पण तुम्हाला माहिती आहे का, की या दोन्ही स्वाऱ्यांमध्ये ते सुरतमधील इंग्रजांना मात्र लुटू शकले नाहीत?

त्या वेळी सुरतमध्ये इंग्रज आणि डच लोकांचं एक गोदाम होतं. या गोदामात लाखो रुपयांचा मुद्देमाल ठेवण्यात आलेला होता. पण असं नक्की काय घडलं की, मराठ्यांना इंग्रजांचं काहीही नुकसान करू शकले नाहीत? हे समजून घेण्यासाठी आपल्याला संपूर्ण इतिहास नीटपणे समजून घ्यावा लागेल.

सुरतमध्ये अक्षरश: लक्ष्मी सिंहासनावर आरूढ झाली होती, असं म्हणता येईल, इतकी संपत्ती होती. पण, बाह्य आक्रमणं टाळण्यासाठी सुरतेभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. शहराच्या मध्यभागी फक्त एक मातीची भिंत होती. मात्र, कोणत्याही राज्यकर्त्याला सूरतच्या सुरक्षेचा विचार करावा, असं तोपर्यंत वाटलेलं नव्हतं.

एकीकडे, मुघलांनी दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्धची आपली आक्रमकता अधिक वाढवली होती. त्यामुळेच शिवाजी महाराजांचं लक्ष सुरतकडं वळलेलं होतं.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

1662 मध्ये, ईस्ट इंडिया कंपनीनं सुरतमध्ये एक गव्हर्नर नियुक्त केला होता. या गव्हर्नरचं नाव होतं जॉर्ज ऑक्सोंडन. त्यावेळी काही इंग्रज अधिकारी हे सुरतमधील आपल्या वास्तव्यामध्ये खाजगी व्यवसाय करून एकप्रकारे कंपनीचं नुकसानचं करत होते. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पकडून कंपनीचं नुकसान रोखणं हेच गव्हर्नर ऑक्सोंडन यांचं काम होतं.

सर जदुनाथ सरकार त्यांच्या 'औरंगजेब-1618-1707' या पुस्तकात लिहितात की, "6 जानेवारी 1664 रोजी, शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्यातील सर्वात श्रीमंत आणि समृद्ध बंदर असलेल्या सुरतची चार दिवस लूट केली. त्या समृद्ध शहराच्या सुरक्षेसाठी सर्व बाजूंनी असावी अशी कोणतीही काटेकोर व्यवस्था नव्हती. तिथं प्रचंड संपत्ती होती. इतकी की, निव्वळ शाही करातूनच (जकात) मुघल साम्राज्याला दरवर्षी बारा लाख रुपयांचा महसूल मिळत असे."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दक्षिण गुजरातमधील सुरत हे मुघलांचे आर्थिक केंद्र आणि प्रमुख व्यावसायिक बंदर होते.

मंगळवार, 5 जानेवारी 1664 रोजी सकाळी सुरत लुटण्यासाठी शिवाजी महाराजांचं सैन्य येत असल्याची बातमी पसरली. त्यावेळी शिवाजी महाराजांचं सैन्य सुरतपासून थोड्या अंतरावरचं असलेल्या गांदेवीजवळ पोहोचलेलं होतं. अर्थातच, ही बातमी ऐकताच सुरतमधील लोकांमध्ये घबराट पसरली. भीतीमुळे ते पळून जाऊ लागले. लोक सुरक्षेसाठी त्यांच्या महिला आणि मुलांसह तापी नदीच्या पलीकडे पोहोचले.

त्यावेळी इनायत खान हा मुघलांचा सुरतेतील प्रमुख अधिकारी आणि किल्लेदार होता. त्यानं इंग्रज आणि डच लोकांकडून मदत मागितली. पण ते म्हणाले की, "आम्ही मदत करू शकत नाही, आम्ही स्वतःचं संरक्षण करू."

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जदुनाथ सरकार लिहितात की, "इनायत खाननं स्वत: लाच घेतली आणि किल्ल्यात श्रीमंत लोकांना आश्रय दिला. शहरातील इतर सामान्य व्यापाऱ्यांना दैवाच्या हाती सोपवून तो स्वतःही किल्ल्यामध्ये लपून बसला."

बुधवार, 6 जानेवारी रोजी सकाळी शिवाजी महाराजांचं सैन्य सुरतला पोहोचलं. त्यांनी पूर्वेकडील बुरहानपुरी वेशीपासून थोड्या अंतरावर आपला तळ ठोकला. शिवाजी महाराजांच्या मराठा सैन्यानं सुरतवर हल्ला केला. श्रीमंत व्यापाऱ्यांकडून लूट घेतली. हा सिलसिला बुधवार ते शनिवारपर्यंत चालू राहिला.

सर जदुनाथ सरकार लिहितात की, "शहराचा सुमारे दोन तृतीयांश भाग उद्ध्वस्त झाला. डच कारखान्याजवळ त्या काळातील जगातील सर्वात श्रीमंत व्यापारी असलेल्या विरजी वाहोर यांचा वाडा होता. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती 80 लाख रुपये होती, असं मानलं जातं. शुक्रवारच्या संध्याकाळपर्यंत मराठ्यांनी विरजी वाहोरा यांचाही राजवाडा लुटला."

"ब्रिटीश कारखान्याजवळ, हाजी सय्यद बेग नावाच्या आणखी एका श्रीमंत व्यापाऱ्याचं गगनचुंबी इमारतीसारखं मोठं घर होतं. त्यांची मोठी गोदामंही होती. हाजी आपली मालमत्ता तशीच सोडून आश्रयासाठी म्हणून किल्ल्यामध्ये पळून गेला होता. मराठ्यांनी त्याचंही घर लुटलं."

मराठे इंग्रजांना लुटू शकले नाहीत

सर जदुनाथ सरकार यांनी लिहिलेल्या या पुस्तकातील संदर्भानुसार, त्याच वेळी इस्तंबूलहून एक श्रीमंत ज्यू सुरतला आला होता. त्यानं तत्कालीन सम्राट औरंगजेबासाठी भरपूर दागिने आणले होते. मराठ्यांनी त्याला पकडलं होतं, पण तो खंबीर राहिला आणि कसलीही हानी न होता सुखरूप बचावला.

सर जदुनाथ सरकार लिहितात की, "गुरुवारी इंग्रजांनी रस्त्यावर फिरणाऱ्या आणि लूटण्यासाठी आलेल्या मराठ्यांवर हल्ला केला. त्यामुळे ते तिथून पळून गेले. दुसऱ्या दिवशी, इंग्रजांनी हाजी सय्यद बेग यांच्या घराजवळ पहारा उभारला. त्यामुळे अधिक नुकसान होण्यापासून ते बचावले. त्यामुळे, एकप्रकारे मराठ्यांचं एक कोटी रुपयांचं नुकसान झालं."

सुरतचे इतिहासकार इच्छाराम देसाई त्यांच्या 'शिवाजीज् लूट ऑफ सुरत' या पुस्तकात लिहितात की, "काही सावकार ब्रिटीश छावणीत आले आणि त्यांनी त्यांचे प्राण आणि मालमत्ता वाचवण्यासाठी भीक मागितली. त्यांना वाचवण्यात आलं. त्या वर्षी, ब्रिटीशांच्या छावणीत 87 लाखांचा मुद्देमाल होता."

इंग्रज गव्हर्नर जॉर्ज ऑक्सडनने सुवाली बंदरात लावलेल्या त्याच्या जहाजांमधून तोफा मागवल्या. त्याने या तोफा कोठीच्या घरावर ठेवल्या. ऑक्सडनने सुमारे 150 इंग्रज आणि 60 स्थानिक सैनिकांना सोबत घेऊन स्वतःच्या बचावासाठी एक योजना आखली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1670 मधील सुरतचे छायाचित्र

इच्छाराम देसाई लिहितात की, "ऑक्सडनने शहराभोवती फेरफटका मारला. त्यानं लोकांना दवंडी पिटून, घोषणा देऊन हिंमत न गमावण्यासाठी प्रोत्साहन दिलं."

दुसरीकडे, शिवाजी महाराजांनी इंग्रजांकडे एक दूत पाठवला. ते म्हणाले, 'जर तुम्हाला जीव वाचवायचा असेल तर तुम्हाला खंडणी द्यावी लागेल.' इंग्रजांनी शिवाजी महाराजांची ही मागणी नाकारली.

इच्छाराम देसाई लिहितात की, "यामुळे संतप्त झालेल्या मराठ्यांनी ब्रिटीश छावणीच्या आजूबाजूच्या घरांना आग लावण्याचा प्रयत्न केला. गेराल्ड ओंगियर नावाच्या एका धाडसी इंग्रजाच्या नेतृत्वाखालील छोट्या सैन्यानं मराठ्यांवर जोरदार हल्ला केला. काही जण या झटापटीत मारलेही गेले. त्यामुळे, शिवाजी महाराजांनी इंग्रजांना त्रास देणं थांबवलं. इतकंच नाही, तर त्यामुळे ब्रिटीश छावणीच्या आजूबाजूला राहणारे श्रीमंतदेखील मराठ्यांच्या लुटमारीपासून आणि मारहाणीपासूनही बचावले."

थोडक्यात, ब्रिटिश आणि डचांनी शिवाजी महाराजांच्या सैन्याचा प्रतिकार केला. त्यांनी स्वतःसह इतरांच्या मालमत्तेचं रक्षण केलं. शिवाजी महाराजांनाही या लढाईत आपली शक्ती गमवायची नव्हती.

दरम्यान, सुवाली बंदरातून शहरात येत असलेल्या अँथनी स्मिथ नावाच्या एका इंग्रज व्यापाऱ्याला शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी पकडलं. मराठ्यांनी त्याची सुटका करण्याच्या बदल्यात ब्रिटीशांकडून खंडणी मागितली. या अँथनी स्मिथचं प्रत्यक्षदर्शी म्हणून असलेलं कथन ईस्ट इंडिया कंपनीच्या नोंदींमध्ये कागदोपत्री पुरावा म्हणून जतन करण्यात आलेलं आहे.

फोटो स्रोत, Print Collector via Getty Images

फोटो कॅप्शन, 1601 मध्ये इंग्लंडमधील वूलविच येथून निघालेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या पहिल्या जहाजाचे छायाचित्र.

एच. व्ही. शेषाद्री यांच्या 'युगप्रवर्तक शिवाजी' या पुस्तकाचं भाषांतर किशोर मकवाना यांनी केलं आहे. त्यात असं लिहिलं आहे की, "शिवाजी महाराजांनी स्मिथचे हात तोडण्याचा आदेश दिला. स्मिथने उत्तर दिले, तुम्ही फक्त माझेच हात का तोडत आहात? डोकेदेखील का कापत नाही? हे उत्तर ऐकल्यानंतर, महाराजांनी फक्त 350 रुपये खंडणी वसूल करून त्याला जिवंत जाऊ दिलं."

या पुस्तकात असंही नमूद केलं आहे की, शिवाजी महाराजांकडे सुमारे 5,000 सैनिक होतं तर इंग्रजांकडे फक्त 210 सैनिक होतं. परंतु, इंग्रजांच्या 'शौर्य आणि धूर्तपणा'मुळे ते मराठ्यांच्या कचाट्यातून वाचू शकले. सुरतला मदत करण्यासाठी बाहेरील सैन्य येण्यापूर्वीच मराठे महाराष्ट्रात पुन्हा परतले. इंग्रज आणि डच लोकांशी सामना करण्याऐवजी त्यांनी दूरदृष्टी दाखवून त्यांच्याशी संघर्ष टाळला. 10 जानेवारी रोजी शिवाजी महाराजांनी सुरत सोडली.

इतिहास असं सांगतो की, दहा हजार किलोमीटर अंतरावरून आलेल्या काही मूठभर इंग्रजांना आपली संपत्ती वाचवण्यात यश आलं, तर सुरतमधील लोकांना आपलं सर्वस्व गमवावं लागलं. त्यावेळी सुरतची लोकसंख्या सुमारे 8 लाख होती. सुरतमधील ज्या श्रीमंत लोकांनी त्यांचे दागिने भरलेले पेटारे इंग्रजांना दिले होते, ती सगळी मालमत्ता शिवाजी महाराज माघारी गेल्यानंतर इंग्रजांनी त्यांना परत केली.

मात्र, 'सूरत सोना नी मुरत' या पुस्तकात वेगळा संदर्भ नमूद करण्यात आला आहे. त्यात असं लिहिलं आहे की, ख्रिश्चन धर्मगुरू फादर अ‍ॅम्ब्रोस यांच्या विनंतीमुळे मराठ्यांनी सुरतमध्ये राहणाऱ्या ख्रिश्चनांचा छळ केला नाही. ख्रिश्चन आणि काही श्रीमंत लोकांनी त्यांची संपत्ती चर्चभोवती पुरली होती. परंतु शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना या गोष्टीचा सुगावा लागला आणि त्यांनी ती खोदून काढली. वलांडाचे दलाल मोहनदास पारेख नेहमीच दानधर्म करायचे. त्यामुळे, मराठ्यांनी त्यांच्या घराला मात्र हात लावला नाही, असंही विविध पुस्तकांमध्ये नमूद आहे.

इंग्रज गव्हर्नर ऑक्सोडन यांना मुघलांकडून सवलत

सूरतला या लुटीपासून वाचवण्यासाठी अहमदाबादमधील मुघल सुबा मुहम्मद खानने सुरतला आपलं सैन्य पाठवलं होतं. परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कारण, मराठे सुरत लुटून त्याआधीच पळ काढण्यात यशस्वी झालेले होते.

मुघल सरकारने इंग्रज गव्हर्नर ऑक्सडन यांचं त्याच्या शौर्याबद्दल आभार मानले. अहमदाबादच्या मुघल सैन्याच्या सेनातपीने ऑक्सडनवर सुरतच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली. त्याने दाखवलेल्या शौर्याबद्दल मुघल सैन्याकडून त्याला घोडा आणि सोनेरी पगडी देण्यात आली.

मात्र, ऑक्सडनने मुघलांना सांगितलं की, 'मी एक व्यापारी आहे. त्यामुळे, मला या बदल्यात व्यापारी फायद्याची अपेक्षा आहे.' अहमदाबादच्या सुबाने दिल्लीवर अधिराज्य गाजवणाऱ्या सम्राट औरंगजेबाच्या परवानगीने ब्रिटिश वस्तूंवर लावल्या जाणाऱ्या करात एक टक्का सूट दिली होती.

शिवाजी महाराजांनी जेव्हा दुसऱ्यांदा सुरत लुटली होती, तेव्हाही इंग्रज ठाम राहिले होते.

फोटो स्रोत, CLASSIC IMAGE ALAM

फोटो कॅप्शन, शिवाजी महाराजांनी जेव्हा दुसऱ्यांदा सुरत लुटली होती, तेव्हाही इंग्रज ठाम राहिले होते.

2 ऑक्टोबर 1670 रोजी सुरतमध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली की, शिवाजी महाराजांचं सैन्य दुसऱ्यांदा सुरत लुटण्यासाठी येत आहे. अर्थातच, लोकांमध्ये पुन्हा एकदा दहशत पसरली.

सर जदुनाथ सरकार लिहितात की, "सुरतचे व्यापारी आणि सरकारी कर्मचारी आदल्या दिवशीच पळून गेले होते. 3 ऑक्टोबर रोजी शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा सुरत शहरावर हल्ला केला."

शिवाजी महाराजांच्या पहिल्या हल्ल्यानंतर, औरंगजेबाच्या सूचनेनुसार सुरतमध्ये एक किल्ला बांधण्यात आला होता. मात्र, काही काळ मराठा सैनिकांना तोंड देऊ शकल्यानंतर या किल्ल्याचे राखणदारच पळून गेले.

मागील लुटीत झालेल्या अतोनात नुकसानीनंतर ब्रिटिश, डच, तुर्क, फ्रेंच आणि इराणी लोकांचा व्यापार पुन्हा सुरू झाला होता. काही ठिकाणं वगळता, मराठ्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण शहराचा ताबा घेतला. त्यावेळी, फ्रेंचांनी मराठ्यांना मोठ्या भेटवस्तू देऊन स्वत:ची सुटका करून घेतली होती.

सर जदुनाथ सरकार लिहितात की, "ब्रिटिशांची मोकळ्या जागेत छावणी होती. पण त्यांनी 50 नौदल सैनिकांच्या मदतीने मराठ्यांशी निकराने लढा दिला आणि स्वत:चं रक्षण केलं."

मराठ्यांनी सहजपणे मोठी घरं लुटली आणि जवळजवळ अर्धे शहर जाळून टाकलं. दुसऱ्यांदा सुरत लुटून ते 5 ऑक्टोबर रोजी पळून गेले.

सर जदुनाथ सरकारच्या यांच्या मते, दुसऱ्या हल्ल्यात शिवाजी महाराजांच्या सैन्याला जवळपास 66 लाख रुपये किमतीची लूट मिळाली होती. मराठ्यांच्या या हल्ल्यांमुळे सुरतचा व्यापार पूर्णपणे विस्कळीत झाला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)